अधिक मासाविषयी पुराणांमध्‍ये आढळणारे उल्लेख

सध्‍या चालू असलेल्‍या ‘अधिक मासा’च्‍या निमित्ताने….

१. ‘बृहन्‍नारदीय पुराणांतर्गत हे माहात्‍म्‍य ३१ अध्‍यायात्‍मक असून बद्रिकाश्रमात नारायणऋषींनी नारदाला अधिक मासाचे सविस्‍तर माहात्‍म्‍य सांगितले आहे.

२. नैमिषारण्‍यात सूतांनी शौनकादिक ऋषींना प्रश्‍नोत्तर रूपाने अधिक मासाविषयी सांगितले.

३. महाभारतकाळातील उल्लेख

३ अ. पांडवांचा वनवास आणि द्रौपदीचा पूर्वजन्‍म यापूर्वीही अधिक मास असणे : वनवासात असलेल्‍या द्रौपदीला भगवान श्रीकृष्‍णांनी तिचा पूर्वजन्‍मवृत्तांत सांगून त्‍यात दुर्वास महर्षींनी दुःख निवृत्तीकरता पुरुषोत्तमाची सेवा सांगितली आहे. त्‍याचा तिरस्‍कार केल्‍यामुळेच अनेक दुःखे त्‍या जन्‍मात झाली आणि त्‍याचाच परिणाम या जन्‍मातही भरसभेत वस्‍त्रहरणादि अनेक प्रकारचा अपमान, वनवास अन् अज्ञातवास यांमध्‍ये असह्य कष्‍टप्राप्‍तीच्‍या रूपाने भोगावा लागत आहे. वनवासातील विविध कष्‍टांमुळे २ वेळा आलेल्‍या अधिक मासाचा नियम धर्म पाळला गेला नाही. ‘पुरुषोत्तम मासात स्नान-दानादि नियम व्रते करा, म्‍हणजे दुःखे दूर होतील. त्‍याप्रमाणे वागल्‍याने तिची दुःखापासून मुक्‍तता होऊन शत्रूंचा नाश आणि राज्‍यप्राप्‍ती झाली’, असे वर्णन आहे. यावरून ‘पांडवांच्‍या वनवासाच्‍या काळात आणि द्रौपदीच्‍या पूर्वजन्‍मातही अधिक मास अन् त्‍यांची स्नान-दानादि व्रते करण्‍याची पद्धत असावी’, असे अनुमान निघते.

३ आ. ‘अज्ञातवासात १३ व्‍या वर्षी विराटाच्‍या येथे पांडव प्रकट झाल्‍यावर पांडवांची १३ वर्षे पूर्ण झाली नाहीत, तेव्‍हा त्‍यांनी पुन्‍हा वनवास भोगावा’, असा दुर्योधनाचा आग्रह होता. त्‍या वेळी निर्णय देण्‍याचे काम पितामह भीष्‍म यांच्‍याकडे आले. तेव्‍हा त्‍यांनी ‘प्रत्‍येक ५ वर्षांत २ अधिक मास उत्‍पन्‍न होतात’, असे सांगितले आहे.

(साभार : ‘सदाचार आणि संस्‍कृति’, मे २०१८)