इराणमध्ये हिजाब न घालणार्‍या महिलांवर पुन्हा कारवाई चालू !

तेहरान (इराण) – इराणमध्ये गेल्या काही मासांपासून हिजाबच्या विरोधात तेथील महिला आंदोलन करत आहेत. या आंदोलनामध्ये आतापर्यंत शेकडो लोकांचा मृत्यू झाला, तर अनेकांना कारागृहात डांबण्यात आले आहे. गेले काही मास सरकारकडून सार्वजनिक ठिकाणी हिजाब न घालणार्‍या महिलांवर कोणतीही कारवाई करण्यात येत नव्हती; मात्र आता सरकारकडून पुन्हा कारवाई करणे चालू करण्यात आले आहे.

सरकारकडून या संदर्भातील ‘गश्त-ए-एर्शाद’ या सशस्त्र पथकाकडून गस्त घातली जात आहे. या पथाकडून हिजाब न घालणार्‍या महिलांना प्रथम चेतावणी दिली जाते. तरीही महिलेकडून हिजाब घातला जात नसेल, तर कायदेशीर कारवाई करण्यात येते. या महिलांना सुधारगृहात ठेवून त्यांना इस्लामचे शिक्षण देण्यात येते.