पुण्‍यात अटक केलेल्‍या आतंकवाद्यांकडून ‘ड्रोन कॅमेरे’, तसेच विध्‍वंसक कारवायांसाठी वापरण्‍यात येणारी पावडर जप्‍त !

प्रतिकात्मक चित्र

पुणे – येथे इम्रान खान आणि महंमद युनीस साकी या २ आतंकवाद्यांना अटक करण्‍यात आली होती. या २ आतंकवाद्यांकडून ‘ड्रोन कॅमेरे’, तसेच ४ किलो ‘केमिकल’ पावडर जप्‍त करण्‍यात आली आहे. विध्‍वंसक कारवायांसाठी ही पावडर वापरली जाते, अशी माहिती पोलिसांच्‍या अन्‍वेषणात समोर आली आहे. दोघा आरोपींना २५ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्‍यात आली आहे. या दोघांना पकडल्‍यानंतर राष्‍ट्रीय अन्‍वेषण यंत्रणा (एन्.आय.ए.), देहली आणि जयपूर येथील अन्‍वेषण पथके, तसेच महाराष्‍ट्र आतंकवादविरोधी पथक पुण्‍यात पोचले आहे. त्‍यांनीही या गुन्‍ह्याचे समांतर अन्‍वेषण चालू केले आहे.

१. खान आणि साकी यांच्‍याकडून बनावट आधारकार्ड, काडतुसे आणि ‘इलेक्‍ट्रॉनिक’ साहित्‍य जप्‍त करण्‍यात आले आहे.

२. काही वर्षांपूर्वी पुण्‍यात चोरीच्‍या गाड्यांचा स्‍फोट करण्‍यात आला होता. ‘या आतंकवाद्यांनाही दुचाकीचा स्‍फोट करायचा होता’, असा पोलिसांना संशय आहे. त्‍यामुळे या दोघांची पोलिसांकडून कसून चौकशी करण्‍यात येत आहे.

 ३. ‘ड्रोन कॅमेर्‍यां’द्वारे शहरातील संवेदनशील ठिकाणांचे चित्रीकरण केल्‍याचेही समोर आले आहे. ‘या चित्रीकरणात नेमके काय आहे ?’, ‘पुण्‍यातील कोणत्‍या परिसरातील चित्रीकरण केले आहे ?’, ‘यात पुण्‍याच्‍या बाहेरचे चित्रीकरण केले आहे का ?’, आदींचे अन्‍वेषण पोलीस करत आहेत.