मुंबई, २९ जुलै (वार्ता.) – राज्यातील बालगृहांच्या पडताळणीसाठी कृती दलाची स्थापना करावी आणि या कृती दलाने प्रति ३ मासांनी बालगृहांचा अहवाल शासनास सादर करावा. जळगाव येथे मुलींच्या वसतीगृहातील घडलेल्या घटनेचा कृती दलाने मासाभरात अहवाल सादर करावा, असे निर्देश महिला आणि बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिले. मंत्री तटकरे यांच्या अध्यक्षतेखाली जळगाव येथील मुलींच्या वसतीगृहातील येथे ५ अल्पवयीन मुलींवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेच्या अनुषंगाने महिला आणि विभागाची आढावा बैठक २८ जुलै या दिवशी येथे आयोजित करण्यात आली होती. त्या वेळी त्या बोलत होत्या.
(सौजन्य : DD Sahyadri News)
मंत्री तटकरे म्हणाल्या की, प्रत्येक बालगृहात कुलूपबंद तक्रार पेटी ठेवावी. त्यासाठी आयुक्तांनी एका अधिकार्यांची नियुक्ती करावी. या पेटीतील सर्व तक्रारींचे वेळेत निवारण करावे. विभागीय आयुक्तांनी जिल्हाधिकार्यांची बैठक घेऊन याविषयी आढावा घ्यावा. बायोमेट्रिकऐवजी चेहरा पडताळणी यंत्राची व्यवस्था बालगृहांमध्ये चालू करावी. बालगृहातील सुविधांची नियमितपणे पडताळणी करावी. या पडताळणीचा अहवाल आणि इतिवृत्त तात्काळ शासनास सादर करावे. याविषयी आयुक्तांनी व्यक्तिगत लक्ष घालून संवेदनशीलपणे काम करावे, अशाही सूचना त्यांनी दिल्या.
जिल्हाधिकार्यांच्या अध्यक्षतेखालील समितीकडून नियमित त्रैमासिक पडताळणी करणे आवश्यक आहे. जिल्हाधिकार्यांनी पडताळणी अहवाल शासनाला सादर करावा. प्रत्येक संस्थेत सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित करावी, तसेच ती कार्यरत असल्याची खात्री करावी. बालकल्याण समितीने बालकांना बालगृहात भरती करतांना सखोल चौकशी करून आवश्यकता असेल, तरच बालगृहात भरती आदेश द्यावेत. अन्यथा संस्थाबाह्य सेवांचा पर्याय निवडावा. पीडित बालकांना वैद्यकीय, समुपदेशन इत्यादी सेवा तात्काळ पुरवण्यात याव्यात. संस्थेत बालकांसाठी सुदृढ आणि आनंदी वातावरण ठेवण्यासाठी आवश्यकतेनुसार स्वयंसेवी संस्था, सी.एस्.आर्. तज्ञांच्या सहकार्याने आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात, अशा सूचनाही मंत्री तटकरे यांनी केल्या.