नवी मुंबईत स्‍वच्‍छ भारत सर्वेक्षणामुळे ए.पी.एम्.सी. लगतचा परिसर स्‍वच्‍छ !

नवी मुंबई – ए.पी.एम्.सी. (कृषी उत्‍पन्‍न बाजार समिती) आणि तुर्भे परिसर येथे स्‍वच्‍छ भारत सर्वेक्षणाचे पथक येणार असल्‍याने दोन दिवसांपासून येथील परिसर फेरीवालामुक्‍त आणि स्‍वच्‍छ झाल्‍याचे दिसून येत आहे. केंद्रशासनाने हाती घेतलेल्‍या ‘स्‍वच्‍छ भारत’ उपक्रमांतर्गत देशात स्‍वच्‍छतेचे सर्वेक्षण करणारे पथक शहरांना भेटी देत आहे. त्‍यानुसार मागील ८ दिवसांपासून हे पथक नवी मुंबईत आले आहे.

ए.पी.एम्.सी. आणि तुर्भे परिसरात नेहमीच अस्‍वच्‍छता असते. हा परिसर फेरीवाल्‍यांनी गजबजलेला असतो; परंतु मागील दोन दिवसांपासून पालिकेकडून या परिसरातील फेरीवाल्‍यांवर कारवाई करून त्‍यांना हुसकावले जात आहे. कचराकुंड्या स्‍वच्‍छ केल्‍या जात आहेत.

संपादकीय भूमिका

सर्वेक्षणाचे पथक येणार म्‍हणून स्‍वच्‍छता करण्‍यापेक्षा परिसर कायमच स्‍वच्‍छ रहाण्‍यासाठी प्रशासन प्रयत्न का करत नाही ?