मुंबई – ‘आयुष्मान भारत डिजिटल मिशन’चा भाग म्हणून भारत सरकारने ‘डिजिटल हेल्थ कार्ड’ हा उपक्रम चालू केला आहे. राज्यातील सर्व नागरिकांसाठी हेल्थ कार्ड आवश्यक आहे. त्यामुळे सर्व नागरिकांनी ‘आभा कार्ड’साठी नोंदणी करावी, असे आवाहन सार्वजनिक आरोग्य विभागाने केले आहे. ‘आभा कार्ड’ नावाने डिजिटल स्वरूपातील आरोग्य ओळखपत्र मिळणार असून यावर वैद्यकीय इतिहास, चाचणी तसेच केलेले उपचार इत्यादी माहिती साठवली जाणार आहे. ही सर्व माहिती डिजिटल स्वरूपात या कार्डवर असल्याने नागरिक, आधुनिक वैद्य, तसेच वैद्यकीय कर्मचारी यांना रुग्णाची पार्श्वभूमी, मागील आजार, निदान, उपचार आदींची माहिती जलद आणि सोयीस्करपणे समजण्यास साहाय्य होणार असल्याने वेळेची बचत होईल. ‘डिजिटल हेल्थ मिशन’ अंतर्गत प्रत्येक व्यक्तीसाठी ‘युनिक हेल्थ कार्ड’ बनवले जाणार आहे. ‘आभा कार्ड’साठी आधार क्रमांक आणि त्याच्याशी संलग्न असलेला भ्रमणभाष क्रमांक आवश्यक आहे. ऑनलाईन उपचार, टेलीमेडिसिन, ई-फार्मसी, पर्सनल हेल्थ रेकॉर्ड इत्यादी सुविधा यामध्ये नागरिकांना मिळतील, तसेच व्यक्तीला मेडिकल रिपोर्ट किंवा रेकॉर्ड सहजपणे रुग्णालये, मेडिकल, इन्शुरन्स यांना देता येईल. ‘नॅशनल डिजिटल हेल्थ मिशन’च्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन आवश्यक ती माहिती भरून हे कार्ड बनवता येईल.