मुंबई – गरीब रुग्णांना रुग्णसेवेची अट घालून मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील खासगी रुग्णालयांसाठी महानगरपालिकेने जागा दिली; मात्र खासगी रुग्णालयांकडून त्याचे उल्लंघन होत असून पालिका रुग्णालये सुविधा पुरवण्यात अपुरी पडत आहेत. ही परिस्थिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमोर मांडणार असून गरीब रुग्णांना सेवा नाकारणार्या धर्मादाय रुग्णालयांवर कारवाई करण्यात येईल, असे शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी सांगितले. त्यांनी १७ जुलै या दिवशी के.ई.एम्. आणि नायर रुग्णालयांनी भेट दिली. त्या वेळी ते बोलत होते.
‘पालिका देत असलेल्या सुविधांप्रमाणे अन्य रुग्णालये सुविधा देऊच शकत नाहीत. मुंबईला आवश्यक त्या सुविधा मिळाव्यात, यासाठी प्रयत्न चालू आहेत. लवकरच आयुक्त, कामगार रुग्णालय प्रशासन आणि आरोग्यमंत्री यांच्या समवेत बैठक घेऊन ही परिस्थिती मांडणार आहे. खासगी रुग्णालयांच्या जागा पालिकेच्या असून रुग्णांना सेवा देण्याच्या अटीवर त्यांना त्या जागा देण्यात आल्या आहेत. त्यामुळे याची चौकशी करण्यात येईल’, असेही मंत्री केसरकर यांनी सांगितले.