केदारनाथ मंदिर परिसरात भ्रमणभाष संचावर बंदी !

केदारनाथ (उत्तराखंड) – केदारनाथ मंदिर परिसरात आता भ्रमणभाष संच वापरण्यावर बंदी घालण्यात आली आहे. बद्री-केदारनाथ मंदिर समितीने हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे येथे भ्रमणभाष संचाद्वारे छायाचित्र काढणे आणि व्हिडिओ बनवणे यांवर निर्बंध असतील. काही दिवसांपूर्वी एका महिलेने या मंदिराच्या परिसरात तिच्या प्रियकराला विवाहाची मागणी घातली होती. या घटनेचा व्हिडिओ सामाजिक माध्यमातून प्रसारित झाल्यानंतर मंदिर प्रशासनाकडून अप्रसन्नता व्यक्त करण्यात आली होती.

मंदिर समितीने घेतलेल्या निर्णयामध्ये भाविकांना सभ्य पोशाख घालून मंदिरात येण्यास सांगण्यात आले आहे. यासमवेतच मंदिर परिसरात तंबू किंवा छावण्या न लावण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. आदेशाचे पालन न करणार्‍यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. या संदर्भात मंदिर परिसरात ठिकठिकाणी फलक लावण्यात आले आहेत. यावर ‘तुम्ही सीसीटीव्ही कॅमेर्‍यांच्या देखरेखीखाली आहात’, असेही म्हटले आहे.

बद्रीनाथमध्येही लवकरच भ्रमणभाष संचावर बंदी घालण्यात येणार !

बद्री-केदारनाथ मंदिर समितीचे अध्यक्ष अजेंद्र अजय म्हणाले की, हे एक धार्मिक ठिकाण आहे, जिथे लोक मोठ्या श्रद्धेने येतात. भक्तांनी त्याचा आदर करावा. बद्रीनाथ धाममधून अद्याप भ्रमणभाष संदर्भात कोणतीही तक्रार आलेली नाही; परंतु तेथेही असे फलक लावले जातील.

संपादकीय भूमिका 

देशातील सर्वच मंदिरांनी आता असा निर्णय घेण्याची आवश्यकता आहे !