६ मासांत ५ सहस्र कोटी रुपयांचे लिपस्टिक, नेलपॉलिश यांची विक्री
(वर्क फ्रॉम होम म्हणजे घरून कार्यालयीन काम करण्याची पद्धत)
नवी देहली – ‘वर्क फ्रॉम होम’ संपताच सौंदर्य उत्पादने महागली आहेत. गेल्या ६ मासांत ५ सहस्र कोटी रुपयांचे लिपस्टिक, नेलपॉलिश आणि आयलायनर यांची विक्री झाली आहे. देशातील मुख्य १० शहरांमध्ये १० कोटींपेक्षा अधिक वस्तू विकल्या गेल्या आहेत. ‘कंटार वर्ल्डपॅनेल’ या आंतरराष्ट्रीय आस्थापनाने केलेल्या एका अभ्यासात ग्राहकांनी सौंदर्य उत्पादनांवर ५ सहस्र कोटी रुपयांपेक्षा अधिक रक्कम खर्च केल्याचे उघड झाले. यामध्ये ४० टक्के वस्तू ‘ऑनलाइन’ पद्धतीने खरेदी करण्यात आल्या आहेत.
‘कंटार वर्ल्डपॅनेल’च्या दक्षिण आशिया विभागाचे व्यवस्थापकीय संचालक के. राधाकृष्णन् म्हणाले, ‘कार्यालये उघडल्यामुळे अधिकाधिक महिला कर्मचारी कामावर जाऊ लागल्या आहेत. त्यामुळे सौंदर्य उत्पादनांची मागणी वाढत आहे.’