‘भारतीय अवकाश संस्थे’च्या (‘इस्रो’च्या) शास्त्रज्ञांनी तिरुपति मंदिरात ‘चंद्रयान-३’ची प्रतिकृती अर्पण केल्याने तथाकथित पुरोगाम्यांनी केलेल्या कांगाव्यामागील कारण !
‘चंद्रयान-३’च्या यशस्वितेसाठी ‘इस्रो’ (भारतीय अवकाश संस्था)च्या शास्त्रज्ञांनी तिरुपति मंदिरास भेट दिली. त्या वेळी त्यांनी ‘चंद्रयान-३’ची प्रतिकृती श्री बालाजीच्या चरणी अर्पण केली. त्यावरून तथाकथित पुरोगाम्यांनी ‘हा शास्त्रीय दृष्टीकोन नाही’, वगैरे बरीच आरडाओरड केली. त्यावर मला लॉर्ड थॉमस मेकॉलेच्या एका लिखाणाची आठवण झाली. ते लिखाण येथे देत आहे.
१. इंग्रजी शिक्षणाच्या माध्यमातून हिंदूंचे त्यांच्या धर्माशी नाते न रहाण्याविषयी केलेले भाष्य
थॉमस मेकॉलेने भारतात इंग्रजी शिक्षणाचा पाया रचला, हे बहुतेकांना ठाऊक असेल, असे गृहित धरतो. १२ ऑक्टोबर १८३६ या दिवशी मेकॉलेने त्याच्या वडिलांना एक पत्र लिहिले होते. हे पत्र ‘द लाईफ अँड लेटर्स ऑफ लॉर्ड मेकॉले’ (The life and letters of Lord Macaulay) या पुस्तकात पृष्ठ ३९८ ते ४०० वर छापले आहे. चंद्रयान आणि शास्त्रज्ञ यांच्या उपरोक्त घटनेविषयी ‘पुरोगामी’ गटाची प्रतिक्रिया तशी का होती ? याचे नेमके कारण अनुमाने १८७ वर्षांपूर्वी मेकॉले याने लिहिलेल्या खालील उतार्यावरून स्पष्ट होते. यातील प्रत्येक वाक्य अगदी लक्षपूर्वक वाचण्याजोगे आहे –
‘आमच्या इंग्रजी (माध्यमाच्या) शाळांची वाढ झपाट्याने होत आहे. सर्व इच्छुकांपर्यंत हे शिक्षण पोचवणे आम्हाला अवघड आणि काही ठिकाणी अशक्य होत आहे. हुगळी (बंगाल) या एका शहरातच १ सहस्र ४०० मुले इंग्रजी शिकत आहेत. या शिक्षणाचा हिंदूंवर विलक्षण परिणाम होत आहे. इंग्रजी शिक्षण घेणार्या एकाही हिंदूचे त्याच्या धर्माशी कधी प्रामाणिक नाते उरत नाही. काही (हिंदू) केवळ चालीरीतींमुळे धर्माचे पालन करत रहातात; पण बरेचसे स्वतःला फक्त आस्तिक (ईश्वरवादी) म्हणवतात आणि काही ख्रिस्ती होतात. माझा दृढविश्वास आहे की, शिक्षणाची आमची योजना जर अशीच चालू राहिली, तर आजपासून ३० वर्षांनी बंगालमधील प्रतिष्ठित वर्गात एकही मूर्तीपूजक उरणार नाही आणि हे सगळे धर्मांतराचे कष्ट न घेता, धर्मस्वातंत्र्यात काही ढवळाढवळ न करता, ज्ञान अन् चिंतन यांच्या नैसर्गिक प्रक्रियेतून साध्य होईल. या आशेने मला मनापासून आनंद होतो.’ (पुस्तकातील पृष्ठ ३९९ वरील लिखाण बाजूच्या छायाचित्रात दिले आहे.)
२. हिंदूंनी स्वतःची पारंपरिक ज्ञान आणि भारतीय मूल्ये सोडण्यामागील कारण
वर उल्लेख केलेल्या विवादाच्या संदर्भात वरच्या उतार्यातील २ वाक्ये अत्यंत महत्त्वपूर्ण आहेत – ‘या शिक्षणाचा हिंदूंवर विलक्षण परिणाम होत आहे. इंग्रजी शिक्षण घेणार्या एकाही हिंदूचे त्याच्या धर्माशी कधी प्रामाणिक नाते उरत नाही.’
हिंदूंनी स्वतःच्या धर्माची कास सोडणे नेमके कधीपासून आणि कशामुळे चालू झाले ? याचा हा महत्त्वाचा पुरावा आहे. ‘विज्ञान आणि श्रद्धा वा अध्यात्म हे विषय एकमेकांच्या विरोधात आहेत आणि हा कि तो ? अशी निवड करणे बंधनकारक आहे’, अशी अत्यंत चुकीची अन् आत्मघातकी समजूत काहींनी करून घेतली आहे. यामुळे आपण भारतियतेची मूल्ये, वैचारिक बैठक आणि आपले पारंपरिक ज्ञान यांपासूनही दूर जात आहोत, हे हिंदु समाजाने जाणून घेणे महत्त्वाचे आहे.
– श्री. रोहित सहस्रबुद्धे (साभार : फेसबुक)