सध्या मणीपूरमध्ये चालू असलेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर विशेष लेख !
या लेखात आपण ‘म्यानमार- थायलंड-लाओस’ या ‘गोल्डन ट्रायंगल’ (सुवर्ण त्रिकोण) मार्गे मणीपूर आणि मिझोराम या २ राज्यांतून येऊन संपूर्ण भारतात होणारी अमली पदार्थांची तस्करी, म्यानमारहून भारतात होणारी सुपारीची तस्करी आणि त्यातून निर्माण होणारा अन् विविध आतंकवादी संघटनांच्या हातात खेळणारा अफाट पैसा यांचा मणीपूरमधील सध्याच्या अशांततेशी काय संबंध आहे ? याचा आढावा घेऊ.
१. अमली पदार्थांच्या व्यापाराचा ‘गोल्डन ट्रायंगल’
म्यानमार-थायलंड-लाओस या भागाला अमली पदार्थांच्या व्यापाराचा ‘गोल्डन ट्रायंगल’ (सुवर्ण त्रिकोण) म्हणतात. थायलंडचा (कु)प्रसिद्ध पर्यटन उद्योग, तेथे संभोग (सेक्स) आणि अमली पदार्थ यांसाठी येणार्या जगभरातील लाखो श्रीमंत पर्यटकांना हा ‘गोल्डन ट्रायंगल’ अमली पदार्थ पुरवतो. एकेकाळी म्यानमार यात आघाडीचा उत्पादक होता; पण आँग सान सु की यांचे सरकार उलथवून म्यानमारच्या (बर्मीज) सैन्याने स्वतःच्या हातात सत्ता घेतल्यावर गैरबौद्ध काचीन, शान, कारेन, चीन या समुदायांवर स्वतःची जरब बसवण्यास प्रारंभ केला. सतत युद्धरत असलेले हे पहाडी ख्रिस्ती अफू-गांजा लागवड करून आपापल्या आतंकवादी संघटना चालवतात. याचा म्यानमारच्या सैन्याला मोठा त्रास होतो. सैनिकी शासन असल्याने मानवाधिकार वगैरेंशी सैन्याच्या सरकारला काहीही सुवेरसुतक नाही. त्यामुळे म्यानमारच्या सैन्याने पहाडी भागांतील ‘ख्रिस्ती अफू व्यापाराकडे’ स्वतःची दृष्टी वळवली. येथील अफू-गांजा लागवड उद़्ध्वस्त करायला घेतल्यावर या अमली पदार्थ उत्पादक समूहांनी स्वतःची दृष्टी मणीपूरच्या डोंगराळ भागाकडे वळवली.
२. म्यानमार-मणीपूर सीमा आणि अफू-गांजा लागवड
म्यानमार-मणीपूर यांच्यात ३९८ कि.मी. लांबीची घनदाट जंगलांनी आणि उंच पहाडांनी भरलेली आंतरराष्ट्रीय सीमा आहे. बर्मीज सैन्याच्या कठोर भूमिकेमुळे पसार झालेले अफू व्यापारी मणीपूरच्या कुकी-नागा भागामध्ये आले आणि येथे प्रचंड प्रमाणात असलेल्या संरक्षित वनांचा नायनाट करत अफू-गांजाची लागवड करू लागले. म्यानमारमधील तुटलेली अमली पदार्थांच्या उत्पादनाची साखळी मणीपुरी पहाडी भागाच्या साहाय्याने परत एकदा स्थिरस्थावर झाली आणि येथे निर्माण झालेला अफू-गांजा म्यानमारच्या शान राज्यातील अमली पदार्थांच्या प्रयोगशाळेत प्रक्रिया होऊन त्याचे ‘हाय व्हॅल्यू फिनिश प्रॉडक्ट’ (उच्च मूल्याची प्रक्रिया पूर्ण केलेले उत्पादन) बनून ते ‘गोल्डन ट्रायंगल’मध्ये प्रवेश करू लागले. मणीपूरच्या तांगखुल नागा आणि कुकी भागामध्ये सिद्ध होणारा काही कच्चा माल अन् शान राज्यात सिद्ध झालेला बराच पक्का माल आसाम मार्गे उर्वरित भारतात येतो. मणीपूरचे माजी पोलीस महासंचालक पी. दौंडेल यांनी हतबल होऊन ‘मणीपूर हा ‘ड्रग गोल्डन ट्रायंगल’च (अमली पदार्थांचा सुवर्ण त्रिकोण) पीडित राज्य आहे’, असा नुकताच उल्लेख केला होता तो, यामुळेच !
३. मणीपूरच्या अमली पदार्थांच्या लागवडीचा विस्तार
वर्ष १९९० च्या आसपास मणीपूरच्या उखरूल जिल्ह्यात आणि सेनापती जिल्ह्याच्या सदर हिल्सच्या सैकुलमध्ये अफूची लागवड होत होती. तिचा व्याप बघता बघता वाढत गेला. सध्या वार्षिक ७९.७८ टक्क्यांनी अफूची लागवड आणि उत्पादन वाढत आहे, असा मणीपूर सरकारचा अंदाज आहे. आता चंडेल, चुराचांदपूर, सेनापती जिल्ह्यात कौबुरु हिल्स, सदर हिल्स, तामेन्गलॉन्ग जिल्ह्याचा मोठा भाग अफूच्या उत्पादनात आघाडीवर आहेत.
उखरूल आणि चंडेल जिल्ह्यांच्या पलीकडे म्यानमारचा सागाईंग मंडळ अन् चुराचांदपूरच्या पलीकडे ‘चीन राज्य’ आहे, हा अखंड भाग आता ‘अफू उत्पादनाचा पट्टा’ म्हणून उदयाला आलेला आहे. ‘चीन राज्या’चे मुख्यमंत्री सलाई लिआन लुआई, त्यांच्या ‘आँग सान सु की’च्या पक्षाचे २४ आमदार आणि अन्य १० सहस्र नागरिक यांच्यासह म्यानमार सैन्याच्या कारवाईला घाबरून वर्ष २०२१ मध्ये शरणार्थी म्हणून मिझोराममध्ये आले होते.
आसाम रायफल्सच्या म्हणण्याप्रमाणे वर्ष २०२२ मध्ये मिझोराममध्ये ३५५ कोटी रुपयांचे अमली पदार्थ पकडले होते. तोच आकडा वाढून वर्ष २०२३ च्या पहिल्या ६ मासांत ६०३ कोटी रुपये झाला आहे.
४. अफू लागवडीत कुकींचा वाटा
मणीपूरच्या पहाडी जातींपैकी एक असलेल्या कुकींचा अफू लागवडीत सर्वांत मोठा वाटा आहे. वर्ष २०१७-१८ मध्ये कुकी-चीन भागात २ सहस्र १ एकर जागेवर, तर मणीपूरच्या नागा भागात २२९ एकर अफूची लागवड होत होती. ती वाढत जाऊन वर्ष २०२०-२०२१ ला कुकी-चीन भागात ३ सहस्र ८७१ एकर, तर नागा भागात ७६३ एकर जागेत होऊ लागली. राखीव आणि सरकारी जंगले तोडून तेथे लावलेल्या अफूच्या विरोधात मणीपूरचे मुख्यमंत्री एन्. बिरेन सिंह यांच्या सरकारने मोठी कारवाई केली. त्यानंतर आता वर्ष २०२२-२३ ला कुकी-चीन भागात ८०४ एकर जागेवरील अफू लागवड शेष आहे; पण नागा भागात ती वाढून ३५० एकर जागेवर शेष आहे. गेल्या काही वर्षांत मणीपूर सरकारच्या कारवाईत अनुमाने ५ सहस्र एकरवरील अफूची लागवड उद़्ध्वस्त करण्यात आली. वरील आकड्यात दिसणारी घट हा त्याचाच परिणाम आहे; पण एकूण घट तेवढी न दिसण्यामागे कारण म्हणजे नव्या भागात उत्पापदन करणे, हे असू शकते.
मणीपूरमध्ये अफूपासून उच्च प्रतीचे अन्य पदार्थ सिद्ध करणारे १० कारखाने वर्ष २०१९ पासून आजपर्यंत शोधून उद़्ध्वस्त करण्यात आले आणि त्यांतून आतापर्यंत २ सहस्र ५०० कोटी रुपयांच्या आसपास ‘हेरॉईन’ जप्त करण्यात आले आहे. हे हेरॉईन मणीपूरहून उत्तरप्रदेश, बिहार आणि अगदी महाराष्ट्रापर्यंत जाते.
५. म्यानमारी सुपारीची भारतात होणारी तस्करी
२४ जून २०२३ या दिवशी अंमलबजावणी संचालनालयाने (‘ईडी’ने) नागपूर (महाराष्ट्र) येथून असीम बावला नावाच्या एका व्यक्तीला अटक केली. त्याच्यावर म्यानमारची सुपारी भारतात आयात करून सीमा शुल्क चुकवल्याचा आरोप आहे. बावला याच्यासह नागपूरचे अन्य अनेक व्यापारी, आसामचे व्यापारी, वाहतूक आस्थापने अन् आसाममधील गोडाऊनचे मालक अशी एक मोठी साखळी यात गुंतलेली आहे. नागपूरहून आसामला मोठ्या प्रमाणात पैसे पाठवल्याचे अन्वेषण करतांना सीबीआय, आयकर विभाग आणि महसूल गुप्त संचालक यांना कोट्यवधींची उलाढाल असलेल्या व्यापाराचा सुगावा प्रारंभीच लागला आणि मग याचे अन्वेषण करतांना यंत्रणा असीम बावलापर्यंत पोचल्या.
म्यानमारची सुपारी अत्यल्प दरात मिळते आणि ती प्रत्यक्ष जागेवर भारतीय सुपारीच्या १० ते २५ टक्के अल्प किमतीत मिळते. त्यामुळे ती इतक्या लांबून आणूनही स्वस्त मिळते. आयात सुपारीवर विविध कर आकारून तिचे मूल्य भारतीय सुपारीच्या स्तरावर पोचते; म्हणून ती चोरट्या मार्गाने अनधिकृतपणे मणीपूर-मिझोराम मार्गे आसामला येऊन तेथून सर्व भारतात पोचते. अशा प्रकारची सुपारी आणतांना या जाळ्यातील व्यापारी खोटी देेयके सिद्ध करून ती ‘आसामची सुपारी’ म्हणून कागदपत्रे सिद्ध करून तिची वाहतूक करतात. यातून भारत सरकारला प्रतिवर्षी शेकडो कोटी रुपयांच्या कर उत्पन्नाची आर्थिक हानी सहन करावी लागते. एका अंदाजानुसार भारतात जागोजागी मिळणारा निम्म्यापेक्षा अधिक गुटखा आणि पान मसाला यांत म्यानमारच्या सुपारीचा वापर होतो, याचा नेमका अंदाज लागू शकत नाही; कारण ही सुपारी तस्करीच्या मार्गाने आणतांना खोटी देयके आणि कागदपत्रे सिद्ध केली जातात.
६. सुपारी-अमली पदार्थ तस्करीमुळे आसाम आणि मिझोराम पोलीस यांच्यात झालेला संघर्ष !
२८ जुलै २०२१ या दिवशी आसामच्या हैलाकांदी आणि मिझोरामच्या कोलासीब जिल्ह्यांच्या सीमेवर आसाम अन् मिझोराम पोलीस यांच्यात राज्याच्या सीमेवरून वाद झाला. आसाम पोलिसांनी आसामच्या भूमीवर केलेली अतिक्रमणे हटवण्यास प्रारंभ केला. याला प्रत्युत्तर म्हणून मिझोराम पोलिसांनी आणि स्थानिक सशस्त्र तरुणांनी आसाम पोलिसांवर अत्याधुनिक शस्त्रांनी भीषण गोळीबार केला. यात आसामचे ५ पोलीस ठार झाले आणि १२ पोलीस घायाळ झाले.
या घटनेमागे मिझोराम मार्गे सुपारी आणि अमली पदार्थ यांच्या तस्करीवर आसाम पोलिसांकडून केली जाणारी कारवाई, हे मुख्य कारण होते. मिझोराम मार्गे येणारी म्यानमारची सुपारी आसामच्या सुपारीच्या मूल्यावर मोठा परिणाम करते. यामुळे आसाम सरकारने मिझोराम मार्गे होणारी सुपारीची तस्करी मोठ्या कारवाया करून बंद केली. ही तस्करी मिझोराम पोलीस, सरकारी अधिकारी आणि म्यानमारचा ‘चीन’ आतंकवादी गट यांच्या संगनमताने होते. यामुळे तस्करीविरुद्ध आसाम पोलिसांनी केलेल्या कारवाईला मिझोराम पोलिसांनी स्वतः उत्तर दिले, असे म्हणायला मोठा वाव आहे.
७. म्यानमारचे ख्रिस्ती आतंकवादी गट, अमली पदार्थ कारखानदार आणि व्यापारी यांचा मणीपूर सरकारवरील राग
म्यानमारच्या १७ प्रमुख ख्रिस्ती आतंकवादी संघटनांची एकत्रित सशस्त्र केडर्स संख्या १ लाख २५ सहस्रांच्या जवळपास आहे. ‘म्यानमार- थायलंड-लाओस’ या अमली पदार्थांच्या व्यापाराच्या ‘गोल्डन ट्रायंगल’मध्ये म्यानमारमधील शान राज्य ‘अफू प्रोसेसिंग हब’ (अफू प्रकिया केंद्र) म्हणून प्रसिद्ध आहे. म्यानमारचे चीन राज्य आणि सागाईंग मंडळ हे मणीपूरच्या डोंगराळ भागांना भौगोलिकदृष्ट्या जोडलेले असल्याने हा संपूर्ण भाग नव्या राजकीय स्थितीत नव्याने निर्माण झालेला ‘अफू-गांजा उत्पादन क्षेत्र’ म्हणून उदयाला आले आहे. या सर्व गटांचे सव्वा लाख सैनिक पोसणे, त्यांना अत्याधुनिक शस्त्रांनी सज्ज ठेवणे, त्यांची कुटुंबे पोसणे यांसाठी त्यांना लागणारा अफाट पैसा अफू लागवड आणि अमली पदार्थ प्रक्रियेमधून निर्माण होतो.
साहजिकच मणीपूरच्या एन्. बिरेन सिंह सरकारने याविरुद्ध आघाडी उघडल्यावर मणीपूर सरकारला अद्दल घडवण्यासाठी हे कोट्यधीश आतंकवादी गट एका संधीच्या शोधात होते. मैतेई हिंदूंना अनुसूचित जमातीच्या (‘शेड्युल्ड ट्राईब’च्या) सूचीत समाविष्ट करण्यासंबंधी मणीपूर उच्च न्यायालयाचा निर्णय आल्यावर त्यांना हवे असलेले निमित्त मिळाले आणि त्यांनी त्यांचा डाव साधला. हे निमित्त मिळाले नसते, तर अन्य काही कारण शोधून हा हिंसाचार घडवला गेला असता.
८. मणीपूर हिंसाचारामागील आंतरराष्ट्रीय षड्यंत्र
वर्ष २०२१ मध्ये आसाम आणि मिझोराम पोलीस यांच्यातील संघर्षानंतर ट्विटरवर ‘#ShameOnAssam’ या हॅशटॅगसह ७६ सहस्र १०० ट्वीटस करण्यात आले. त्यांपैकी ४३ सहस्र ३०० ट्वीट्स, म्हणजे एकूण ट्वीटच्या ५६.८९ टक्के ट्वीटस एकट्या उत्तर अमेरिकेतून करण्यात आले होते. त्याच काळात ‘#ShameOnHimantaBiswa’ हा हॅशटॅग सुद्धा चालवला गेला. त्याला मिळालेला प्रतिसादसुद्धा अमेरिकेतून ‘निर्माण’ झाला. कुकी-चीन-झो हे बाप्टिस्ट-प्रेसबिटेरियन ख्रिस्ती आहेत आणि यांच्या सगळ्या कारवाया अमेरिकेतून चालतात.
मणीपूरमध्ये हिंसाचार चालू झाल्यानंतर ‘कुकी सॉलिडॅरिटी फोरम’ सदृश संघटनेच्या नावाने ‘जंगील लिम (कोरियन पासपोर्ट)’, ‘थालका लुकाझ जेकब (पोलिश पासपोर्ट)’ आणि ‘अँजेल मिशास (ऑस्ट्रेलियन पासपोर्ट)’ या ३ व्यक्ती काही अमेरिकन मणीपुरींना समवेत घेऊन १२ आणि १४ मे २०२३ या दिवशी मणीपूरमध्ये आल्या. केंद्रीय अन्वेषण यंत्रणांनी त्यांची नोंद घेऊन योग्य कारवाई केली. त्यांची मणीपूर भेट चर्चप्रायोजित होती आणि येथील परिस्थिती लवकर पूर्वपदावर येऊ नये अन् बिघडलेल्या स्थितीचा आंतरराष्ट्रीय पटलावर भारतविरोधी प्रचारासाठी अधिकाधिक लाभ उठवून घ्यावा, यांसाठी त्यांनी काय केले, हे आपल्याला युरोपीयन संसदेत पारित झालेल्या ‘मणीपूर ठरावा’वरून लक्षात येऊ शकते.
(क्रमश: पुढच्या सोमवारी)
– श्री. विनय जोशी, सामरिक शास्त्र विश्लेषक
(हा लेख श्री. विनय जोशी यांच्या ‘फेसबुक’ खात्यावरून घेतला असून त्यासाठी ‘सनातन प्रभात’ नियतकालिक समूह त्यांचा आभारी आहे. – संपादक)
संपादकीय भूमिकासरकारने सीमाभागांत चालू असलेली अमली पदार्थांची निर्मिती आणि तस्करी यांचे जाळे उद़्ध्वस्त करणे आवश्यक ! |