पुणे – इरशाळवाडीसारख्या घटना केवळ महाराष्ट्रात नाही, तर देशभरात सर्वत्र होत आहेत. पुण्यातील एक भूगर्भ शास्त्रज्ञ हिमांशू कुलकर्णी यांनी याचा काळजीपूर्वक अभ्यास केला आहे. त्यात छोटे-मोठे भूस्खलनही वाढली आहेत, असे त्यांनी नमूद केले आहे. गेल्या १० वर्षांत होणारे भूस्खलन हे १०० पट वाढले आहे. अशा घटनांना केवळ निसर्ग कारणीभूत नसून आपण जे अयोग्य रितीने डोंगर पोखरत आहोत, डोंगरावर जे आघात करत आहोत, या गोष्टीही कारणीभूत आहेत. पश्चिम घाटात दगडी खाणी, रस्ते यांमुळे जे मोठे हस्तक्षेप होत आहेत, त्यामुळे अशा घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. त्यामुळे इरशाळवाडीसारख्या घटनांना मानवी हस्तक्षेपही कारणीभूत आहे, असे परखड मत ज्येष्ठ पर्यावरण शास्त्रज्ञ डॉ. माधव गाडगीळ यांनी वृत्तवाहिन्यांशी बोलतांना व्यक्त केले.
डॉ. माधव गाडगीळ पुढे म्हणाले, ‘‘या संदर्भातील अहवाल आम्ही वर्ष २०११ मध्येच सादर केला होता. दुर्दैवाने तो आजपर्यंत प्रसिद्ध करण्यात आलेला नाही. यात आम्ही शास्त्रोक्त अभ्यास करून पश्चिम घाटाविषयी अल्प, मध्यम आणि अतीसंवेदशील असे भाग केले होते. अतीसंवेदनशील भागात कोणत्याही प्रकारचा हस्तक्षेप करू नये, असे सुचवले होते; मात्र त्याचा कधीच विचार झाला नाही. जवळजवळ सर्व दगडांच्या खाणी अवैध आहेत. यातून पुष्कळ मोठ्या प्रमाणात आर्थिक लाभ उठवला जातो. हा पैसा खाण मालकांकडून संबंधितांकडे पोचवला जातो.
यापूर्वी आम्ही वशिष्टी नदी ही तेथील प्रदूषणामुळे प्रदूषित होत असल्याचे सांगितले; मात्र प्रदूषण मंडळाने या प्रकरणी खोटे अहवाल देत ‘असे काही झाले नाही’, असे सांगितले. आम्ही दिलेला अहवाल हा ‘राष्ट्रीय सुरक्षेला बाधा आणेल’, असे सांगून केंद्रीय पर्यावरण विभागाने आमचा अहवाल जाहीर करण्यास नकार दिला. यानंतर न्यायालयाने सांगितल्यावर तो खुला केला, संकेतस्थळावर ठेवला आणि आता काढून टाकला. अशा प्रकारे केंद्रीय पर्यावरण विभाग खर्या गोष्टी पुढे येऊ देत नाही.’’
संपादकीय भूमिका :डॉ. गाडगीळ यांच्यासारख्या तज्ञांच्या अहवालांचा अभ्यास करून त्यानुसार शासनाने कृती करावी, ही अपेक्षा ! |