गोव्यात पावसाने ७५ इंचांचा टप्पा ओलांडला !

नद्यांच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाल्याने पूरसदृश स्थिती

पणजी – गोव्यात पावसाने ७५ इंचांचा टप्पा ओलांडला आहे. पेडणे आणि सत्तरी तालुक्यांतील नद्यांच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाल्याने पूरसदृश स्थिती निर्माण झाली आहे. गेल्या २४ घंट्यांत सरासरी ८७.१ मि.मी. पावसाची नोंद झाली असून फोंडा येथे सर्वाधिक ११३ मि.मी., तर पेडणे येथे ११०.८ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. या पाठोपाठ सांगे (१०४.५ मि.मी.), काणकोण (१०१.८ मि.मी) आणि केपे (१००.८ मि.मी.) येथे पाऊस पडला.

तिलारी नदीकाठच्या गावांना सतर्कतेची चेतावणी

तिलारी धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस पडत असल्याने धरणाची पाणीपातळी वाढली आहे. त्यामुळे तिलारी पाटबंधारे विभागाने मुख्य धरणातील पाणी पुच्छ कालव्याद्वारे तिलारी नदीत सोडण्याचा निर्णय घेतला आहे.

(सौजन्य : Goan Reporter News)

त्यामुळे नदीच्या काठावरील जिल्ह्यातील कोनाळकट्टा, घोटगेवाडी, परमे, घोटगे, खानवाळे आवाडे, मणेरी, कुडासे, साटेली-भेडशी आणि उत्तर गोव्यातील इब्रामपूर हणखणे, चांदेल हंसापूर, कासारवर्णे, वारखंड या गावांना सतर्कतेची चेतावणी देण्यात आली आहे.

गोव्यात पावसामुळे अनेक ठिकाणी पूरसदृश स्थिति

पारोडा (केपे) येथील पाण्याखाली गेलेला पूल

१. कुशावती नदीला पूर आल्याने पारोडा (केपे) येथील पूल पाण्याखाली गेला आहे.
२. इब्रामपूर (पेडणे) येथे साळ नदीच्या पुलाखाली झाडाचे मोठे ओंडके पुलाच्या खांबात अडकून राहिल्याने पाणी वाहून जाण्याचा वेग मंदावला असून यामुळे पुलाआधीच्या नदीच्या पात्रातील पाणी वाढून ते परिसरात पसरण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
३. पार्से (पेडणे) भागात काही ठिकाणी चिरेखाणीत साठलेल्या पाण्यात लोक अंघोळीसाठी जातात. या ठिकाणी अंघोळ किंवा पोहणे यांसाठी जाण्यास पंचायतीने बंदी घातली आहे.

४. पेडणे तालुक्यातील कडशी-मोप पुलावरून पाणी वहात असल्याने एकूण १० कुटुंबांचा संपर्क अन्य गावांशी तुटला आहे. गेले ४-५ दिवस या गावातील मुले शाळा-महाविद्यालयामध्ये गेलेली नाहीत. येथील रहिवासी आपत्कालीन यंत्रणेकडून साहाय्याची अपेक्षा करत आहेत.
५. बैलपार, कासारवर्णे येथील नदीला पूर आला असून नदीकाठच्या लोकवस्तीला धोका निर्माण झाला आहे.
६. दक्षिण गोव्यात कुंकळ्ळी येथे काही घरांत पाणी शिरले आहे. पाऊस असाच चालू राहिल्यास पाण्याची पातळी वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
७. काणकोण तालुक्यातील खोतीगाव क्षेत्रात ताळशे येथे पुलाजवळील माती वाहून गेल्याने पुलाला धोका निर्माण झाला आहे.