मुंबई पोलीस नियंत्रण कक्षात ‘आर्.डी.एक्स.’ स्फोटके गोव्याला नेत असल्याचा फोन

संशयास्पद टँकर रत्नागिरी पोलिसांनी घेतला कह्यात !

रत्नागिरी – मुंबई-गोवा महामार्गावर वांद्री (तालुका संगमेश्वर) येथे एक संशयास्पद टँकर जप्त करण्यात आला आहे. या टँकरमधून गोव्यात ‘आर्.डी.एक्स.’ स्फोटके नेत असल्याचा दूरभाष मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला २३ जुलैच्या सकाळी आला होता. त्यानंतर मुंबई पोलिसांनी रायगड आणि रत्नागिरी पोलिसांशी संपर्क साधून तातडीने नाकाबंदी करण्याचे आदेश दिले. रत्नागिरी पोलिसांनी शोधमोहीम चालू केल्यानंतर पोलिसांनी एक संशयित टँकर जप्त केला आहे. या टँकरच्या चालकालाही पोलिसांनी कह्यात घेतले आहे.

टँकर गोव्याच्या दिशेने जात असल्याचा फोन पांडे नामक व्यक्तीने मुंबई पोलीस नियंत्रण कक्षाकडे केला होता. हा टँकर कह्यात घेतल्यानंतर पुढील अन्वेषणासाठी तज्ञांच्या पथकाला पाचारण करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. या टँकरमध्ये पॉलिथिन बनवण्याचे साहित्य असल्याची माहिती पुढे येत आहे. पुढील अन्वेषण पोलीस करत आहेत.