रत्नागिरी – कोकणात गणेशोत्सव उत्साहात साजरा करण्यात येतो. कोकणात येणार्या गणेशभक्तांमुळे अनुमाने २ सहस्र २०० जादा गाड्या मुंबईतून येणार आहेत. गणेशोत्सवासाठी आलेल्या गणेशभक्तांना परत जाण्यासाठी रत्नागिरी विभागातून १ सहस्र ५५० जादा गाड्यांचे नियोजन करण्यात आले असून २७९ गाड्यांचे आरक्षण पूर्ण झाले आहे, अशी माहिती राज्य परिवहन महामंडळाच्या रत्नागिरी विभागाचे विभागप्रमुख प्रज्ञेश बोरसे यांनी दिली.
विभागप्रमुख प्रज्ञेश बोरसे पुढे म्हणाले,
१. रत्नागिरी विभागातील ९ आगारांतून बोरीवली, मुंबई, ठाणे, विठ्ठलवाडी, नालासोपारा, विरार, भांडूप, भाईंदर, पुणे मार्गावर जादा गाड्यांचे नियोजन करण्यात आले आहे.
२. प्रवाशांच्या मागणीनुसार गट आरक्षणच्या (ग्रुप बुकींगच्या) गाड्याही उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.
३. प्रत्येक बसस्थानक, तसेच खासगी आरक्षण केंद्राकडे आरक्षण सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच भ्रमणभाषद्वारेही प्रवाशांना ‘ऑनलाईन’ आरक्षण करता येणार आहे.
४. प्रवाशांच्या मागणीनुसार जादा गाड्यांची संख्या वाढवण्यात येणार आहे.
५. दिनांक १९ सप्टेंबरपासून गणेशोत्सव चालू होत असल्याने १५ सप्टेंबरपासून जादा गाड्यांचे आगमन रत्नागिरीत होणार आहे.
६. दिनांक २३ सप्टेंबरपासून परतीसाठी एस्.टी.च्या गाड्या सोडण्यात येणार आहेत.
७. दापोली आगारातून २००, खेड १५०, चिपळूण २३०, गुहागर २६०, देवरुख १८०, रत्नागिरी १५०, लांजा १३०, राजापूर १७०, मंडणगड आगारातून ८० मिळून एकूण १ सहस्र ५५० जादा गाड्यांचे नियोजन करण्यात आले आहे.