विधानसभा वृत्त
मुंबई – आदिवासी आणि मागासवर्गीय समाजाच्या अज्ञानाचा अपलाभ उठवून त्यांच्या पारंपारिक भूमी अधिकार्यांशी संगनमत करून लाटणारी टोळी राज्यात कार्यरत आहे. भाजपचे आमदार जयकुमार गोरे यांनी पुणे जिल्ह्यातील काही घटनांचा उल्लेख करत याविषयीची लक्षवेधी मांडली. या वेळी गोरे यांनी सांगितले की, अधिकार्यांना हाताशी धरून या भूमी हस्तगत करण्याचा प्रयत्न अनेक वर्षे चालू आहे. मागासवर्गियांची ७/१२ नावे असणार्या ‘महार वतन भूमी’ आहेत; मात्र त्यांची नावे काढून दुसर्याच व्यक्तीच्या नावे त्या भूमी केल्या गेल्या आहेत. नियबाह्य पद्धतीने अनेक मागासवर्गियांच्या भूमी लाटल्या गेल्या आहेत. या सर्व प्रक्रियेत सहभागी असलेल्यावर ॲट्रोसिटीअंतर्गत कारवाई केली जावी.
यावर महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी उत्तर देतांना सागितले की, या प्रकरणाची चौकशी करतांना अनियमितता झाल्याचे दिसत आहे. पुण्याचे अप्पर जिल्हाधिकार्यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन करून १ मासात या चौकशी करून कारवाई करण्यात येईल. फसवणूक झालेल्यांना त्यांच्या मूळ खरेदी नुसार किंवा मालकी हक्कानुसार भूमी परत करण्याचा प्रयत्न केला जाईल.
देवस्थानांच्या भूमी लाटण्याविषयीच्या प्रकरणाची एक मासात चौकशी करू, असे आश्वासन देण्यात आले होते.
त्याला आता ३ ते ४ मास झाले. त्याची अद्याप पूर्तता झाली नाही. तसे याचे होऊ नये असे राष्ट्रवादी काँग्रेसचे जयंत पाटील या वेळी म्हणाले. |
आदीवासींविषयी केलेल्या वक्तव्याविषयी जितेंद्र आव्हाड यांची क्षमा
याविषयावरील चर्चेच्या वेळी जितेंद्र आव्हाड यांनी, ‘आदीवासी लोक रात्रीचा कार्यक्रम झाला की, शुद्धीतही नसतात’, असे वक्तव्य केले. यावर काही सदस्यांनी आक्षेप घेतला आणि आव्हाड यांनी क्षमा मागावी, अशी मागणी केली. त्यावर आव्हाड यांनी भावाना दुखावल्या गेल्या असतील, तर दिलगीरी व्यक्त करत असल्याचे सांगितले.