महाराष्ट्रात वाघांची संख्या १९० वरून ५०० झाली ! – सुधीर मुनगंटीवार, वनमंत्री

विधान परिषदेतून…

महाराष्ट्र वन्य प्राण्यांमुळे झालेली हानी, इजा आणि हानी यांसाठी हानीभरपाई प्रदान करणे विधेयक २०२३ संमत !

मुंबई, २७ जुलै (वार्ता.) – महाराष्ट्रात वर्ष २०१४ मध्ये वाघांची संख्या १९० होती, ती वाढून आता ५०० इतकी झालेली आहे. वाघांचे स्थलांतर व्हावे, असे सर्वांना वाटत आहे. वाघांची संख्या वाढत चालल्याने ‘वाघ घेता का वाघ ?’, असे म्हणण्याची वेळ आली आहे. पिंजर्‍यातही वाघ आणि बिबटे यांची संख्याही प्रचंड वाढली आहे, असे प्रतिपादन वनमंत्री सुधीर मुनंटीवार यांनी २७ जुलै या दिवशी विधान परिषदेत केले.

श्री. सुधीर मुनगंटीवार, वनमंत्री

विधान परिषदेत महाराष्ट्र वन्य प्राण्यांमुळे झालेली हानी, इजा आणि हानी यांसाठी हानीभरपाई प्रदान करणे विधेयक २०२३ एकमताने संमत करण्यात आले. त्या वेळी ते बोलत होते.

या वेळी झालेल्या चर्चेत सदस्य शशिकांत शिंदे, सचिन अहिर, अभिजीत वंजारी, सुरेश धस, सतेज पाटील आदी सदस्यांनी मते व्यक्त करून सूचना मांडल्या. पावसाळी अधिवेशन संपल्यानंतर सदस्यांशी बैठक घेऊन याविषयी चर्चा केली जाईल, असेही त्यांनी सांगितले.

सुधीर मुनगंटीवार म्हणाले की, वन्य प्राण्यांमुळे दुचाकी वाहनांचे अपघात होत असतील, तर या विधेयकात त्याचा समावेश केलेला नाही. त्यामध्ये अनेक अडचणी आहेत. शेतामध्ये रानडुक्कर आणि रोही मारण्यासाठी अनुमती घेता येते. शेतात रानडुक्कर दिसल्यास मारून टाकावे, त्या वेळी अनुमतीची वाट पाहू नये. कुरण विकासासाठी हवा तितका निधी सदस्यांना उपलब्ध करून दिला जाईल. ८० कोटी रुपये व्यय बिभट सफारी, जुन्नर येथे करत आहे. ‘टायगर कॅरिडोर’ विकसित करत आहोत. अरण्यातील हिंसक जनावरांमुळे शेतकर्‍यांच्या शेतीची प्रचंड हानी होते. शेतकर्‍यांची गाय, म्हैस, बैल या वन्यप्राणी मारल्यास, तर संबंधित शेतकर्‍याला ७० सहस्र रुपये साहाय्य दिले जाते.