कल्‍याण येथे खड्डे चुकवतांना दुचाकीस्‍वाराचा मृत्‍यू !

सूरज गवारी या तरुणाचा खड्डे चुकवतांना तोल गेला आणि तो बाजूने चाललेल्‍या डंपरच्‍या मागच्‍या चाकाखाली चिरडला जाऊन त्‍याचा जागीच मृत्‍यू झाला

ठाणे, २१ जुलै (वार्ता.) – कल्‍याण पूर्वेतील मलंगगड रस्‍त्‍यावरील द्वारली गावाजवळ २० जुलैच्‍या रात्री ११.३० वाजता दुचाकीवरून जाणार्‍या सूरज गवारी या तरुणाचा खड्डे चुकवतांना तोल गेला आणि तो बाजूने चाललेल्‍या डंपरच्‍या मागच्‍या चाकाखाली आला. त्‍याखाली चिरडला जाऊन त्‍याचा जागीच मृत्‍यू झाला. अपघातानंतर द्वारली गावातील ग्रामस्‍थांनी आक्रमक भूमिका घेत प्रशासनाच्‍या अधिकार्‍यांवर कारवाई करण्‍याची मागणी केली आहे. ‘मलंगगड, नेवाळी परिसरातील गावांमधील नागरिक, तसेच दूध, भाजीपाला विक्रेते कल्‍याण रेल्‍वेस्‍थानकात येण्‍यासाठी मलंगगड रस्‍त्‍याचा वापर करतात. रस्‍त्‍यावर अनेक ठिकाणी खड्डे पडले आहेत. प्रशासनाने याची नोंद घेऊन रस्‍त्‍यांची तात्‍काळ दुरुस्‍ती करावी’, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

संपादकीय भूमिका :

आणखी किती जणांचे मृत्‍यू झाल्‍यावर प्रशासन आणि सरकार ‘खड्डेमुक्‍त महाराष्‍ट्र’ करणार आहे ?