‘पवना बंद जलवाहिनी प्रकल्‍प’ रखडल्‍याने पिंपरी महापालिकेची १७० कोटी रुपयांची हानी !

पवना धरण

पिंपरी (जिल्‍हा पुणे) – पिंपरी-चिंचवड शहराला पवना धरणातून बंदिस्‍त जलवाहिनीद्वारे पाणी आणण्‍याच्‍या प्रकल्‍पाचे काम वर्ष २००८ मध्‍ये चालू करण्‍यात आले होते. या प्रकल्‍पाला ग्रामस्‍थांनी विरोध करत आंदोलन केले. पोलिसांनी आंदोलकांवर गोळीबार केला होता. त्‍यात ३ शेतकर्‍यांचा मृत्‍यू झाला. या आंदोलनानंतर या प्रकल्‍पाला सरकारने दिलेली स्‍थगिती अद्याप उठवलेली नाही. त्‍यामुळे ‘पवना बंद जलवाहिनी प्रकल्‍प’ गेल्‍या १४ वर्षांपासून रखडला आहे. त्‍यामुळे महापालिकेची १७० कोटी रुपयांची हानी झाली आहे. हा प्रकल्‍प मार्गी लागल्‍यास पिंपरी-चिंचवड शहराचा किमान वर्ष २०३१ पर्यंतचा पाणीप्रश्‍न सुटून नियमित पाणीपुरवठा करणे शक्‍य होईल. त्‍यामुळे शासनाने प्रकल्‍पावरील बंदी उठवून प्रकल्‍प कार्यान्‍वित करण्‍याची मागणी आमदार महेश लांडगे यांनी केली आहे.

पवना बंदिस्‍त जलवाहिनी प्रकल्‍पावरून पिंपरी-चिंचवड शहर भाजप आणि मावळ भाजप यांमध्‍ये मतभेद आहेत. त्‍यामुळे भाजपच्‍या पदाधिकार्‍यांनी एकत्र येऊन बंदिस्‍त जलवाहिनी प्रकल्‍पाविषयी तोडगा काढावा, अशी मागणी शहरवासियांकडून होत आहे.

संपादकीय भूमिका :

पाणीपुरवठ्याचा जनहितकारी प्रकल्‍प १४ वर्षे रखडणे, हे प्रशासनाला लज्‍जास्‍पद !