‘पाणीपत्नी’ समस्‍या संपणार कधी ?

प्रतिकात्मक छायाचित्र

महिलांच्‍या स्‍थितीवरची एक वेगळीच कहाणी प्रसारमाध्‍यमांत नुकतीच प्रसिद्ध झाली आहे. ठाणे जिल्‍ह्यातील डेंगनमळ गावामध्‍ये केवळ पाणी भरण्‍याची सोय व्‍हावी; म्‍हणून पुरुष चक्‍क दुसरा विवाह करतात आणि त्‍या दुसर्‍या पत्नीला ‘पाणीपत्नी’ असे संबोधले जाते. पाणीपत्नी आयुष्‍यभर पाणी भरते. तिला कोणतेही हक्‍क आणि अधिकार दिले जात नाहीत. ही स्‍थिती एका गावापुरती नसून डोंगराळ भागामध्‍ये असे अनेक ठिकाणी होत आहे.

‘जगातील तब्‍बल १२५ कोटींहून अधिक लोक पाण्‍याची सोय नसलेल्‍या घरात रहातात, म्‍हणजेच त्‍यांना थेट घरामध्‍ये पाणी मिळत नाही. त्‍यामुळे ते पाण्‍यासाठी महिलांवर अवलंबून आहेत’, असा निष्‍कर्ष ‘जागतिक आरोग्‍य संघटना’ आणि ‘युनिसेफ’ यांच्‍या संयुक्‍त अहवालात नमूद आहे. पाणीटंचाई वाढत असल्‍याने त्‍याचा विपरीत परिणाम महिलांवर होत आहे, हे गंभीर आहे. पाण्‍यासाठी महिलांची होणारी परवड हे नवीन नाही. अजूनही शहरातील काही भागात प्रतिदिन पाणी येत नसल्‍याने पाणी भरून ठेवावे लागते. डोक्‍यावर कळशी वा हंडे घेऊन पाण्‍यासाठी वणवण करणार्‍या महिला हे चित्र ग्रामीण, दुर्गम आणि अतीदुर्गम भागांत तर सामान्‍य आहे, तसेच उन्‍हाळ्‍यात तर पाणीटंचाई अजूनच भेडसावते. त्‍यामुळे पाणी भरण्‍यासाठी घरातील मुलीही जात असल्‍याने त्‍या शाळेत जाऊ शकत नाहीत. हे वास्‍तव अंगावर काटा आणणारे आहे.

आज जग २१ व्‍या शतकाकडे वाटचाल करत असतांनाही ग्रामीण भागांतील काही गावांत घरातील पाणी भरणे, हे महिलांचे काम आहे, हे समाजमान्‍य आहे. असे असले, तरी पाणी भरण्‍याची समस्‍या सोडवण्‍यासाठी दुसरा विवाह करणे, हे संतापजनक आहे. यातून समाजाची महिलांकडे बघण्‍याची मानसिकता किती संकुचित आहे, हे लक्षात येते. तसेच समाजात महिलांवर होणार्‍या अत्‍याचारांवरूनही समाजाची मानसिकता लक्षात येते. ही सर्व स्‍थिती पालटण्‍यासाठी अजून किती प्रयत्न करायला हवेत, याचा अंदाज यावरून लक्षात येतो.

देशाला स्‍वातंत्र्य मिळून ७५ वर्षे होऊनही देशात महिलांविषयी अशी स्‍थिती असणे, हे सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींना लज्‍जास्‍पद नाही का ? ‘देशाच्‍या प्रगतीसाठी मुलींना वाचवा, मुलगी शिकली आणि घराची प्रगती झाली’ असे शासनाचे विज्ञापन आहे; परंतु देशातील वरील स्‍थिती पाहिल्‍यास मन खिन्‍न होते !

– श्री. सचिन कौलकर, मुंबई.