जिहादची परि‘सीमा !’

सीमेच्‍या सुरक्षेतील त्रुटींमुळे भारताची अबु्र वेशीवर टांगली जाणे, हे सरकारी यंत्रणांना लज्‍जास्‍पद !

सचिन-सीमा

‘प्रेमात आणि युद्धात सर्व काही क्षम्‍य असते’, असे म्‍हणतात; पण पाकिस्‍तानची सीमा हैदर हिचे सचिन मीणा या भारतीय तरुणावरील ‘प्रेम’ त्‍याला अपवाद आहे. तिच्‍यावर ती आय.एस्.आय.ची हस्‍तक असल्‍याचा आरोप आहे; म्‍हणूनच तिच्‍या पाताळयंत्री प्रेमाला जिहादचा दर्प येत आहे. तिचा भारत प्रवेशापर्यंतच्‍या प्रवासाचा घटनाक्रम आणि पोलीस चौकशीत तिने दिलेली अन् टाळलेली उत्तरे पहाता ‘ती प्रेमाच्‍या नावाखाली युद्ध करायला आली आहे का ?’, अशी शंका उपस्‍थित होते. पोलीस चौकशीत सीमा हैदर ही तिच्‍या ४ मुलांसह नेपाळमार्गे आल्‍याचे आणि त्‍यासाठी तिला तिसर्‍या व्‍यक्‍तीने साहाय्‍य केल्‍याचे निष्‍पन्‍न झाले आहे. इतकेच नव्‍हे, तर सीमा ग्रामीण भारतातील महिला दिसेल, अशा पद्धतीने तिचा ‘मेकअप’ केल्‍याचेही उघड झाले. भारत-नेपाळ सीमेवरील सुरक्षादलांच्‍या नजरेतून सुटण्‍यासाठी तिने तिच्‍या मुलांची वेशभूषाही पालटली. तिच्‍याकडे सापडलेले ३-४ सीम कार्डस, तुटलेला फोन, तिने नेपाळच्‍या हॉटेलमध्‍ये खोट्या नावाने घेतलेली खोली, पोलीस चौकशीला जराही न घाबरता तत्‍परतेने दिलेली उत्तरे आदी सर्वच संशयास्‍पद आहे. तिच्‍या एकूणच हावभावापासून रहाणीमानापर्यंत आणि चालण्‍या-बोलण्‍यापासून वागण्‍यापर्यंतचे निरीक्षण केल्‍यास ती सर्वसाधारण महिला नाही, हे सर्वसामान्‍यांनाही कळून चुकले आहे.

सीमा-सचिन प्रकरण प्रत्‍येक दिवशी नवीन वळण घेत आहे. सचिन मीणा याच्‍या भोवतीही संशयाचे दाट धुके आहेत. या सर्वांमध्‍ये अनेक महत्त्वाचे प्रश्‍न अनुत्तरीत रहातात. ‘एखादी पाकिस्‍तानी महिला नेपाळमार्गे भारतात सहज कशी प्रवेश करू शकते ?’, ‘त्‍यासाठी तिला कुणी ‘अर्थ’पूर्ण साहाय्‍य केले का ?’, यांचे अन्‍वेषण व्‍हायला हवे. आपल्‍या देशातील नेपाळ आणि बांगलादेश यांच्‍या सीमांवर सर्रास होणारी घुसखोरी काही नवी नाही; पण आजपर्यंतच्‍या कोणत्‍याही सरकारने ही घुसखोरी कायमस्‍वरूपी रोखण्‍यासाठी काहीही उपाययोजना केली नाही. जनतेलाही त्‍याविषयी काही देणे-घेणे नाही. यामुळेच शत्रूचे फावले आहे. पाक आणि चीन यांसारखे शत्रू शेजारी बसले असतांना इतकी असंवेदनशीलता लज्‍जास्‍पद आहे. ५० वर्षांपूर्वी स्‍वातंत्र्यवीर सावरकर यांनी देशाच्‍या सीमा सुरक्षित करण्‍याचे मांडलेले सूत्र किती अचूक होते, तेही या निमित्ताने अधोरेखित होते. आतापर्यंत पाकिस्‍तान ऑनलाईन माध्‍यमातून भारतीय पुरुषांना ‘हनीट्रॅप’ (प्रेमाच्‍या  जाळ्‍यात अडकवून ईप्‍सित साध्‍य करणे) मध्‍ये अडकवत होता. आता हेच काम तो थेट भारतात हेर घुसवून करत आहे. पाकच्‍या जिहादची ही परि‘सीमाचा’च होय ! सीमा हैदरचे हे प्रकरण एका अधिवक्‍त्‍यामुळे उघड झाले, त्‍यामुळे सर्व समोर आले. त्‍याने उघड केले नसते, तर एक पाकिस्‍तानी हेर कायमची भारताच्‍या उरावर बसली असती. त्‍यामुळे सीमाचे ‘लव्‍ह’ हा ‘जिहाद’च आहे, असे म्‍हणायला वाव आहे. अशा किती ‘सीमा’ आतापर्यंत भारतात घुसल्‍या असतील, देव जाणे !

भारतात पुढील वर्षी लोकसभा निवडणुका आहेत. यानिमित्त पाकिस्‍तानचे सीमाच्‍या आडून भारतात विध्‍वंस घडवण्‍याचे षड्‍यंत्र तर नाही ना ? याकडेही दुर्लक्ष करून चालणार नाही !