पू. भिडेगुरुजी यांच्यावरील कारवाईसाठी विधानसभेत विरोधकांचा पुन्हा गदारोळ !

मुंबई, २ ऑगस्ट (वार्ता.) – श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संघटनेचे संस्थापक पू. संभाजीराव भिडेगुरुजी यांनी गांधीजी यांच्याविषयी केलेल्या वक्तव्यावरून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील शरद पवार गटाचे नेते यांनी सभागृहात गदारोळ केला. या वेळी विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी ‘यापूर्वी हा विषय सभागृहात उपस्थित केला असतांना पुन्हा पुन्हा तोच विषय मांडता येणार नाही’, असे सांगितले. या वेळी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कारवाईची माहिती सभागृहात दिली; मात्र विरोधकांनी गोंधळ चालू ठेवून सभात्याग केला.

(सौजन्य : Maharashtra Times । महाराष्ट्र टाइम्स)

‘राष्ट्रीय नेत्याविषयी कुणीही अवमानकारक वक्तव्य केल्यास पोलीस कारवाई केली जाईल. वीर सावरकर यांच्यावरही काँग्रेसचे मुखपत्र ‘शिदोरी’ मध्ये ‘माफीवीर’ आणि समलैंगिक असल्याचे म्हटले आहे. या प्रकरणीही गुन्हा नोंदवण्यात येईल’, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात आणि नाना पटोले यांनी सभागृहात पू. भिडेगुरुजी यांच्यावर कारवाई करण्याचा विषय सभागृहात उपस्थित केला; मात्र अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी लक्षवेधी सूचनांचा वेळ असल्याचे सांगून नियमानुसार वेळ देता येणार नसल्याचे सांगितले.

(सौजन्य : TV9 Marathi) 

या वेळी काँग्रेसच्या नेत्या यशोमती ठाकूर आणि आमदार पृथ्वीराज चव्हाण यांना धमकी आल्याचे सांगितले. याविषयी अध्यक्षांनी या दोघांना बोलण्यास अनुमती दिली. या वेळी बाळासाहेब थोरात यांनी पू. भिडेगुरुजी यांच्या नावाचा एकेरी उल्लेख करत ते विकृत गृहस्थ असल्याचे म्हटले.

काँग्रेसच्या मुखपत्रामधील स्वातंत्र्यवीर सावरकर यांवरील लिखाणाविरोधात गुन्हा नोंदवणार ! – देवेंद्र फडणवीस

पू. भिडेगुरुजी यांनी अमरावती येथे सहकार्‍याला पुस्तक वाचायला लावले. ही पुस्तके एस्.के. नारायणाचार्य आणि घोष यांची पुस्तके होती. हे दोघेही काँग्रेसचे नेते असल्याचे भिडेगुरुजी यांचे म्हणणे आहे. या प्रकरणी २ जणांवर गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलिसांनी पाठवलेली नोटीस त्यांनी स्वीकारली आहे. हे लिखाण ‘कुराण अँड फकीर’ या पुस्तकातील २० व्या प्रकरणातील आहे. पोलिसांनी या कार्यक्रमाचा मूळ व्हिडिओ उपलब्ध झाला नसल्याचे सांगितले. संभाजी भिडेगुरुजी हे हिंदुत्वाकरता काम करतात. ते छत्रपती शिवाजी महाराज आणि किल्ले यांच्याशी बहुजन समाजाला जोडतात. त्यांच्या वक्तव्यावरून गुन्हा नोंद करण्यात आला आहे. यशोमती ठाकूर आणि पृथ्वीराज चव्हाण यांना धमकी देणार्‍यांचा शोध घेऊन त्यांना कारागृहात टाकण्यात येईल

(म्हणे) संभाजी भिडे बहुजनांच्या मुलांना भरकटवत आहे ! – आमदार पृथ्वीराज चव्हाण, काँग्रेस

संभाजी भिडे हा ‘फ्रॉड’ माणूस आहे. त्याने कुठे शिक्षण घेतले ? हा माणूस सोने गोळा करत आहे. सर्वांकडून एक ग्रॅम सोने गोळा करतो. गडदुर्ग मोहिमेसाठी हे सोने गोळा करत आहे. बहुजनांच्या मुलांना हा माणूस भरकटवत आहे.

पू. भिडेगुरुजी आमच्यासाठी ‘गुरुजीच’ ! – देवेंद्र फडणवीस

या वेळी उत्तर देतांना गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पू. संभाजी भिडेगुरुजी यांचा ‘भिडेगुरुजी’ असा उल्लेख केला. यावर पृथ्वीराज चव्हाण यांनी आक्षेप घेतला.

त्यावर देवेंद्र फडणवीस यांनी ‘भिडेगुरुजी हे आमच्यासाठी गुरुजीच आहे. त्यांचे नावच भिडेगुरुजी आहे. तुमचे नाव ‘पृथ्वीराजबाबा’ असे आहे, तर ‘बाबा’ या नावाविषयी आम्ही पुरावा मागायचा का ?’ असा प्रश्न उपस्थित केला.