औरंगजेबाचे ‘स्‍टेटस’ ठेवणार्‍यांचा ‘मास्‍टरमाईंड’ कोण ? याचा शोध घ्‍या ! – आमदार नीतेश राणे, भाजप

  • पोलीस खात्‍यातील काही जण धर्मांधांना साहाय्‍य करत असल्‍याचा गंभीर आरोप !

  • भाजप-शिवसेनेच्‍या आमदारांकडून सभागृहात छत्रपती शिवरायांचा जयजयकार !

आमदार नीतेश राणे

मुंबई, २ ऑगस्‍ट (वार्ता.) – जे औरंगजेबाला ‘आलमगिरी’(हा शब्‍द ‘विश्‍वविजेता’ या अर्थाने वापरला जातो.) म्‍हणतात, त्‍यांना छत्रपती शिवाजी महाराज यांच्‍या महाराष्‍ट्रात रहाण्‍याचा अधिकार नाही. अशांनी पाकिस्‍तानमध्‍ये निघून जावे. जिल्‍ह्याजिल्‍ह्यामध्‍ये औरंगजेबाचे ‘स्‍टेटस’ (भ्रमणभाषमधील व्‍हॉट्‍सअ‍ॅपमध्‍ये स्‍वत:च्‍या दूरभाष क्रमांकासाठी ठेवण्‍यात येणारे चित्र आणि वाक्‍य) ठेवणारी मुले आहेत. त्‍यांचा ‘मास्‍टरमाईंड’ (म्‍होरक्‍या) कोण आहे ? याचा शोध घ्‍यावा,  यासाठी विशेष पोलीस पथकाची स्‍थापना करावी, अशी मागणी भाजपचे आमदार नीतेश राणे यांनी २ ऑगस्‍ट या दिवशी लक्षवेधी सूचनेद्वारे केली. औरंगजेबाचे उदात्तीकरण करणार्‍यांना पोलीस विभागातीलच काही जण पाठीशी घालत असल्‍याचा गंभीर आरोपही या वेळी नीतेश राणे यांनी केला. या वेळी शिवसेना आणि भाजप यांच्‍या आमदारांनी ‘छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो’, ‘वन्‍दे मातरम्’  या घोषणा दिल्‍या.

या वेळी नीतेश राणे म्‍हणाले, ‘‘छत्रपती शिवाजी महाराज आणि धर्मवीर संभाजी महाराज यांच्‍याविरुद्ध ज्‍याने कटकारस्‍थान केले, त्‍या औरंगजेबाचा ‘स्‍टेटस’ ठेवून महाराष्‍ट्राचे वातावरण खराब केले जात आहे. जे ‘वन्‍दे मातरम्’ म्‍हणत नाहीत; परंतु मिरवणुकीमध्‍ये ‘सर तनसे जुदा’ करण्‍याच्‍या घोषणा देणे, हे प्रकार राज्‍यात जाणीवपूर्वक केले जात आहेत. ‘औरंगजेब ज्‍यांचा बाप आहे, त्‍यांनी पाकिस्‍तानमध्‍ये चालते व्‍हावे. शिवरायांच्‍या राज्‍यात कायदा आणि सुव्‍यवस्‍था यांविषयी आम्‍हाला चिंता आहे. जे पोलीस अशा घटनांमध्‍ये आरोपींनी सहकार्य करत आहेत, त्‍यांची विभागाच्‍या अंतर्गत चौकशी करण्‍यात यावी.’’

(म्‍हणे) ‘मुसलमानांना सार्वजनिक ठिकाणी वावरणे कठीण झाले आहे !’ – आमदार अबू आझमी, समाजवादी पक्ष

आमदार अबू आझमी, समाजवादी पक्ष

या वेळी अबू आझमी यांनी वंचित बहुजन आघाडीचे अध्‍यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी ‘औरंगजेबाच्‍या कबरीवर जाऊन फुले वाहिली, मग त्‍यांच्‍यावरही कारवाई करणार का ?’ असा प्रश्‍न उपस्‍थित केला. ‘देशात मुसलमानांच्‍या विरोधात वातावरण निर्माण केले जात आहे. त्‍यामुळे मुसलमानांना रेल्‍वेमधून प्रवास करणे आणि बुरखा घालून वावरणे कठीण झाले आहे. औरंगजेबाचे चित्र लावणे गुन्‍हा असेल, तर नथुराम गोडसे यांचे चित्र लावल्‍यावर कारवाई करणार का ?’ असा प्रश्‍न उपस्‍थित केला.

यावर उत्तर देतांना देवेंद्र फडणवीस म्‍हणाले, ‘‘हैद्राबादच्‍या निजामाने आमीष दाखवूनही डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी या देशातील धम्‍म स्‍वीकारला, हे प्रकाश आंबेडकर यांनी लक्षात घ्‍यावे. मतांसाठी कुणीही राष्‍ट्रहिताशी तडजोड करू नये. मतांसाठी चुकीची भूमिका घेऊ नये, असे म्‍हटले.’’

छत्रपती शिवरायांना न मानणार्‍यांना हात वरती करण्‍याचे आमदार महेश लांडगे यांचे आवाहन !

औरंगजेबाच्‍या उदात्तीकरणावरून सभागृहात शिवसेना आणि भाजप यांच्‍या आमदारांनी तीव्र संताप व्‍यक्‍त केला. या वेळी समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनीही छत्रपती शिवाजी महाराज यांचा जयघोष केला. या वेळी भाजपचे आमदार महेश लांडगे म्‍हणाले, ‘‘काही दिवसांपूर्वी समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी केलेल्‍या एका ‘ट्‍वीट’मध्‍ये औरंगजेबाचा उल्लेख ‘आलमगिरी’ असा केला होता. यावरून शिवरायांचा जयघोष करणार्‍यांचा औरंगजेबाशी संबंध काय ? अशा प्रकारची विकृती थांबवावी लागेल. कठोर कारवाई करावी लागेल. या सभागृहात कुणी छत्रपती शिवाजी महाराज यांना मानणारा नसेल, त्‍याने हात वर करावा.’’ त्‍यावर कुणीही हात वर केला नाही.

(म्‍हणे) ‘भिडेगुरुजी हे गुरुजी आहेत, याचा पुरावा आहे का ?’ – आमदार पृथ्‍वीराज चव्‍हाण, काँग्रेस

आमदार पृथ्‍वीराज चव्‍हाण, काँग्रेस

या लक्षवेधी सूचनेच्‍या वेळी काँग्रेसचे आमदार पृथ्‍वीराज चव्‍हाण यांनी पू. भिडेगुरुजी यांनी गांधीजी यांच्‍याविषयी अमरावती येथे केलेल्‍या वक्‍तव्‍याचे सूत्र उपस्‍थित करत संभाजी भिडे हे फर्ग्‍युसन महाविद्यालयात प्राध्‍यापक असल्‍याचे सांगितले जाते. ते ‘गुरुजी’ होते, याचा काय पुरावा आहे  का ? त्‍यांची संस्‍था नोंदणीकृत आहे का ? असे प्रश्‍न उपस्‍थित केले. त्‍यावर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मतांच्‍या राजकारणासाठी असे प्रश्‍न उपस्‍थित केले जात असल्‍याचे म्‍हटले.

या वेळी राष्‍ट्रवादी काँग्रेसचे आमदार जयंत पाटील यांनी पू. भिडेगुरुजी यांना सरकारकडून सुरक्षा दिली जात असल्‍यास ती काढून घेण्‍याची मागणी केली. त्‍यावर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भिडेगुरुजी यांना सुरक्षा पुरवण्‍यात येत नसल्‍याचे सांगितले.

औरंगजेबाच्‍या उदात्तीकरणाच्‍या मुळापर्यंत जात आहोत ! – देवेंद्र फडणवीस, गृहमंत्री 

देवेंद्र फडणवीस, गृहमंत्री

या देशात ‘औरंगजेब’ हा कुणाचाही नेता होऊ शकत नाही. भारतावर आक्रमण करणारा औरंगजेब मुसलमानांचाही नेता होऊ शकत नाही. भारतात छत्रपती शिवाजी महाराज, महाराणा प्रताप, माजी राष्‍ट्रपती ए.पी.जी. अब्‍दुल कलाम होऊ शकतात. औरंगजेबाचे स्‍टेटस जाणीवपूर्वक ठेवून दोन समुदायांमध्‍ये तेढ निर्माण केली जात आहे. हे प्रकार अचानक का चालू झाले आहेत ? यामध्‍ये जाणीवपूर्वक मुसलमान तरुणांना भडकावून तेढ निर्माण केली जात आहे का ? याच्‍या मुळाशी आम्‍ही जात आहोत.

ज्‍यांनी औरंगजेबाचे स्‍टेटस ठेवले, त्‍यांच्‍यावर कारवाई झाली; परंतु हे षड्‍यंत्र करणार्‍यांविषयी माहिती आमच्‍याकडे आली आहे. त्‍याच्‍या खोलापर्यंत आम्‍ही जात आहोत. याविषयी आतंकवादविरोधी पथक, गुप्‍तवार्ता यंत्रणा काम करत आहेत. यामध्‍ये आवश्‍यकता पडल्‍यास विशेष पोलीस पथकाचीही स्‍थापना केली जाईल. महाराष्‍ट्र औद्योगिक राज्‍य आहे. अशा प्रकारांमुळे राज्‍याच्‍या प्रगतीवर परिणाम होतो, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

पोलिसांनी कारवाई टाळली असल्‍यास कारवाई केली जाईल !

‘औरंगजेबाच्‍या उदात्तीकरणाविषयी काही तक्रारी प्राप्‍त झाल्‍या होत्‍या. यामध्‍ये योग्‍य वेळी कारवाई केली असती, तर पुढील प्रसंग टाळता आले असते. यामध्‍ये पोलिसांनी जाणीवपूर्वक कारवाई केली नसल्‍यास माहिती घेऊन कारवाई केली जाईल’, असे या वेळी देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

संपादकीय भूमिका

औरंगजेबाचे उदात्तीकरण करण्‍यामागे मुसलमानांना कट्टर आणि हिंदुविरोधी बनवण्‍याचे आंतरराष्‍ट्रीय षड्‍यंत्र हाणून पाडा !