इस्‍लामी राजवटीतील हिंदु स्‍त्रियांची विटंबना, बळजोरी आणि अपहरण !

‘अलाउद्दीन खिलजीने वर्ष १३९८ मध्‍ये गुजरातमधील सोमनाथाचे मंदिर उद़्‍ध्‍वस्‍त केले. ‘या स्‍वारीत गुजरातचा राजा कर्ण याच्‍या स्‍त्रिया आणि मुली इस्‍लामी सैन्‍याच्‍या हाती सापडल्‍या’, असे ‘तारीख-ए-फिरोज शाही’चा कर्ता बरनी सांगतो. ‘राजा कर्णची पत्नी कमलादेवी हिला अलाउद्दीन आपल्‍या जनानखान्‍यात भरती करतो’, असे अमीर खुस्रो त्‍याच्‍या ‘दवलरानी खिज्रखान’ या फार्सी कवितेत म्‍हणतो.

जनानखाना

१. मोगल शासकांच्‍या काळात हिंदु स्‍त्रियांना गुलाम करण्‍यात येणे

महंमद तुघलकच्‍या दरबारात होणार्‍या ईद समारंभाचे इब्‍न बत्तुताने ‘युद्धात हाती सापडलेल्‍या काफिर राजांच्‍या मुलींना बळजोरीने ईदच्‍या दिवशी नाचवले जाते. नंतर त्‍यांची रवानगी सुलतान, त्‍याचे भाऊ, नातेवाइक इत्‍यादी कुणाच्‍याही जनानखान्‍यात केली जात असे’, अशा प्रकारे वर्णन केले आहे. सुलतान हा नाच गाण्‍याचा दरबार हा संध्‍याकाळच्‍या नमाजाच्‍या नंतर भरत असे. पुढे तो लिहितो, ‘महंमद तुघलक वर्ष १३४२ मध्‍ये मला म्‍हणजेच इब्‍न बत्तुताला स्‍वतःचा ‘राजदूत’ म्‍हणून चीनला पाठवतो. त्‍याने चीनच्‍या बादशाहला भेटवस्‍तू म्‍हणून १०० हिंदु गुलाम आणि संगीतनृत्‍य करणार्‍या १०० हिंदु स्‍त्रिया गुलाम पाठवल्‍या होत्‍या’, असे तो नमूद करतो.

‘सिरत-ए-फिरोज शाही’ ग्रंथात ‘सुलतान फिरोज शाहने जगन्‍नाथ मंदिराचा विध्‍वंस केला आणि त्‍यात कित्‍येक हिंदूंची कत्तल करून तरुण, म्‍हातार्‍या, लेकुरवाळ्‍या अन् गर्भवती स्‍त्रियांना कैद करून गुलाम करण्‍यात आले’, असे म्‍हटले आहे.

‘अकबराने गढकटांगचे राज्‍य काबीज करण्‍यासाठी सैन्‍य पाठवले. तेथील राजा मरण पावला होता आणि त्‍याची राणी दुर्गावती कारभार करत होती. या युद्धात राणी जबर घायाळ  झाली. शत्रूच्‍या हाती सापडू नये; म्‍हणून तिने पोटात खंजीर खुपसून जीव दिला. यात तिचा मुलगा बीरनारायण धारातीर्थी पडला. त्‍याची पत्नी आणि दुर्गावती राणीची बहीण कमलावती मोगलांच्‍या हाती सापडल्‍या. पुढे त्‍या दोघींनाही अकबराच्‍या जनानखान्‍यात टाकले’, ही सर्व हकीकत अबूल फझल याने लिहिलेल्‍या ‘अकबरनामा’ या अकबराच्‍या दरबारी इतिहासात सांगितली आहे.

ओरछाचे (मध्‍यप्रदेश) राजा जुझारसिंह बुंदेला मोगल मनसबदार होते. त्‍यांनी बंड केले म्‍हणून शाहजहांनने वर्ष १६३५ मधे युद्ध केले. त्‍यात जुझारसिंह मारला गेला. त्‍याच्‍या स्‍त्रियांना शाहजहानच्‍या जनानखान्‍यात भरती करण्‍यात आले. हे सर्व अब्‍दुल हमीद लाहोरी याने लिहिलेल्‍या ‘बादशाहनामा’ या शाहजहांच्‍या दरबारी इतिहासात सांगितली आहे.

२. समर्थ रामदासस्‍वामी यांना भारतभ्रमणाच्‍या वेळी आढळलेली हिंदु स्‍त्रियांची विटंबना

समर्थ रामदासस्‍वामी

हिंदु स्‍त्रियांची इस्‍लामी सैनिकांकडून होणारी विटंबना समर्थ रामदासस्‍वामी भारतभ्रमण करतांना बघत होते. अशातच मथुरेस गोकुळाष्‍टमीच्‍या उत्‍सवाच्‍या घालमेलीत धोतर नेसून कपाळावर गंधाचा टिळा लावून मुसलमान अंमलदार मुर्शीदबुद्दीन याने झडप घालून हिंदु स्‍त्री पळवली आणि तिला होडीत घालून थेट आगरा गाठले, हे समर्थ रामदासस्‍वामींनी प्रत्‍यक्ष पाहिले होते.

किती उत्तमा त्‍या स्‍त्रिया भ्रष्‍टविती ।
किती गुज्रिणी ब्राह्मणी भ्रष्‍टविल्‍या ।
कितीयेक देशांतरी त्‍या विकील्‍या ।
किती सुंदरा हाल होवोनि मेल्‍या ॥

किती मोट बांधोनि ते बूडवीती ।
पीछाडेचि बांधोनि हिरावोनी नेती ।

– श्रीसमर्थकृत ‘अस्‍मानी सुलेतानी’, प्रबंध १, श्‍लोक १

त्‍यांच्‍या ‘गुज्रिणी’ या शब्‍दावरून गुजरातेतील काही स्‍त्रियांवर झालेले अत्‍याचार, बलात्‍कार त्‍यांनी पाहिले असावेत’, असे दिसते. स्‍त्रियांच्‍या अब्रूची होणारी राखरांगोळी याविषयी त्‍यांच्‍या मनात त्‍वेश, चीड होती. ‘हिंदु स्‍त्रियांना भ्रष्‍ट केले, त्‍यांना परदेशी गुलाम म्‍हणून विकले, त्‍यांचे हाल करून त्‍यांना मारण्‍यात आले’, यांविषयी ते केवळ खंत व्‍यक्‍त करत नाहीत, तर आपल्‍या समाजातील पुरुषांमधील निःसत्त्वता, असमर्थता यांवर ते जाता जाता प्रहार करून जातात. ‘स्‍त्री ही केवळ उपभोग्‍य वस्‍तू नसून तिला समाजात एक नागरिक, स्‍वतंत्र व्‍यक्‍ती म्‍हणून मानाने आणि सुरक्षिततेने जगता आले पाहिजे’, हाच विचार यामागे दिसून येतो.

३. खेळोजी भोसले यांच्‍या पत्नीच्‍या सुटकेसाठी महाबत खान याला त्‍यांनी ४ लाख रुपये देणे

वर्ष १६२९ची घटना शहाजीराजांचे सख्‍खे चुलतभाऊ, म्‍हणजेच छत्रपती शिवाजी महाराजांचे सख्‍खे चुलत काका खेळोजी भोसले यांची पत्नी नदी किनारी स्नानासाठी गेली होती. त्‍या वेळी मोगल सरदार महाबत खान याने तिच्‍यावर पाळत ठेवत त्‍यांना पळवून नेऊन कैद केले. त्‍याने खेळोजी भोसले यांच्‍या पत्नीच्‍या सुखरूप सुटकेसाठी ४ लाख रुपयांची खंडणीची मागणी केली आणि सांगितले, ‘‘जर तू मला ४ लाख रुपये दिले, तर मी तुझ्‍या पत्नीच्‍या पावित्र्याला धक्‍का न लावता सोडून देईन.’’ शेवटी कोणताही पर्याय शिल्लक नसल्‍याने खेळोजी भोसले यांनी ४ लाख रुपयांची मोठी खंडणी त्‍या महाबत खानाला देऊन आपल्‍या पत्नीची सुखरूप सुटका करून घेतली.

वरील काही घटनांवरून हे स्‍पष्‍ट दिसून येते की, जिथे मोठमोठ्या हिंदु राजे आणि सरदार यांच्‍या स्‍त्रियांची हीबिकट अवस्‍था असेल, तर इतर सामान्‍य नागरिकांची काय दुर्दशा होत असेल ?

लेखन आणि संकलन : श्री. सुमित नलावडे

(संदर्भ : ‘छत्रपती शिवाजी महाराज झाले नसते तर…’, लेखक – ग. भा. मेहेंदळे; ‘समर्थ दर्शन (समर्थांचा स्‍त्रीविषयक दृष्‍टीकोन), लेखिका – टिल्लू समिता; ‘राजा शिवछत्रपती’, लेखक – शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे आणि ‘हिस्‍ट्री ऑफ औरंगजेब, खंड १, लेखक – यदुनाथ सरकार)

(‘इतिहासाच्‍या पाऊलखुणा’ यांच्‍या फेसबुक पानावरून खात्‍यावरून हा लेख घेतला असून त्‍याबद्दल ‘सनातन प्रभात’  नियतकालिक समूह त्‍यांचा आभारी आहे. – संपादक)