विद्येचे माहेरघर पुणे ‘इसिस’च्‍या विळख्‍यात ? : बाहेर पडण्‍यासाठी उपाययोजना !

‘इसिस’ची ‘जागतिक विस्‍तारा’ची संकल्‍पना लक्षात घेतली, तर पूर्वीपासून आतंकवादाला सामोरे जात असलेल्‍या भारताला याचा मोठा धोका आहे. त्‍या दृष्‍टीने उग्रवाद आणि आतंकवाद संपवण्‍याकरता नियमितपणे उपाययोजना करणे आवश्‍यक आहे. घातपाती कारवायांमध्‍ये गुंतलेल्‍या आतंकवाद्यांना पुण्‍यासह राज्‍याच्‍या विविध भागांमधून झालेली अटक, हे ‘इस्‍लामिक स्‍टेट’ (इसिस) या आंतरराष्‍ट्रीय आतंकवादी संघटनेचा विळखा असल्‍याचे निदर्शक आहे. ‘महाराष्‍ट्र इसिस मोड्यूल’ या नावाने चर्चेत असलेल्‍या या गटातील ५ जणांना आतापर्यंत राष्‍ट्रीय अन्‍वेषण यंत्रणा (एन्.आय.ए.) आणि पोलिसांचे आतंकवादविरोधी पथक (ए.टी.एस्) यांनी मुंबई, पुणे आणि ठाणे येथून अटक केली आहे. यांपैकी काहींचा जयपूर स्‍फोटात हात होता.

राजस्‍थान आणि कर्नाटक या राज्‍यांमध्‍येही या संघटनेचे सदस्‍य असून यामध्‍ये प्रत्‍यक्ष घातपाती कारवाया करणारे आतंकवादी, त्‍यांचे आश्रयदाते आणि त्‍यांच्‍यासाठी निधी गोळा (टेरर फंडिंग) करणार्‍यांचे एक संघटित ‘नेटवर्क’ (जाळे) आहे. पुण्‍यात अटक केलेला उच्‍चशिक्षित डॉक्‍टर हा ‘इसिस’साठी तरुणांची भरती करत होता. पुण्‍यातील कोथरूडमध्‍ये मध्‍यप्रदेशातील दोघांना संशयावरून अटक झाल्‍यानंतर चालू झालेल्‍या अटक सत्रात अनेक धक्‍कादायक गोष्‍टी समोर आल्‍या. त्‍यांच्‍याकडे काडतुसे, ड्रोन यांसह तरुणांची माथी भडकावणारे साहित्‍यही आढळून आले. काहींनी बाँब बनवण्‍याचे प्रशिक्षण घेऊन सातारा आणि कोल्‍हापूर येथील जंगलात स्‍फोटांची चाचणीही केली. वेगवेगळ्‍या ५-६ संघटनांच्‍या नावाखाली हे सर्व आतंकवादी कारवाया करत असले, तरी या संघटना मूळ ‘इस्‍लामिक स्‍टेट ऑफ इराक अँड सीरिया’ (इसिस) या जगातील सर्वांत संघटित आणि क्रूर आतंकवाद्यांचा भाग आहेत. काही काळापूर्वी देशात आतंकवादी कारवाया करणारी ‘सिमी’ आणि नंतर ‘इंडियन मुजाहिदिन’ या जिहादी संघटना संपवल्‍यानंतर आता या संघटना नवीन नावे घेऊन पुनर्जन्‍म घेत आहेत.

ब्रिगेडियर हेमंत महाजन (निवृत्त)

महाराष्‍ट्र आणि पुण्‍यातील आतंकवाद्यांची अन् त्‍यांच्‍या पाठीराख्‍यांची आश्रयस्‍थाने उभी रहाण्‍यापूर्वीच नष्‍ट करायला हवीत. काही काळापूर्वी दोन समाजगटांत तेढ उत्‍पन्‍न करून महाराष्‍ट्र पेटवण्‍याचा प्रयत्न झाला. अशा घटनांमधून माथी भडकलेल्‍या तरुणांवर नजर ठेवून त्‍यांना जाळ्‍यात ओढण्‍याचे प्रयत्न अशा संघटना करत असतात. समाजविघातक घटकांना बळ मिळणार नाही, याचीही दक्षता समाजातील जाणत्‍या लोकांनी घेतली पाहिजे, तरच महाराष्‍ट्र सुरक्षित राहील.

१. पुणे – आतंकवादी अन् ‘स्‍लीपर सेल’च्‍या हिटलिस्‍टवर ?

(‘स्‍लीपर सेल’ म्‍हणजे नागरिकांमध्‍ये राहून आतंकवाद्यांना साहाय्‍य करणार्‍या लोकांचा गट)

नुकत्‍याच पकडलेल्‍या २ आतंकवाद्यांचा घातपाताचा कट उधळून लावण्‍यात यंत्रणांना यश आले असले, तरी घातपाताचा मोठा कट रचला जात आहे. आतंकवादी कारवायांना खीळ बसल्‍याने गेल्‍या काही वर्षांत घातपातापासून सुरक्षित राहिलेल्‍या पुण्‍यासह महाराष्‍ट्रात आतंकवादी अन् ‘स्‍लीपर सेल’ पुन्‍हा सक्रीय झाल्‍याने शहराला आतंकवाद्यांपासून धोका निर्माण झाला आहे. मागील वर्षभरात अन्‍वेषण यंत्रणांनी १० आतंकवाद्यांना पुण्‍यातून अटक केली आहे.

आतंकवाद्यांची पाळेमुळे पुणे शहरातील विविध भागांत खोलवर रुजल्‍याचे स्‍पष्‍ट आहे. गेल्‍या दीड-दोन वर्षांपासून पुण्‍यात वास्‍तव्‍य असलेल्‍या आतंकवाद्यांविषयी कोणत्‍याच यंत्रणेला कल्‍पना कशी नाही ? १० दिवसांत ४ आतंकवाद्यांना पुण्‍यातून अटक करण्‍यात आल्‍याने त्‍यांचा धोका अधोरेखित झाला आहे. अफाट शहरीकरण झालेल्‍या पुण्‍यात दिवसेंदिवस गुन्‍हेगारी वाढत असल्‍याने सर्वसामान्‍यांच्‍या जीवनावर परिणाम झालेला असतांना दुसरीकडे थेट आतंकवादी कारवायाही उघड होत आहेत. त्‍यामुळे कायदा आणि सुव्‍यवस्‍थेचा प्रश्‍नही गंभीर झाला आहे.

मागच्‍या दशकात पुणे शहरात कोरेगाव पार्क येथील जर्मन बेकरी, जंगली महाराज रस्‍ता आणि फरासखाना येथे बाँबस्‍फोटाच्‍या घटना घडल्‍या होत्‍या. अत्‍यंत वर्दळीच्‍या श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपति मंदिराजवळ बाँबस्‍फोटाचा प्रयत्न झाला होता. या घटनांनंतर काही वर्षे घातपातापासून सुरक्षित राहिलेल्‍या पुण्‍यात आतंकवाद्यांचा वावर काळजी वाढवणारा आहे. पुण्‍यात पूर्वी झालेल्‍या बाँबस्‍फोटांत ‘इंडियन मुजाहिदीन’चा सहभाग होता. ही संघटना वेगवेगळ्‍या नावाने पुन्‍हा सक्रीय झाल्‍याने धोका वाढला आहे.

२. आतंकवादी कारवायांसाठी कोंढवा केंद्रस्‍थानी !

वारंवार आतंकवादी सापडल्‍यामुळे पुणे शहरातील कोंढवा परिसर पुन्‍हा केंद्रस्‍थानी आला आहे. वर्षभरात पकडलेल्‍या आतंकवाद्यांपैकी बहुसंख्‍य आरोपी कोंढव्‍यात वास्‍तव्‍यास होते. कोंढव्‍यासह दापोडी, बोपोडी या भागांत आतंकवाद्यांचे ‘स्‍लिपर सेल’ सक्रीय झाले आहेत. दाट वस्‍तीत या आरोपींचा शोध घेणे यंत्रणांसाठी आव्‍हानात्‍मक असते.

राज्‍य आतंकवादविरोधी पथकाने (‘ए.टी.एस्.’ने) दापोडी परिसरातून जुनैद महंमद अता महंमद (वय २८ वर्षे, राहणार दापोडी) याला, तसेच त्‍याचा साथीदार आफताब हुसैन शाह (वय २८ वर्षे, राहणार किश्‍तवाड, जम्‍मू-काश्‍मीर) याला किश्‍तवाड येथून अटक केली होती. ‘ए.टी.एस्.’ने ‘पॉप्‍युलर फ्रंट ऑफ इंडिया’ (पी.एफ्.आय.) या बंदी घातलेल्‍या संघटनेच्‍या कोंढव्‍यातील कार्यालयावर छापा टाकून अब्‍दुल कयूम शेख (राहणार साहिल सर्वदा, कोंढवा) आणि रझी अहमद खान (राहणार अशोका मेव्‍स, कोंढवा) यांना अटक केली होती. अशोका मेव्‍स येथे पूर्वी आरोपी पकडण्‍यात आल्‍याने ही सोसायटी चर्चेत आहे. महंमद युनूस महंमद याकू साकी (वय २४ वर्षे) आणि महंमद इम्रान महंमद युसूफ खान (वय २३ वर्षे, दोघे रहाणार – चेतना गार्डन, मीठानगर, कोंढवा) या आतंकवाद्यांना कोथरूड पोलिसांच्‍या पथकाने नुकतीच अटक केली. तसेच त्‍यांना रहाण्‍यासाठी सदनिका भाड्याने देणार्‍या अब्‍दुल कादीर दस्‍तगीर पठाण (वय ३२ वर्षे, राहणार कोंढवा) याला ‘ए.टी.एस्.’ने अटक केली.

३. पुण्‍यात शिकलेला नामवंत रुग्‍णालयातील भूलतज्ञ; पण कृत्‍य भयंकर !

राष्‍ट्रीय अन्‍वषेण यंत्रणेने (‘एन्.आय.ए.’ने) ‘इस्‍लामिक स्‍टेट’च्‍या (इसिस) मॉड्यूल प्रकरणी डॉ. अदनान अली सरकार (वय ४३) याला कोंढवा परिसरातून २७ जुलै या दिवशी अटक केली. मुंबई, ठाणे आणि पुणे येथून यापूर्वी ताबिश नासीर सिद्दीकी, जुबेर नूर महंमद शेख अबू नुसैबा, शरजील शेख आणि झुल्‍फिकार अली बडोदावाला यांना अटक करण्‍यात आली आहे. हडपसर भागातील एका नामवंत वैद्यकीय रुग्‍णालयात भूलतज्ञ असलेला डॉ. अदनान अली सरकार हा ‘इस्‍लामिक स्‍टेट’च्‍या महाराष्‍ट्र मॉड्यूलचा प्रमुख असल्‍याचे अन्‍वेषणात उघडकीस आले आहे. ‘इसिस’शी संबंधित देशभरात आतापर्यंत अटक केलेल्‍यांचा डॉ. सरकार याच्‍याशी संबंध कसा आला ?’, याचे अन्‍वेषण ‘एन्.आय.ए.’ने चालू केले आहे.

‘एन्.आय.ए.’ने डॉ. सरकार याच्‍या कोंढव्‍यातील घरावर छापा टाकल्‍यावर त्‍याच्‍या घरातून लॅपटॉप, हार्डडिस्‍क, सीमकार्ड, तसेच इसिसशी संबंधित काही कागदपत्रे जप्‍त करण्‍यात आली आहेत. डॉ. सरकार तरुणांची माथी भडकावून त्‍यांना ‘इसिस’मध्‍ये भरती करत असल्‍याची माहिती प्राथमिक अन्‍वेषणात निष्‍पन्‍न झाली. डॉ. अदनान अली गेल्‍या १५ वर्षांपासून वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत असून त्‍याने पुण्‍यातील वैद्यकीय महाविद्यालयातून अभ्‍यासक्रम पूर्ण केला आहे.

४. ‘ग्राफिक्‍स डिझायनर’ म्‍हणून आतंकवाद्यांचा वावर !

कोथरूड पोलिसांनी पकडलेल्‍या २ आतंकवाद्यांचा म्‍होरक्‍या महंमद शहनवाज आलम (वय ३१) हाच असल्‍याची माहिती पोलिसांना अन्‍वेषणात मिळाली आहे. तिघे आतंकवादी पुण्‍यात काही घातपात घडवणार होते. आलमचा शोध घेण्‍यात येत असून ‘एन्.आय.ए.’ आणि ‘ए.टी.एस्.’ या प्रकरणाचे समांतर अन्‍वेषण करत आहेत. ‘एन्.आय.ए.’ शोध घेत असलेल्‍या दोघा आतंकवाद्यांना पुणे पोलिसांच्‍या पथकाने २४ जुलैच्‍या मध्‍यरात्री अटक केली. कोथरूड पोलिस ठाण्‍यातील शिपाई प्रदीप चव्‍हाण आणि अमोल नजन कोथरूडमधील शास्‍त्रीनगर परिसरात मध्‍यरात्री गस्‍त घालत असतांना तिघे जण दुचाकी चोरण्‍याच्‍या सिद्धतेत दिसले. संशयावरून खान आणि साकी यांना कह्यात घेण्‍यात आले. त्‍या वेळी आलम पसार झाला.

स्‍फोटके बाळगल्‍याप्रकरणी ‘एन्.आय.ए.’ने त्‍यांच्‍याविरुद्ध गुन्‍हा नोंदवल्‍यानंतर दीड वर्षापासून ते कोंढव्‍यात वास्‍तव्‍यास असल्‍याचे समोर आलेे. आलम याच्‍या इशार्‍यावर साकी आणि खान काम करत असल्‍याचा संशय आहे. आलम याचे नाव पहिल्‍यांदाच समोर आले आहे.

साकी आणि खान ‘ग्राफिक्‍स डिझायनर’ म्‍हणून वावरत होते. या कामाच्‍या बहाण्‍याने ते विविध ठिकाणी वावरत होते. राज्‍य आतंकवादविरोधी पथकाने गेल्‍या वर्षी कोंढव्‍यात छापा टाकून बंदी असलेल्‍या ‘पॉप्‍युलर फ्रंट ऑफ इंडिया’ (पी.एफ्.आय.)च्‍या दोघांना अटक केली होती, तसेच दापोडीतून जुनैद महंमद अता महंमद याला अटक केली होती.

५. ड्रोनच्‍या साहाय्‍याने घातपात ?

महंमद साकी आणि महंमद खान यांच्‍या कोंढव्‍यातील घरी ड्रोनचे साहित्‍य सापडल्‍याने हे आतंकवादी ड्रोनच्‍या साहाय्‍याने काही घातपात करणार होते का ? या दृष्‍टीने अन्‍वेषण करण्‍यात येत आहे. पुण्‍यासारख्‍या शांत शहरात वर्ष २०१० मध्‍ये झालेल्‍या जर्मन बेकरी स्‍फोटात १७ जणांचा मृत्‍यू, तर ५७ जण घायाळ झाले होते. खरे तर हा एक धक्‍काच होता. त्‍यातील आरोपींनाही आता १३ वर्षांनंतर इतक्‍या विलंबाने शिक्षा होत आहे. या घटनेनंतर बराच काळ लोटल्‍यामुळे असेल कदाचित्; पण आतंकवादविरोधी पथक आणि पुणे पोलीस यांना गुंगारा देणारे २ आतंकवादी कोथरूडसारख्‍या परिसरात पकडले जाणे, हे ‘पुणे वाटते तितके सुरक्षित नाही’, हेच सिद्ध करते. नुकताच ४ मे या दिवशीही सहकारनगर परिसरात ‘इलेक्‍ट्रिक्‍स’च्‍या दुकानात प्रचंड मोठा स्‍फोट झाला आहे. या स्‍फोटामध्‍ये झालेली मोठी हानी पहाता आतंकवादविरोधी पथकाने याचे अन्‍वेषण चालू केले. या पार्श्‍वभूमीवर पुण्‍यात गाड्यांमध्‍ये स्‍फोट करण्‍याच्‍या हेतूने आलेल्‍या २ आतंकवाद्यांना अटक होणे, हे गंभीर आहे. पुण्‍यात यापूर्वी बंदी घातलेल्‍या जिहादी संघटना ‘सिमी’चेही जाळे आढळले होते आणि तिच्‍या आतंकवाद्यांनाही अटक झाली होती. अर्थातच काही स्‍थानिकांच्‍या (‘स्‍लिपर सेल’च्‍या) साहाय्‍याविना अशा कारवाया शक्‍य नसतात, हे स्‍पष्‍टच आहे. काही वर्षांपूर्वी येथूनच ‘इसिस’मध्‍ये सहभागी होण्‍यासाठी जाणार्‍या एका धर्मांध विद्यार्थिनीवर कारवाई न करता तिचे समुपदेशन केले होते. पुण्‍यात ५ सहस्रांहून अधिक बांगलादेशी आहेत. बांगलादेशीही अत्‍यंत कमी किमतीत आतंकवादी कृत्‍ये करतात.

६. नागरिकांनी सतर्क आणि संघटित रहाणे आवश्‍यक !

पुण्‍यासारख्‍या बुद्धीवंतांच्‍या शहरातील नागरिकांनीही सतर्क रहाण्‍याच्‍या दृष्‍टीने आणि आतंकवाद्यांच्‍या विरोधात संघटित होण्‍याच्‍या दृष्‍टीने कृतीशील रहाणे, ही काळाची आवश्‍यकता आहे. ‘आपल्‍या आजूबाजूला काय घडत आहे ? धर्मांधांच्‍या वस्‍त्‍यांमध्‍ये काय घडत आहे ?’, यांविषयी सर्वांनीच जागरूकता बाळगायला हवी. पुण्‍यात घरमालक बरेच आहेत. त्‍यांनी ‘आपण कोण भाडेकरू ठेवत आहोत ?’, याविषयी पोलिसांना माहिती देणे अत्‍यावश्‍यक आहे. आतंकवाद्यांनी आता त्‍यांचे रंग-रूपही पालटल्‍याने ते हिंदूच वाटतात. त्‍या दृष्‍टीनेही सर्वांची सतर्कता हवी. पुणे पोलिसांकडून ना बांगलादेशींवर गांभीर्याने कारवाई होत आहे, ना आतंकवाद्यांच्‍या साहाय्‍यकांवर ! आता पकडलेल्‍या २ आतंकवाद्यांचा म्‍होरक्‍या पसार झाला आहे, त्‍याला पकडणे आवश्‍यक आहे. बांगलादेशी घुसखोर आणि ‘स्‍लिपर सेल’ यांच्‍याविषयी पोलीस प्रशासनाची निष्‍क्रीयता अन्  नागरिकांची उदासीनता, हेच याला मुख्‍य कारणीभूत आहे. विद्येचे माहेरघर पुणे आतंकवादाच्‍या सावटाखाली येऊ न देण्‍याच्‍या आव्‍हानाकडे गांभीर्याने घ्‍यावे लागेल.

– ब्रिगेडियर हेमंत महाजन (निवृत्त), पुणे. (१.८.२०२३)

संपादकीय भूमिका 

बांगलादेशी घुसखोर आणि ‘स्‍लिपर सेल’ यांच्‍याविषयी पोलीस प्रशासनाची निष्‍क्रीयता हेच आतंकवाद्यांचे मर्मस्‍थान !