#Exclusive : श्री क्षेत्र आळंदी (पुणे) येथील इंद्रायणी नदीचे प्रदूषण रोखण्‍यासाठी सर्वच स्‍तरांवर अनास्‍था !

तीर्थक्षेत्र प्रदूषणमुक्‍त होण्‍यासाठी दैनिक ‘सनातन प्रभात’चे विशेष अभियान !

श्री. अजय केळकर, कोल्‍हापूर आणि श्री. अमोल चोथे, पुणे

जलपर्णीने व्‍यापलेली इंद्रायणी नदी

कोल्‍हापूर / पुणे – आळंदी आणि देहू हे लाखो वारकर्‍यांचे श्रद्धास्‍थान ! आळंदी हे संतश्रेष्‍ठ ज्ञानेश्‍वर महाराज आणि देहूमध्‍ये जगद़्‍गुरु संत तुकाराम महाराज यांचे तीर्थक्षेत्र ! लाखो वारकर्‍यांचे श्रद्धास्‍थान असलेली आळंदी येथील इंद्रायणी नदी मोठ्या प्रमाणात प्रदूषित झाली आहे. जी नदी लाखो वारकर्‍यांसाठी ‘पवित्र तीर्थ’ म्‍हणून समजली जाते, त्‍या नदीत सध्‍या कारखान्‍यांचे रसायनयुक्‍त आणि अनेक गावांमधील सांडपाणी थेट मिसळते. यामुळे आषाढी आणि कार्तिकी मासातच नाही, तर वर्षभर वारकर्‍यांना नदीचे हे दूषित पाणीच प्‍यावे लागते अन् त्‍याच पाण्‍याने स्नानही करावे लागते. जे वारकरी या पाण्‍यात स्नान करतात, त्‍यांच्‍यासाठी त्‍वचाविकार होण्‍याचा मोठा धोका असतो. शासकीय स्‍तरावरही या नदीचे प्रदूषण हटवण्‍यासाठी कोट्यवधी रुपयांची घोषणा होते; मात्र त्‍यातूनही फारसे काही साध्‍य होतांना दिसत नाही. सध्‍या आळंदी येथील मुख्‍य मंदिराच्‍या परिसरातील नदीपात्रात प्रचंड प्रमाणात जलपर्णी साचली असून ती बाहेर काढणे प्रशासनासाठी कसोटीच ठरत आहे.

श्री. अजय केळकर

१. प्रदूषण मंडळाची नेहमीचीच डोळेझाक

प्रदूषण मंडळ हा शासकीय स्‍तरावर ‘पांढरा हत्ती’ झालेला विभाग आहे. जेव्‍हा प्रसिद्धीमाध्‍यमांमधून नदीच्‍या दुःस्‍थितीविषयी वृत्ते प्रसिद्ध होतात, तेव्‍हा प्रदूषण मंडळ झोपेतून खडबडून जागे होते. पिंपरी-चिंचवड परिसरात असलेल्‍या विविध अधिकृत-अनधिकृत औद्योगिक आस्‍थापनांमधून हे पाणी कोणतीही प्रक्रिया न करता थेट नदीत सोडले जाते. हे ढळढळीत सत्‍य असतांना प्रदूषण मंडळ नेहमीच इंद्रायणी नदीच्‍या पाण्‍याचे नमुने पडताळणीसाठी घेतल्‍याचे नाटक करते आणि संबंधित आस्‍थापनांना तोंडदेखली नोटीस पाठवते; मात्र पुढे संबंधित आस्‍थापनांवर कोणतीही कठोर कारवाई होत नाही. हे गेली अनेक वर्षे चालू असून नदीचे प्रदूषण रोखण्‍यास प्रदूषण मंडळाची अनास्‍था हे एक मुख्‍य कारण आहे.

नदीपात्रात योग्‍य प्रकारे जलपर्णी न काढल्‍याने आळंदी येथील मुख्‍य मंदिरासमोरील पुलाच्‍या खाली अडकलेली जलपर्णी

२. निवेदने देऊनही तोंडदेखली कारवाई

लोणावळा ते आळंदीपर्यंत नदीच्‍या काठी अनेक गावे असून शेतीही मोठ्या प्रमाणात आहे. यातील अनेक गावे ही केवळ इंद्रायणी नदीच्‍या पाण्‍यावर पिण्‍याच्‍या पाण्‍यासाठी अवलंबून असून नदीच्‍या प्रदूषणामुळे गावकर्‍यांना प्रदूषित पाणी प्‍यावे लागते. जे शेतकरी आहेत त्‍यांच्‍याकडे असलेल्‍या गायी-म्‍हशी यांचे आरोग्‍यही यामुळे धोक्‍यात येत आहे. या गावकर्‍यांनीही अनेक वेळी शासन स्‍तरावर निवेदने दिली आहेत; मात्र कारवाई ही तोंडदेखलीच झाली आहे.

श्री. अमोल चोथे

३. विविध संघटना, व्‍यक्‍ती यांची आंदोलने !

या नदीचे प्रदूषण हटवण्‍यासाठी अनेक संघटनांनी आंदोलन, उपोषण केले, अनेक निवेदने दिली; मात्र प्रशासनाने प्रत्‍येक वेळी कागदी घोडे नाचवण्‍यापलीकडे काहीच केले नाही. आळंदी देवस्‍थाननेही या संदर्भात वेळोवेळी पिंपरी-चिंचवड महापालिका, सांडपाणी सोडणारी गावे, राज्‍य-केंद्र सरकार यांच्‍याशी पत्रव्‍यवहार केला आहे; मात्र संबंधितांवर कोणतीच कारवाई झालेली नाही. ‘इंद्रायणी सेवा फाऊंडेशन’च्‍या वतीने उपोषण करण्‍यात आले होते.

४. पिंपरी-चिंचवड महापालिकेकडून समाधानकारक उपाययोजना नाहीत !

इंद्रायणी नदी प्रामुख्‍याने पिंपरी-चिंचवड महापालिकेच्‍या कार्यक्षेत्रात येते. त्‍यामुळे नदीचे प्रदूषण रोखणे, हे या महापालिकेचे प्रमुख कर्तव्‍य आहे; मात्र प्रशासकीय स्‍तरावरून अपेक्षित अशा समाधानकारक उपाययोजना केल्‍या जात नाहीत. प्रदूषणमुक्‍तीच्‍या नावाखाली येणार्‍या कोट्यवधी रुपयांच्‍या निधीचे पुढे नेमके काय होते ? हा प्रश्‍न नेहमीच अनुत्तरित रहातो.

५. जलपर्णी हटवण्‍यासाठी कायमस्‍वरूपी उपाययोजना का नाही ?

केवळ इंद्रायणीच नाही, तर मुळा-मुठा आणि पुणे जिल्‍ह्यातील आजूबाजूच्‍या नद्यांमध्‍येही जलपर्णीची समस्‍या मोठी आहे. प्रत्‍येक वर्षी ही जलपर्णी हटवण्‍यासाठी कोट्यवधी रुपयांची कंत्राटे दिली जातात. जलपर्णी हटवल्‍याचा फार्स केला जातो आणि परत काही मासांत ‘येरे माझ्‍या मागल्‍या’ या म्‍हणीप्रमाणे जलपर्णी वाढलेलीच आढळते. जलपर्णी हटवली जातांना ती पूर्णपणे कधीच हटवली जात नाही, त्‍यामुळे परत-परत ती वाढत रहाते. ही जलपर्णी केवळ नदीच्‍या पाण्‍यावर (पाण्‍यात असलेल्‍या प्राणवायूच्‍या आधारे) वाढत नसून नदीत मिसळणारे प्रदूषित घटक तिच्‍या वाढीसाठी साहाय्‍यभूत ठरतात. त्‍यामुळे जलपर्णी हटवण्‍यासाठी नदीचे प्रदूषणही रोखणे अत्‍यावश्‍यक आहे. अन्‍य जिल्‍ह्यांतील नद्या-तलावांमध्‍ये असलेली जलपर्णी हटवण्‍यासाठी काय उपाययोजना केल्‍या जातात ? याचा शास्‍त्रीय अभ्‍यासही प्रशासनाने करून त्‍याप्रमाणे कृती करणे आवश्‍यक आहे.

६. प्रदूषण दूर करण्‍यासाठी कठोर उपाययोजना आणि प्रबळ इच्‍छाशक्‍ती यांची आवश्‍यकता !

इंद्रायणी नदीचे प्रदूषण सोडवण्‍यासाठी कठोर उपाययोजना आणि प्रबळ इच्‍छाशक्‍ती यांची आवश्‍यकता आहे. जी आस्‍थापने प्रक्रिया न करता नदीत थेट पाणी सोडतील, त्‍यांच्‍यावर टाळेबंदीसारखा कठोर निर्णय; ज्‍या गावांमध्‍ये सांडपाण्‍याचे प्रकल्‍प नाहीत, त्‍या गावांना विविध योजनांमधून तात्‍काळ हे प्रकल्‍प उभे करण्‍यासाठी निधी संमत करून देणे आणि ते पूर्ण होईपर्यंत त्‍याचा पाठपुरावा करणे, या गोष्‍टी प्रशासकीय स्‍तरावर कराव्‍या लागतील. येणार्‍या काळात संतश्रेष्‍ठ ज्ञानोबा माऊली-जगद़्‍गुरु संत तुकाराम महाराज यांनी सर्वांना ही कारवाई आणि उपाययोजना करण्‍यासाठी बुद्धी द्यावी, असे लाखो वारकर्‍यांसह सर्वसामान्‍य जनतेला वाटते !


इंद्रायणी नदीच्‍या प्रदूषणाविषयी मान्‍यवर आणि वारकरी यांच्‍या प्रतिक्रिया

नदीचे प्रदूषण रोखण्‍यासाठी कठोर उपाययोजनांची आवश्‍यकता ! – विठ्ठल शिंदे, अध्‍यक्ष, इंद्रायणी सेवा फाऊंडेशन

आमच्‍या संघटनेच्‍या वतीने आम्‍ही नदी प्रदूषणाच्‍या विरोधात अनेक वेळा आवाज उठवला. ‘इंद्रायणी नदी भारतियांसाठी एक पवित्र वारसा असून तो जतन केला जावा’, ही आमची प्रमुख मागणी आहे. नदीचे प्रदूषण रोखण्‍यासाठी कठोर उपाययोजनांची आवश्‍यकता आहे. या संदर्भात आम्‍ही निवेदनाच्‍या माध्‍यमातून वेळोवेळी शासनाला काही उपाययोजना सुचवल्‍या आहेत, त्‍याची कार्यवाही झाली पाहिजे.

संतश्रेष्‍ठ ज्ञानेश्‍वर महाराज यांच्‍या समाधीच्‍या पवित्र ठिकाणी प्रशासकीय स्‍तरावर अनास्‍था का ? – ह.भ.प. संजय महाराज कावळे, अध्‍यक्ष, आध्‍यात्मिक गुरुकुल संघ

‘‘अलंकापुरी पुण्‍यभूमी पवित्र । तिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र ॥’, असे वर्णन असणारी इंद्रायणी नदी ही सर्व वारकर्‍यांसाठी महत्त्वाची नदी आहे. शेकडो वर्षांची प्राचीन परंपरा असणार्‍या या नदीचे आध्‍यात्मिक महत्त्वही मोठे आहे. जेथे प्रत्‍यक्ष संतश्रेष्‍ठ ज्ञानेश्‍वर महाराज यांनी समाधी घेतली, त्‍या पवित्र ठिकाणी प्रशासकीय स्‍तरावर अशी अनास्‍था का ? या समस्‍येच्‍या संदर्भात आम्‍ही ज्‍येष्‍ठ समाजसेवक अण्‍णा हजारे यांची भेट घेतली आहे. त्‍यांनी आमच्‍या आंदोलनास पाठिंबा दिला आहे; मात्र प्रत्‍येक वेळी प्रशासकीय स्‍तरावर घोषणा होतात आणि प्रत्‍यक्ष कृती काहीच होत नाही. या प्रकरणी शासन-प्रशासन स्‍तरावर तात्‍काळ कृती अपेक्षित असून वारकर्‍यांना पिण्‍यासाठी आणि स्नानासाठी स्‍वच्‍छ पाणी मिळावे, ही आमची अपेक्षा आहे.

दैनिक ‘सनातन प्रभात’च्‍या प्रतिनिधीने आळंदी नगर परिषदेचे मुख्‍याधिकारी कैलाश केंद्रे यांना भ्रमणभाषद्वारे संपर्क करण्‍याचा प्रयत्न केला; पण त्‍यांचा संपर्क होऊ शकला नाही.

संपादकीय भूमिका

पवित्र नद्यांचे प्रदूषण रोखण्‍यात अपयशी असलेल्‍या प्रशासनाने चिंतन करून चूक लवकर सुधारावी !