प्रेमळ, धर्माभिमानी आणि सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्‍याप्रती भाव असलेली खामगाव (जिल्‍हा बुलढाणा) येथील ५७ टक्‍के आध्‍यात्मिक पातळीची कु. देवश्री गजानन नागपुरे (वय ११ वर्षे) !

उच्‍च लोकातून पृथ्‍वीवर जन्‍माला आलेली दैवी (सात्त्विक) बालके म्‍हणजे पुढे हिंदु राष्‍ट्र चालवणारी पिढी ! कु. देवश्री गजानन नागपुरे ही या पिढीतील एक आहे !

‘वर्ष २०१५ मध्‍ये ‘कु. देवश्री गजानन नागपुरे उच्‍च स्‍वर्गलोकातून पृथ्‍वीवर जन्‍माला आली असून तिची आध्‍यात्मिक पातळी ५१ टक्‍के आहे’, असे घोषित करण्‍यात आले होते. वर्ष २०२३ मध्‍ये तिची आध्‍यात्मिक पातळी ५७ टक्‍के झाली आहे. तिच्‍यावर पालकांनी केलेले योग्‍य संस्‍कार, तिची साधनेची तळमळ आणि तिच्‍यातील भाव यांमुळे आता तिची साधनेत प्रगती होत आहे.’

– सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

(२३.७.२०२३)

कु. देवश्री नागपुरे

१. शांत स्‍वभाव

‘देवश्री शांत स्‍वभावाची आहे. ती कधीही गडबड करत नाही. ती घरातील कामे आणि सेवा शांतपणे अन् परिपूर्ण रितीने करण्‍याचा प्रयत्न करते.

सौ. प्रीती नागपुरे

२. कुशाग्र बुद्धी आणि शिकण्‍याची वृत्ती

देवश्री एकपाठी आहे. एकदा वाचलेले किंवा काही सांगितलेले तिच्‍या लगेच लक्षात रहाते. तिला नवीन नवीन गोष्‍टी शिकण्‍याची आवड आहे. विशेष करून सेवेच्‍या संदर्भातील तांत्रिक सूत्रे ती जलद गतीने शिकते आणि ती सेवा करण्‍याचा प्रयत्न करते.

३. परिस्‍थिती स्‍वीकारणे

देवश्री कुठलीही गोष्‍ट लगेच स्‍वीकारतेे. त्‍यामुळे ती कुठल्‍याही परिस्‍थितीशी लगेच जुळवून घेते. नोकरीनिमित्त आम्‍हाला वेगवेगळ्‍या राज्‍यांमध्‍ये जाऊन रहावे लागते. तेव्‍हा देवश्री तेथील परिस्‍थितीशी लगेच जुळवून घेते. ती स्‍थानिक भाषाही लगेच शिकून घेते. आम्‍ही गुजरात येथे असतांना तिने गुजराती भाषा शिकून घेतली.

४. आवड-नावड नसणे

देवश्री कधीच कुठल्‍याही गोष्‍टीविषयी आग्रही नसते किंवा एखाद्या गोष्‍टीचा हट्टही करत नाही. तिला कशाची विशेष आवड-नावड नाही.

५. आजोबांची प्रेमाने काळजी घेऊन त्‍यांना नामजप करायला सांगणारी देवश्री !

माझे सासू-सासरे अमरावती येथे रहातात. एक मासापूर्वी माझ्‍या सासूबाईंचे अकस्‍मात् निधन झाले. माझ्‍या सासर्‍यांना काही आजार असल्‍यामुळे दिवसभरात त्‍यांना विविध औषधे आणि ‘इन्‍सुलीन’चे इंजेक्‍शनही द्यावे लागते. पूर्वी हे सर्व माझ्‍या सासूबाई करायच्‍या. सासूबाईंच्‍या निधनानंतर सासरे खामगावला माझ्‍याकडे रहायला आले. तेव्‍हा देवश्रीने ‘त्‍यांना कुठली औषधे कुठल्‍या वेळी द्यायची ?’, हे सर्व आपल्‍या वडिलांकडून समजून घेतले. आता ती सासर्‍यांना सर्व औषधे वेळेवर देते अन् आजोबांची व्‍यवस्‍थित काळजी घेते. ती आजोबांना साधना सांगून नामजप करायला सांगते. ती आजोबांवर पुष्‍कळ प्रेम करते.

६. साधनेची ओढ

देवश्री नामजपादी उपाय नियमित करते.

७. इतरांना धर्माचरणाचे महत्त्व सांगून कृती करून घेणे

आमच्‍या शेजारी रहाणार्‍या मुली देवश्रीपेक्षा वयाने मोठ्या आहेत. देवश्रीनेे त्‍यांना कुंकू लावण्‍याचे महत्त्व समजावून सांगितले आणि ‘प्रतिदिन कुंकू लावा’, असे सांगून त्‍यांच्‍याकडून धर्माचरण करून घेतले.

८. ‘देवतेचे विडंबन होऊ नये’; म्‍हणून सतर्कतेने कृती करणे

देवश्रीच्‍या शाळेतील एका मुलाने त्‍याच्‍या शाळेच्‍या दप्‍तरावर गणपतीचे चित्र लावले होते. देवश्रीने ‘दप्‍तरावर गणपतीचे चित्र लावल्‍यामुळे देवतेचे विडंबन कसे होते ?’, ते त्‍याला समजावून सांगितले आणि त्‍या मुलाने दप्‍तरावरून गणपतीचे चित्र काढेपर्यंत त्‍याचा पाठपुरावा केला.

९. चुकांप्रती संवेदनशीलता

देवश्री प्रतिदिन रात्री झोपतांना गुरुदेवांना (सच्‍चिदानंद परब्रह्म डॉक्‍टरांना) आत्‍मनिवेदन करते आणि स्‍वतःकडून झालेल्‍या चुकांसाठी कान पकडून क्षमा मागते. ‘कधी तिच्‍याकडून क्षमायाचना करायची राहिली’, तर तिला अपराधी वाटते.

१०. भाव

अ. मी सेवेला गेल्‍यावर देवश्री घरी एकटीच असते. तेव्‍हा ‘परम पूज्‍य (सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले) घरी आले असून तेच माझ्‍या समवेत थांबले आहेत’, असा तिचा भाव असतो.

आ. देवश्री नेहमी म्‍हणते, ‘देवच आपल्‍याकडून सर्व कृती करून घेतो.’

११. स्‍वभावदोष

अव्‍यवस्‍थितपणा आणि राग येणे.

११ अ. स्‍वभावदोषांमध्‍ये जाणवलेले पालट : देवश्रीमध्‍ये ‘अव्‍यवस्‍थितपणा’ पुष्‍कळ प्रमाणात होता. याविषयी सांगितल्‍यावर तिला राग यायचा. पू. पात्रीकरकाकांनी (पू. अशोक पात्रीकर, सनातनचे ४२ वे संत यांनी) याविषयी मार्गदर्शन केल्‍यावर ती या स्‍वभावदोषावर स्‍वयंसूचना घेऊ लागली. आता ‘अव्‍यवस्‍थितपणा’ या स्‍वभावदोषात काही प्रमाणात सुधारणा झाली असून तिचा रागही न्‍यून झाला आहे.’

– सौ. प्रीती गजानन नागपुरे (कु. देवश्रीची आई), खामगाव, बुलढाणा. (७.४.२०२३)

बालसाधकांमधील विविध दैवी पैलू सहजतेने उलगडणारी चलचित्रे (व्‍हिडिओज्) आपण इंटरनेटवर ‘यूट्यूब’च्‍या goo.gl/06MJck मार्गिकेवरही पाहू शकता.