पुणे – ‘तुला काय करायचे ते कर’, असे म्हणत हॉटेल चालक सचिन भगरे याने डेक्कन जिमखाना पोलीस ठाण्यामध्ये पोलीस निरीक्षक श्रीहरि बहिरट यांच्याशी अरेरावीची भाषा करत वाद घातला. त्या वेळी एका पोलीस कर्मचार्यासही त्याने धक्काबुक्की केली. त्यामुळे सरकारी कामामध्ये अडथळा आणल्याप्रकरणी सचिन भगरे याला पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणी श्रीहरि बहिरट यांनी तक्रार प्रविष्ट केली आहे.
श्रीहरि बहिरट हे नदीपात्रातील चौपाटी परिसरामध्ये रात्री दीड वाजता गस्त घालत होते. तेव्हा भगरे याचे हॉटेल चालू होते. पोलिसांनी हॉटेल बंद करण्यास सांगितल्यावर भगरे याने पोलिसांशी वाद घातला. तेव्हा त्याला पुढील कारवाई करण्यास पोलीस ठाण्यात आणले असता त्याने अरेरावीची भाषा करत धक्काबुक्की केली.
संपादकीय भूमिका :पोलीस ठाण्यातच पोलिसांना धक्काबुक्की होणे म्हणजे पोलिसांचा वचक नसल्याचे द्योतक. असे पोलीस कायदा आणि सुव्यवस्था कशी राखणार ? अशा पोलिसांचा जनतेला कधी आधार वाटेल का ? |