वर्ष २०२४ पासून गोव्यातील सर्व नवीन पर्यटन वाहने विजेवर चालणारी असणे बंधनकारक करणार ! – मुख्यमंत्री

भारताच्या जी-२० अध्यक्षतेखाली ‘पॉलिसी सपोर्ट अँड एनेबलर्स टू एक्सेलरेट इंडियाज इलेक्ट्रिक मोबिलिटी’, या शीर्षकाच्या एक दिवसीय परिषदेत दीपप्रज्वलनप्रसंगी मान्यवर

पणजी, १९ जुलै (पसूका) – जानेवारी २०२४ पासून राज्यातील सर्व नवीन पर्यटन वाहने, पर्यटकांना भाड्याने देण्यात येणारे चारचाकी वाहन किंवा दुचाकी वाहन ही सर्व विजेवर चालणारी असणे बंधनकारक केले जाईल, अशी घोषणा १९ जुलैला मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत केली. नीती आयोगाच्या वतीने आयोजित आणि वर्ल्ड रिसोर्सेस इन्स्टिट्यूट इंडिया अन् एशियन डेव्हलपमेंट बँकद्वारे समर्थित ‘पॉलिसी सपोर्ट अँड एनेबलर्स टू एक्सेलरेट इंडियाज इलेक्ट्रिक मोबिलिटी’, या शीर्षकाची एक दिवसीय परिषद भारताच्या जी-२० अध्यक्षतेखाली १९ जुलैला चौथ्या ऊर्जा संक्रमण कार्यकारी गटाच्या बाजूने आयोजित करण्यात आली होती. या परिषदेत ते बोलत होते.

ते पुढे म्हणाले, ‘‘या व्यतिरिक्त गोव्यातील मध्यम चारचाकी वाहने (कार) आणि दुचाकी यांसह अनेक वाहनांची देखरेख करणार्‍या अनुज्ञप्तीधारकांनी राज्याच्या वाहनांचे विद्युतीकरण करण्याच्या प्रयत्नांना हातभार लावत जून २०२४ पर्यंत त्यांच्या ताफ्यातील ३० टक्के वाहनांचे विद्युतीकरण करण्याचे वचन दिले आहे.’’

राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय भागधारकांना बोलावण्यासाठी, अर्थपूर्ण चर्चेत गुंतण्यासाठी, भारताच्या अल्प कार्बन उत्सर्जनाच्या मार्गाला उत्प्रेरित करण्यासाठी आणि देशातील ‘इलेक्ट्रिक मोबिलिटी’च्या (अधिकाधित विजेवर चालणारी वाहने वापरण्याच्या) वाढीस पुढे जाण्याच्या उद्देशाने व्यवहार्य वित्तपुरवठा, तसेच नियामक अन् धोरणात्मक मार्ग शोधण्यासाठी या परिषदेने महत्त्वपूर्ण व्यासपीठ म्हणून काम केले. नीती आयोगाचे उपाध्यक्ष श्री. सुमन बेरी, गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, भारताचे जी-२० शेर्पा (शेर्पा ही त्यांची पदवी आहे) श्री. अमिताभ कांत आदी मान्यवर या वेळी उपस्थित होते. परिषदेत ‘राज्यांमध्ये ‘विजेवर चालणार्‍या वाहनांची पर्यावरणीय यंत्रणा’ विकसित करणे’ आणि ‘नॅशनल इलेक्ट्रिक बस प्रोग्राम’ (राष्ट्रीय वीज बस कार्यक्रम) यांसारख्या महत्त्वाच्या संकल्पनांवर सखोल चर्चा करण्यात आली.

परिषदेच्या उद्घाटनपर भाषणात नीती आयोगाचे उपाध्यक्ष सुमन बेरी यांनी भारतीय ईव्ही (इलेक्ट्रिक व्हेईकल) उद्योगाची परिवर्तनशील क्षमता आणि त्याचा अर्थव्यवस्था अन् पर्यावरण या दोन्हींवर होणारा सकारात्मक परिणाम, यांवर प्रकाश टाकला.

भारताचे जी-२० शेर्पा अमिताभ कांत यांनी कार्यक्रमात विशेष भाषण केले आणि भारतातील ‘इलेक्ट्रिक मोबिलिटी’चा वेग कायम ठेवण्याची आवश्यकता अधोरेखित केली.