श्रीरामाच्‍या अखंड अनुसंधानात आणि नामस्‍मरणात डुंबलेल्‍या ईश्‍वरपूर (जिल्‍हा सांगली) येथील पू. (श्रीमती) वैशाली सुरेश मुंगळे (वय ७५ वर्षे) !

ईश्‍वरपूर (जिल्‍हा सांगली) येथील पू. (श्रीमती) वैशाली सुरेश मुंगळे (वय ७५ वर्षे) या रामभक्‍त आहेत. त्‍यांनी अनेक ठिकाणी दासबोधाची पारायणे केली आहेत. त्‍यांनी दासबोध मंडळाच्‍या परीक्षक म्‍हणूनही सेवा केली आहे. सनातन संस्‍थेचे साधक श्री. संजय सुरेश मुंगळे यांच्‍या त्‍या मातोश्री आहेत. श्री. शंकर राजाराम नरुटे (आध्‍यात्मिक पातळी ६६ टक्‍के, वय ३८ वर्षे) यांना जाणवलेली पू. (श्रीमती) मुंगळे यांची गुणवैशिष्‍ट्ये पुढे दिली आहेत.

पू. (श्रीमती) वैशाली मुंगळेआजी यांचे छायाचित्र पाहिल्‍यावर श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांना जाणवलेली सूत्रे

श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ

१. ‘पू. वैशाली मुंगळेआजी यांचे छायाचित्र पाहिल्‍यावर ‘त्‍यांच्‍याकडे पहात रहावे’, असे मला वाटले.

२. ‘त्‍यांची दृष्‍टी शून्‍यात आहे, तसेच त्‍यांचे मन श्रीरामनामात स्‍थिर आहे’, असे मला वाटले.

३. मला माझ्‍या आज्ञाचक्रावर शीतल स्‍पंदने जाणवली.

‘आजारी असूनही भगवंताच्‍या अनुसंधानात राहिले, तर जीवनातील तो कठीण प्रसंग आनंदाने स्‍वीकारता येतो’, हे पू. आजींच्‍या उदाहरणातून शिकायला मिळते. अशा पू. मुंगळेआजींचा सत्‍संग सनातनच्‍या साधकांना दिल्‍याबद्दल श्रीरामस्‍वरूप गुरुदेवांच्‍या चरणी कोटीशः कृतज्ञता !’

– श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ (२६.५.२०२३)

१. श्रीरामभक्‍ती

पू. (श्रीमती) वैशाली सुरेश मुंगळे

१ अ. श्रीरामनामात मग्‍न असणे आणि इतरांकडूनही श्रीरामनामाचा जप करून घेणे : ‘श्रीमती मुंगळे यांच्‍या मुखात सतत श्रीरामाचे नाम असते. त्‍या प्रत्‍येक कृती ‘श्रीराम’, असे म्‍हणत करतात. त्‍या सतत ‘रामनामा’मध्‍ये मग्‍न असतात. त्‍या इतरांकडूनही रामनामाचा जप करून घेतात. पूर्वी त्‍यांनी लोकांकडून ८५ सहस्र, इतका रामनामाचा जप करून घेतला आणि स्‍वतःही केला. त्‍यांना अनेक संतांचे दर्शन आणि आशीर्वाद लाभले आहेत.

१ आ. आगळ्‍या-वेगळ्‍या पद्धतीने साजरे केलेले वाढदिवस !

१. श्रीमती मुंगळे यांनी श्री क्षेत्र गोंदवले येथे त्‍यांच्‍या ६१ व्‍या वाढदिवसानिमित्त ६३ सहस्र रामनामाचा जप केला होता. तेव्‍हा गोंदवले येथे त्‍यांचा सत्‍कारही झाला होता.

२. जुलै २०२२ मध्‍ये गुरुपौर्णिमेला त्‍यांना ७५ वर्षे पूर्ण झाली. त्‍यांनी तो वाढदिवसही वेगळ्‍या पद्धतीने साजरा केला. त्‍यांनी सलग ३ दिवसांत ७५ सहस्र इतका रामनामाचा जप केला.

त्‍या हे सांगत असतांना मला त्‍यांच्‍या मुखावर भाव जाणवत होता.

श्री. शंकर नरुटे

२. वर्ष २०१३ मधील रामनवमीला सनातन संस्‍थेने ‘त्‍यांची आध्‍यात्मिक पातळी ६१ टक्‍के झाली आहे’, असे घोषित केले होते. तेव्‍हा त्‍यांना सनातन-निर्मित श्रीरामाचे चित्र भेट दिले होते. त्‍या त्‍याची नियमित पूजा करतात.

३. काही वर्षांपूर्वी श्रीमती मुंगळे यांना परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांचा सत्‍संग लाभला होता. त्‍यांच्‍या मनात परात्‍पर गुरु डॉक्‍टरांविषयी भाव आहे. त्‍या सतत साधकांकडे त्‍यांची विचारपूस करतात.

४. मुलाला साधना आणि सेवा करण्‍यासाठी प्रोत्‍साहन देणेे

त्‍यांचा मुलगा श्री. संजय सुरेश मुंगळे हे सनातन संस्‍थेच्‍या मार्गदर्शनानुसार साधना करत आहेत. ते ईश्‍वरपूर येथे दैनिक ‘सनातन प्रभात’च्‍या वितरणाची सेवा करतात. श्रीमती मुंगळे मुलाला साधना आणि सेवा करण्‍यासाठी सतत प्रोत्‍साहन देतात अन् साहाय्‍यही करतात.

५. अंथरुणाला खिळून असूनही सतत नामस्‍मरण करत असल्‍यामुळे आनंदी असणे

काही मासांपूर्वी त्‍या पाय घसरून पडल्‍यामुळे अंथरुणाला खिळून आहेत, तरीही त्‍यांच्‍या साधनेत खंड पडला नाही. त्‍या सतत देवाच्‍या स्‍मरणात असल्‍यामुळे आजारपणातही पुष्‍कळ आनंदी आहेत. तेव्‍हा ‘त्‍यांची साधना चांगली चालू आहे’, असे मला जाणवले.

६. सद़्‍गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी सांगितल्‍याप्रमाणे साधकाने श्रीमती मुंगळे यांना चालण्‍यासाठी प्रयत्न करायला सांगणे आणि त्‍याप्रमाणे त्‍यांनी श्रीरामाचा नामजप करत चालण्‍यासाठी प्रयत्न करणे

२.९.२०२२ या दिवशी मी ईश्‍वरपूर येथील माझ्‍या घरी गेल्‍यानंतर श्रीमती मुंगळे यांच्‍या घरी जाऊन त्‍यांना भेटलो. सद़्‍गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी मला सांगितले होते, ‘‘त्‍या चालू लागतील. त्‍यांचा आत्‍मविश्‍वास वाढायला हवा. तुम्‍ही घरी गेल्‍यावर त्‍यांच्‍याकडून चालण्‍यासाठी प्रयत्न करून घ्‍या.’’ मी त्‍यांना तसेे सांगितल्‍यावर त्‍यांनी ‘वॉकर’ घेऊन श्रीरामाचा मोठ्याने नामजप करत चालण्‍याचा प्रयत्न केला. काही पावले चालता आल्‍यावर त्‍यांना पुष्‍कळ आनंद झाला. मी सलग ४ दिवस त्‍यांच्‍या घरी जाऊन त्‍यांना चालायला सांगत होतो. तेव्‍हा त्‍या उत्‍साहाने आणि श्रीरामाचे नाम घेत ‘वॉकर’ घेऊन चालण्‍याचा प्रयत्न करत होत्‍या. एकदा चालतांना त्‍यांचा भाव जागृत झाला आणि त्‍या म्‍हणाल्‍या, ‘‘रामरायांनीच तुम्‍हाला पाठवले आहे. तुमच्‍यामुळेच मला चालता येऊ लागले.’’

७. सद़्‍गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी श्रीमती मुंगळे यांना सांगितलेले नामजपादी उपाय त्‍या न चुकता करतात.           

‘प्रत्‍येक कृती भगवंत करतो आणि भगवंतामुळेच होते’, असा त्‍यांचा भाव आहे. पुष्‍कळ वेदना होत असूनही सतत भगवंताचा ध्‍यास आणि श्रीरामाचे अखंड अनुसंधान यांमुळे त्‍या आनंदी आहेत. त्‍यांच्‍या चेहर्‍यावर पुष्‍कळ तेज आहे. ‘त्‍यांची संतपदाकडे वाटचाल चालू आहे’, असे मला वाटते.’

– श्री. शंकर राजाराम नरुटे (आध्‍यात्मिक पातळी ६६ टक्‍के, वय ३८ वर्षे), सनातन आश्रम, देवद, पनवेल. (६.१०.२०२२)

(‘वरील लेखातील सूत्रे पू. मुंगळेआजी यांना संत म्‍हणून घोषित करण्‍यापूर्वीची असल्‍याने त्‍यांच्‍या नावाआधी ‘पू.’ असे लावलेले नाही.’ – संकलक)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक