हिंदु देवीदेवतांचे विडंबन करणार्‍याला जामीन नाकारण्‍याविषयी उत्तरप्रदेश उच्‍च न्‍यायालयाचे आशादायी निकालपत्र !

१. देवीदेवतांचे विडंबन केल्‍याप्रकरणी गुन्‍हा नोंद होणे आणि तो रहित होण्‍यासाठी उत्तरप्रदेश उच्‍च न्‍यायालयात याचिका करणे

‘उत्तरप्रदेश येथील डॉ. शिव सिद्धार्थ यांनी ‘व्‍हॉट्‍सअ‍ॅप’ गटावरून आलेले श्री दुर्गादेवीचे एक विडंबनात्‍मक लिखाण अन्‍यांना पाठवले. त्‍यामुळे श्री दुर्गादेवीचे विडंबन होऊन धार्मिक भावना दुखावल्‍याच्‍या प्रकरणी एका हिंदुत्‍वनिष्‍ठांनी पोलीस तक्रार प्रविष्‍ट केली. या प्रकरणी डॉ. सिद्धार्थ यांच्‍यावर भारतीय दंड विधान ‘२९५ अ’ या कलमानुसार बदलापूर पोलीस ठाणे, जोनपूर, उत्तरप्रदेश येथे गुन्‍हा नोंदवण्‍यात आला. हा गुन्‍हा रहित होण्‍यासाठी डॉ. शिव सिद्धार्थ यांनी उत्तरप्रदेश उच्‍च न्‍यायालयामध्‍ये फौजदारी याचिका प्रविष्‍ट केली. त्‍यात त्‍यांनी म्‍हटले, ‘तक्रारदार हा ‘हिंदु  वाहिनी’चा कार्यकर्ता असून उजव्‍या विचारसरणीचा आहे. त्‍यामुळे त्‍याने गुन्‍हा नोंदवून मला त्रास देण्‍याचा प्रयत्न केला आहे. व्‍हॉट्‍सअ‍ॅप गटावर एखादा संदेश येणे आणि तो इतरांना पाठवणे, हा गुन्‍हा होत नाही. तसेच यात पाठवणार्‍याचा हेतू वाईट असल्‍याचे सिद्ध होत नाही.’

पू. (अधिवक्ता) सुरेश कुलकर्णी

सध्‍या कला आणि राज्‍यघटनेने दिलेला अभिव्‍यक्‍तीस्‍वातंत्र्याचा अधिकार यांच्‍या नावाखाली हिंदु देवता, संत, तसेच हिंदूंची अन्‍य श्रद्धास्‍थाने यांना जाणीवपूर्वक लक्ष्य केले जाते. हिंदूंच्‍या धार्मिक भावना कायम झोपलेल्‍या असतात. आता त्‍या थोड्या फार जाग्‍या होत आहेत आणि कुठे तरी विरोध होत आहे, तर तेथे पुरोगामी, राज्‍यघटनेचे कथित पुरस्‍कर्ते आदी आडवे येतात. मुळात अशा प्रकरणांमध्‍ये पोलीसही गुन्‍हे नोंदवत नाहीत. या ठिकाणी तक्रारदाराने त्‍यांना गुन्‍हा नोंदवण्‍यास भाग पाडले; म्‍हणून डॉ. शिव सिद्धार्थ यांना जामीन मिळवण्‍यासाठी उच्‍च न्‍यायालयामध्‍ये धाव घ्‍यावी लागली.

२. उत्तरप्रदेश उच्‍च न्‍यायालयाने जामीन नाकारतांना घेतलेली भूमिका

सध्‍या हिंदूंच्‍या धार्मिक भावना दुखावल्‍या जातात. त्‍यांच्‍या श्रद्धास्‍थानांचे जाणीवपूर्वक विडंबन केले जाते, तेव्‍हा ‘ही कला आहे, राज्‍यघटनेने दिलेला अधिकार आहे आणि त्‍यात कुणाच्‍या धार्मिक भावना दुखावण्‍याचा विषय निर्माण होत नाही’, अशा प्रकारचा युक्‍तीवाद न्‍यायालयामध्‍ये नेहमी केला जातो. या प्रकरणात न्‍यायमूर्तींनी असे सांगितले, ‘‘कोणत्‍याही व्‍यक्‍तीच्‍या धार्मिक भावना दुखावणे किंवा त्‍यांचा जाणीवपूर्वक अपमान करणे आणि त्‍यांच्‍या श्रद्धास्‍थानांना ठेच पोचवणे, हे चुकीचे आहे. त्‍यामुळे भारतीय दंड विधान कलम ‘२९५ अ’नुसार हा गुन्‍हा ठरतो आणि त्‍यासाठी ४ वर्षांचा कारावास एवढी शिक्षा आहे. त्‍यामुळे दुर्गादेवीविषयी अपमानास्‍पद लिखाण स्‍वीकारणे आणि तो अन्‍य ठिकाणी पाठवणे, हा गुन्‍हाच आहे. त्‍यामुळे आरोपीच्‍या विरुद्ध लावण्‍यात आलेल्‍या राज्‍यघटना प्रक्रिया संहिता /‘फौजदारी प्रक्रिया कोड’ (क्रिमिनल प्रोसिजर कोड) कलम ४८२ प्रमाणे रहित करता येणार नाही. आरोपीला दंडाधिकारी (मॅजिस्‍ट्रेट) न्‍यायालयाने समन्‍स पाठवून बोलावले आहे. त्‍यामुळे हा खटला त्‍याच न्‍यायालयाने पुढे चालू ठेवला पाहिजे.’’ अशा पद्धतीने उच्‍च न्‍यायालयाने निवाडा दिला. तसेच ‘संबंधित गुन्‍हा रहित करता येणार नाही’, असे स्‍पष्‍ट सांगितले आणि डॉ. शिव सिद्धार्थ यांची याचिका असंमत केली.

३. हा निकाल हिंदूंसाठी आशादायी !

बर्‍याच दिवसांनंतर एवढे चांगले निकालपत्र आले आहे. हिंदुद्वेष्‍टे चित्रकार एम्.एफ्. हुसेन यांनी हिंदु देवता आणि भारतमाता यांची अश्‍लील चित्रे काढली होती. त्‍या विरोधात देशभरात १ सहस्र २०० हून अधिक गुन्‍हे नोंदवण्‍यात आले होते. ते सर्व गुन्‍हे कलेचा आविष्‍कार, भारतीय राज्‍यघटनेने दिलेले अभिव्‍यक्‍तीस्‍वातंत्र्य, स्‍वातंत्र्याचा अधिकार या गोंडस नावाखाली रहित केले गेले होते. त्‍यानंतर हिंदूंचे सणवार आल्‍यानंतर देवीदेवतांचे सातत्‍याने जाणीवपूर्वक विडंबन केले जाते. अनेक ठिकाणी हिंदुत्‍वनिष्‍ठ गुन्‍हा नोंदवावा आणि फौजदारी करावी, यासाठी प्रयत्न करत असतात; मात्र पोलिसांकडून फौजदारी गुन्‍हा नोंदवला जात नाही. त्‍यांनी गुन्‍हा नोंदवलाच, तर न्‍यायालय आरोपीला लगेच जामीन देत गुन्‍हा रहित करतात. या पार्श्‍वभूमीवर अशा प्रकारची निकालपत्रे येतात, तेव्‍हा या निकालपत्रांविषयी हिंदुत्‍वनिष्‍ठ कार्यकर्ते आणि अधिवक्‍ते यांनी आपसांत चर्चा करावी, तसेच ते एकमेकांना पाठवावे, म्‍हणजे त्‍याचा लाभ होईल.’ (७.६.२०२३)

श्रीकृष्‍णार्पणमस्‍तु ।

– (पू.) अधिवक्‍ता सुरेश कुलकर्णी, मुंबई उच्‍च न्‍यायालय