गोव्यातील शास्त्रीय गायक श्री. गौरीश तळवलकर यांनी त्यांच्या शिष्यांच्या समवेत २५.६.२०२३ या दिवशी महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाला भेट देऊन त्यांचे शास्त्रीय गायन सादर केले. तेव्हा देवाच्या कृपेने झालेले त्यांचे सूक्ष्म परीक्षण येथे लेखबद्ध केले आहे. या वेळी त्यांचे सुपुत्र चि. गोपाल तळवलकर (वय १२ वर्षे) यांनी संवादिनी आणि श्री. रुद्राक्ष वझे यांनी तबला या वाद्यांवर त्यांना साथ दिली.
१. श्री. गौरीश तळवलकर यांनी राग यमन मध्ये ‘नादब्रह्म गुणसागरको’, आणि ‘रंग दे, रंग दे, रंगरेजवा । ’ , या बंदीशी सादर केल्या. तेव्हा मला सूक्ष्म स्तरावर पुढील सूत्रे जाणवली.
(बंदीश : शास्त्रीय गायनातील रागाचे स्वरूप स्पष्ट करणारे बोलगीत. ही मध्यलय किंवा दृत लयीत गातात. )
अ. श्री. तळवलकर हे गाण्यातील शब्दांच्या अर्थाशी एकरूप झाल्यामुळे त्यांचे गायन अतिशय मनापासून आणि सहजतेने झाले.
आ. त्यांच्यावर श्री गुरूंची पुष्कळ कृपा आहे. त्यामुळे ते गाण्यातील सूर आळवतांना त्यांचे मन सप्तसुरांच्या सूक्ष्म नादाच्या माध्यमातून सुरांची निर्मिती केलेल्या भगवंताशी अनुसंधान साधत असतात. त्यामुळे त्यांची गायनकलेच्या माध्यमातून साधना होते.
इ. त्यांची गायनकलेच्या माध्यमातून साधना झाल्यामुळे त्यांच्यामध्ये सात्त्विकतेची वृद्धी झालेली आहे. त्यामुळे त्यांची वाणी शुद्ध होऊन त्यामध्ये मधुररस प्रवाहित होत आहे. त्यामुळे ‘त्यांचे गायन सुमधुर असून ते ऐकतच रहावे’, असे श्रोत्यांना वाटते.
ई. त्यांच्या गायनामध्ये व्यक्त स्वरूपात श्री गणेश आणि अव्यक्त स्वरूपात श्री सरस्वतीदेवी यांचे तत्त्व कार्यरत असल्याचे जाणवते. त्यामुळे त्यांच्या गायनाचा परिणाम श्रोत्यांच्या मनावर होऊन श्रोत्यांचे मन त्यांच्या गायनावर एकाग्र होते आणि त्यांची वृत्ती अंतर्मुख होते.
उ. त्यांनी गायलेल्या आलापांतून अधिक प्रमाणात भावाच्या निर्गुण नादलहरी प्रक्षेपित होतात आणि ही वलये श्रोत्यांच्या सूक्ष्म देहांमध्ये वलयांकित लहरींच्या रूपाने वायुतत्त्वाच्या स्तरावर कार्यरत होतात. त्यामुळे श्रोत्यांच्या मनाची शुद्धी होऊन त्यांचा भाव कधी अव्यक्त असतो, तर कधी व्यक्त स्वरूपात असतो.
ऊ. श्री. तळवलकर यांच्यामध्ये अहं अत्यल्प प्रमाणात असून पुष्कळ नम्रता आणि साधेपणा आहे. त्यामुळे त्यांची आंतरिक साधना चांगली चालू आहे. त्यामुळे त्यांचे गायन स्थुलातून चालू असतांनाही ते कधी वैखरी, तर कधी मध्यमा वाणीमध्ये चालू असते. त्यामुळे त्यांच्या कंठातून पिवळसर रंगाच्या नादलहरींची वलये वातावरणात प्रक्षेपित होऊन वातावरणाची शुद्धी होते.
ए. श्री. तळवलकर गात असतांना नादब्रह्माच्या लहरी कार्यरत होतात. त्यामुळे श्रोत्यांच्या आज्ञाचक्रावर चांगल्या संवेदना जाणवून या नादलहरी कान आणि आज्ञाचक्र यांच्या वाटे श्रोत्यांच्या अंतर्मनापर्यंत पोचतात. त्यामुळे त्यांच्या गायनातून नादब्रह्माची १० टक्के स्पंदने कार्यरत होऊन श्रोत्यांना नादब्रह्माची अनुभूती येते.
ऐ. श्री. तळवलकर यांनी ‘नादब्रह्म गुणसागरको’ ही बंदीश अव्यक्त भाव आणि ‘रंग दे, रंग दे, रंगरेजवा । ’ , ही बंदीश व्यक्त भाव यांच्या स्तरावर सादर केली.
२. चि. गोपाल तळवलकर (वय १२ वर्षे) याने संवादिनी (पेटी) वाजवणे
चि. गोपाल याचे वय लहान असूनही तो मनापासून संवादिनी वाजवतो. चि. गोपाल त्याच्या वडिलांना गुरु मानून त्यांनी सांगितल्याप्रमाणे संगीतसाधना करत आहे. त्यामुळे त्याच्या मनात त्याच्या वडिलांसाठी गुरूंचे स्थान असून तो शिष्य बनून त्यांच्याकडून संगीताचे ज्ञानार्जन करत आहे. त्यामुळे त्याच्यामध्ये विनम्रभाव जाणवतो. त्याने केलेले संवादिनीवरील वादन स्थुलातून अचूक आणि सूक्ष्मातूनही योग्य असल्याने परिपूर्ण आहे. श्री गुरूंच्या कृपेमुळे तो लहान वयातच निष्णात संवादिनी वादक बनला आहे. त्याच्यावरही श्री गणेश आणि श्री सरस्वतीदेवी यांची कृपा असल्याचे जाणवले.
३. श्री. रुद्राक्ष वझे यांनी तबला या वाद्यावर त्यांना साथ देणे
श्री. रुद्राक्ष वझे हे श्री. गौरीश तळवलकर यांना गुरु मानून अधिकाधिक वेळ शिष्यभावात राहून तबलावादन करतात. त्यांच्यावर श्री गणेश आणि शिव यांची कृपा असल्याचे जाणवते. त्यामुळे त्यांना तबलावादनातील सूक्ष्म पैलू लक्षात येऊन त्यांचे तबलावादन अधिकाधिक अचूक आणि परिणामकारक होत आहे.
४. कृतज्ञता
‘देवी सरस्वतीच्या कृपेने या गायनाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहून सूक्ष्म परीक्षणाच्या सेवेच्या माध्यमातून गायनाच्या सूक्ष्म पैलूंचा अभ्यास करण्याची संधी मिळाली’, यासाठी मी श्री सरस्वतीदेवी आणि श्री गुरुदेव यांच्या चरणी कोटीश: कृतज्ञ आहे. ’
– कु. मधुरा भोसले (सूक्ष्मातून मिळालेले ज्ञान), (आध्यात्मिक पातळी ६५ टक्के), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२६.६.२०२३)
|