सायबर गुन्हे रोखण्यासाठी देशातील सर्वांत अत्याधुनिक ‘सायबर प्लॅटफॉर्म’ महाराष्ट्रात उभारणार ! – देवेंद्र फडणवीस, गृहमंत्री

मुंबई, ३ ऑगस्ट (वार्ता.) – सायबर गुन्ह्यांमध्ये मोठी वाढ होत असून हे गुन्हे रोखण्याचे मोठे आव्हान आपल्यापुढे आहे. सायबर गुन्ह्यांमध्ये महाराष्ट्र ५ व्या क्रमांकावर आहे. सायबर गुन्हे रोखण्यासाठी ४३ प्रयोगशाळा सिद्ध करण्यात आल्या आहेत, तसेच सर्वांत अत्याधुनिक ‘सायबर प्लॅटफॉर्म’ महाराष्ट्रात उभारण्यात येणार आहे, अशी माहिती गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २ ऑगस्ट या दिवशी विधानसभेत कायदा आणि सुव्यवस्था यांवरील चर्चेच्या उत्तरात दिली.

या वेळी अधिक माहिती देतांना देवेंद्र फडणवीस म्हणाले, ‘‘या ‘सायबर प्लॅटफॉर्म’अंतर्गत अधिकोष, तसेच अन्य वित्तीय संस्थांमधील गुन्हांचे अन्वेषण करण्यात येईल. यामध्ये केंद्रीय आणि राज्यातील यंत्रणा एकत्र जोडण्यात येईल. त्यामुळे गुन्हे रोखता येतील. या ‘सायबर लॅब’साठी तज्ञवर्गाची निर्मित करण्यात येत आहे. गुन्हे करण्याचे तंत्रज्ञान विकसित होत आहे. त्याप्रमाणे कारवाईचे तंत्रज्ञानही आपल्याला विकसित करावे लागेल.’’