भारतीय तरुणाशी लग्‍न करण्‍यासाठी पाकिस्‍तानमधून आलेल्‍या सीमा हैदरची चौकशी करून षड्‍यंत्र उघड करणे आवश्‍यक !

पाकिस्‍तानमधील सीमा हैदर ही तिच्‍या ४ मुलांसह पाक ते दुबई, दुबई ते नेपाळ आणि नेपाळमधून भारतात घुसली. तिच्‍या पतीला हे ४-५ मास माहिती नव्‍हते. शेवटी सीमा नावाचे हे कोडे पाकची गुप्‍तचर यंत्रणा ‘आय्.एस्.आय.’ची हस्‍तक आहे ? कि खरोखर ‘पबजी’ खेळ खेळता खेळता भारतातील भोळ्‍या भाबड्या सचिन मीना (नोएडा, उत्तरप्रदेश) या तरुणावर एवढे प्रेम झाले की, ती घरदार सोडून आणि सर्व विकून भारतात आली ? सध्‍या माध्‍यमांमध्‍ये गाजणार्‍या सीमा-सचिन या विषयावर उत्तरप्रदेशचे माजी पोलीस उपमहानिरीक्षक श्री. विक्रम सिंह यांनी ‘अंजू पंकज शो’ या ‘यू ट्यूब’ वाहिनीवर केलेले विश्‍लेषण येथे देत आहोत.

सचिन मीना आणि सीमा हैदर

१. सर्वसाधारण नाही,तर चाणाक्ष बुद्धीची सीमा हैदर !

सीमा ही एक पाकिस्‍तानची महिला आहे. ‘सीमा केवळ इयत्ता ५ वीपर्यंत शिकली आहे’, असे तिचे म्‍हणणे आहे; परंतु जेव्‍हा ती माध्‍यमांशी संवाद साधते, तेव्‍हा तिचे ज्ञान भांडार, संवादचातुर्य आणि आत्‍मविश्‍वास हे आपल्‍या देशातील ४० टक्‍के वृत्तनिवेदकांपेक्षा अधिक चांगले आहे. ती पाकिस्‍तानमधून दुबईला जाते तेही १३ लाख रुपयांची भूमी विकून ! दुबईवरून नेपाळ आणि तेथून भारतात येऊन थेट ‘एन्.सी.आर्.’च्‍या (राष्‍ट्रीय राजधानी क्षेत्राच्‍या) जेवर (नोएडा, उत्तरप्रदेश) विमानतळाच्‍या अगदी जवळ येते.

श्री. विक्रम सिंह

१ अ. सीमाविषयी संशय घेता येऊ शकतील अशा गोष्‍टी : तिच्‍या चौकशीत तिने तिच्‍या भावाविषयीची माहिती लपवली. नंतर कळले की, तो सैन्‍यात आहे. तो कुठे आहे ? आणि कोणत्‍या पदावर आहे ? हे तिने सांगितले नाही. तिने २ भ्रमणभाष संच (मोबाईल) आणि ४ सिम कार्ड तोडले. तिच्‍याकडे ३ आधार कार्ड आहेत. एवढे सर्व असतांनाही ती म्‍हणते, ‘‘मी साधी सरळ एक गृहिणी आहे.’’ सर्वाधिक महत्त्वाची गोष्‍ट, म्‍हणजे तिची तंत्रज्ञानाविषयी किती माहिती आहे ?, ते बघा. ती नेपाळहून आली, तेव्‍हा इतरांशी आणि सचिनची चर्चा केली. तेव्‍हा नेपाळच्‍या एका मुलीकडून भ्रमणभाषमधील ‘हॉटस्‍पॉट’वरून इंटरनेट घेतले आणि तिने ‘व्‍हॉईस कॉल’ केला होता. एका नेपाळी मुलीशी मैत्री करून इंटरनेटसाठी ‘हॉटस्‍पॉट’ घेतला. तो कुणी आणि का दिला ? तिचे शिक्षण तर केवळ ५ वीपर्यंत झाले आहे. अशा व्‍यक्‍तीला ‘हॉटस्‍पॉट’ काय आहे ? हे ठाऊक असेल का ? मला देहलीत चांदणी चौकात मेट्रो रेल्‍वेने जायचे असेल, तर मी एका राज्‍याचा ‘डीजीपी’ (पोलीस उपमहानिरीक्षक) होतो, तरी मला ४ ठिकाणी विचारावे लागेल. मेट्रोचे तिकीट कुठे मिळेल ? कुठे उतरावे लागेल ? कोणत्‍या मेट्रोमध्‍ये बसावे लागेल ? इत्‍यादी. असे असतांना ही महिला सिंधवरून (पाकिस्‍तानमधून) दुबईला गेली, तेथून नेपाळमध्‍ये जाऊन उत्तरप्रदेश येथे आली. तिला सिंधी, हिंदी, उर्दू आणि इंग्रजी या ४ भाषा चांगल्‍या येतात आणि ती म्‍हणते की, मी केवळ ५ वी पास आहे ! सचिन आणि सीमा यांच्‍यात ‘एस्’ या शब्‍दाखेरीज काय साम्‍य आहे ? हे समजत नाही; पण आम्‍ही लोक एवढ्या लवकर तिच्‍यावर विश्‍वास कसा करतो ?

तिच्‍याकडे ६ ‘पासपोर्ट’ आहेत. १ तिचा, ४ मुलांचे आणि एक जुना कालबाह्य झालेला आहे. तिच्‍या पतीने सांगितल्‍यानुसार तिने हे पासपोर्ट स्‍वतः बनवून घेतले. पासपोर्ट बनवून घेणे सोपी गोष्‍ट नाही. त्‍याची कठीण प्रक्रिया असते. जर ते बनवायचे होते, तर नियमित प्रक्रियेने भारतीय उच्‍चायुक्‍ताकडून पारपत्रही (व्‍हिसा) घेऊ शकत होती; पण तो घेतला नाही. ती चोरदाराने एवढा पैसा खर्च करून आली. यावरून सर्व उघड आहे. २ भ्रमणभाष संच तोडणे, ही साधी गोष्‍ट नाही. आपणही भ्रमणभाषसंच जुना झाल्‍यावर तो मुले किंवा अन्‍य नातेवाईकांना भेट म्‍हणून देतो; पण कधीच तोडत नाही. ते तोडण्‍याचा अर्थ एवढाच आहे की, एखादा मारेकरी त्‍याचे शस्‍त्र नष्‍ट करण्‍याचा गुन्‍हा करतो किंवा विहिरीत फेकून देतो, तसाच भ्रमणभाष संच तोडणे किंवा सिम तोडणे, हा प्रकार आहे. यातून हेच लक्षात येते की, तुम्‍ही कुणाशी तरी बेकायदा बोललेले आहात. यातून तुम्‍हाला काय लपवायचे आहे ? आणि कुणापासून लपवायचे आहे ? यातून उघड आहे की, तिला काही तरी लपवायचे आहे. याहून तिच्‍या चातुर्याचे चांगले प्रमाणपत्र काय असेल ? जर तुमची कथा योग्‍य आहे आणि तुम्‍हाला साहाय्‍य करणारे तेथे (नेपाळमध्‍ये) कुणी होते, तर कथा पूर्णपणे वेगळी आहे.

आय.एस्.आय

१ आ. ‘आय.एस्.आय.’चे दलाल आणि सीमा यांच्‍या ‘मोडस ऑपरेंडी’ (कार्यप्रणाली) मध्‍ये मूलभूत समानता : जो काही घटनाक्रम समोर आला आहे, त्‍यात मला एकही गोष्‍ट विश्‍वासनीय दिसली नाही. तिने सांगितलेले कथानक नाटकीपणाने ओतप्रोत भरलेले आहे. आपल्‍या मोठ्या आणि वयस्‍कर महिला तिची दृष्‍ट काढून तिला भेट देत आहेत. सीमा तुळशीला अर्घ्‍यही देत आहे, तसेच देवतांना नमस्‍कार करते, यातून तिची नाटकी प्रतिभा दिसते. आज अचानक तिला सनातन धर्म आणि सचिन यांच्‍याविषयी प्रेम उफाळून येणे अविश्‍वसनीय आहे. आधी तिचा पती आणि धर्म यांविषयीची काय वागणूक होती ? यापूर्वी तिचा एक विवाहविच्‍छेद (घटस्‍फोट) झाला होता. मी पदावर असतांना ‘आय.एस्.आय.’च्‍या अनेक दलालांची चौकशी केली आहे. त्‍यांच्‍या आणि सीमा यांच्‍या कार्यप्रणालीमध्‍ये (‘मोडस ऑपरेंडी’मध्‍ये) सोंग, नाटक, खोटे नाव आणि वेश अशा अनेक गोष्‍टींमध्‍ये समानता आढळते. भारतीय गुप्‍तचर यंत्रणा सीमाचा बँक तपशील पडताळतील. तिने १३ लाख रुपयांमध्‍ये भूमी विकली, तर किती रुपये मिळाले ? किती घेऊन आली ? हे पहातील.

२. सीमाचा ‘अजेंडा’ (कार्यसूची) आणि तिच्‍या षड्‍यंत्राची शक्‍यता

सीमा साधी सरळ वाटत नाही, तिला शिकवून पाठवले आहे, असे वाटते. ती म्‍हणते, ‘‘मी येथेच मरीन; पण पाकिस्‍तानात जाणार नाही.’’ हा तिचा ‘अजेंडा’ (कार्यसूची) कायम आहे. उत्तरप्रदेश पोलिसांनी चौकशी केली नसती, तर ही गोष्‍ट समोर आली नसती. वाक्‌चातुर्य, संवाद आणि ओळख लपवणे यांत तिचे प्रशिक्षण झाले आहे. काय बोलायचे ? आणि काय बोलायचे नाही ? हे सर्व तिला ठाऊक आहे. त्‍यामुळे उत्तरप्रदेश पोलीस आणि ‘रॉ’ गुप्‍तचर यंत्रणा यांनी तिने जे भ्रमणभाष संच तोडले, त्‍यांतील नावे आणि क्रमांक शोधावेत.

सीमाला एका चांगल्‍या समर्थकाची आवश्‍यकता होती की, जो पूर्णपणे डोळे बंद करून तिच्‍यावर विश्‍वास ठेवील, तिच्‍या नैतिक-अनैतिक गोष्‍टी मान्‍य करील आणि सचिन अशी व्‍यक्‍ती आहे, ज्‍याच्‍यामध्‍ये ‘सुपीरियॉटिक कॉम्‍प्‍लेक्‍स’ (वर्चस्‍व गाजवण्‍याची वृत्ती) नाही, तर ‘एम्‍पिरोटिक कॉम्‍प्‍लेक्‍स’ (अनुभवाचा स्‍वभाव) असावा. अशा सर्व गोष्‍टी पहाता तिने जाणूनबुजून आणि षड्‍यंत्रपूर्वक व्‍यक्‍ती निवडली, जिच्‍यावर केवळ तिचा आदेश चालेल आणि ती केवळ एक मोहरा बनून राहील. सचिनच्‍या वडीलधारी मंडळींना सीमा घरी आल्‍याविषयी अभिमान आहे. ते म्‍हणतात, ‘‘आजपर्यंत हिंदुस्‍थानात कुणी करू शकले नाही, ते सचिनने केले. सर्वांना अभिमानास्‍पद वाटत आहे.’’ यात कोणती अभिमानास्‍पद गोष्‍ट आहे ?

३. सीमाच्‍या पाकिस्‍तानी पतीचा षड्‍यंत्रात सहभाग ?

सध्‍या ‘व्‍हॉट्‍सअ‍ॅप’च्‍या जमान्‍यात पती-पत्नी यांचे २४ घंट्यांमध्‍ये एकदाही बोलणे झाले नाही, हे सर्व संशयास्‍पद आहे. एवढ्या गोष्‍टी होत असतांना तिच्‍या पतीला काहीच माहिती नाही, हे आश्‍चर्यकारक आहे. एकदा ती ‘तिचा पती गुलाम हैदर हा सौदी अरेबियात आहे’, असे म्‍हणते, तर दुसरीकडे ‘तो दुबईमध्‍ये आहे’, असे सांगते.

४. विविध संघटनांकडून केले जाणारे स्‍वागत अयोग्‍य !

आपल्‍याकडील विविध संघटना सीमाचे ‘एक महिला’ म्‍हणून स्‍वागत करत आहेत. हिंदूंवर असेच संस्‍कार झाले आहेत की, त्‍यांना प्रत्‍येक महिला ही त्‍यांची ‘मुलगी’ वाटते. ही चांगली गोष्‍ट आहे; परंतु मुलगी जर खोट्या नावाने राष्‍ट्रविरोधी काम करत असेल, तर ती कुणाचीही ‘मुलगी’ होऊ शकत नाही. त्‍यामुळे या संघटनांनी संयम ठेवला पाहिजे. अंधविश्‍वास ठेवणे योग्‍य नाही.

५. गुप्‍तचर यंत्रणांनी सखोल अन्‍वेषण करणे अपेक्षित !

‘रॉ’ आणि ‘आयबी’ यांनी सीमा हैदरची सखोल चौकशी करावी, तिची ‘नार्को’ (आरोपीला विशिष्‍ट औषध देऊन अर्धवट बेशुद्ध करून त्‍याच्‍याकडून माहिती मिळवणे) अन् ‘लाय डिटेक्‍टर’ चाचणी (यालाच ‘पॉलिग्राफ’चाचणी असेही म्‍हणतात. यामध्‍ये व्‍यक्‍ती खरे कि खोटे बोलत आहे ? ते कळू शकते.) करावी आणि सखोल अन्‍वेषण करावे. तसेच याचे मानसशास्‍त्रज्ञांकडून पूर्णपणे सखोल विश्‍लेेषण होणे आवश्‍यक आहे. तिचे सर्व माध्‍यमांकडून मोठ्या प्रमाणात उदात्तीकरण करण्‍यात येत आहे. सचिनचा परिवार आणि लोक अंधभक्‍त झाले आहेत. ही सामूहिक बेशुद्धी असून ती अधिक पसरण्‍यापूर्वी त्‍यांच्‍याविषयी दूरचित्रवाहिन्‍यांवर होणार्‍या चर्चासत्रांवर नियंत्रण ठेवणे आवश्‍यक आहे. हे जाणून आश्‍चर्य वाटेल की, पाकिस्‍तानमध्‍ये या विषयाच्‍या बातम्‍या आणि मुलाखती यांवर प्रतिबंध घातला आहे. याचा अर्थ यात त्‍या देशाचाही सहभाग आहे. त्‍यामुळे ‘सीमा कोण आहे ?’ आणि ‘तिची सीमा कुठपर्यंत आहे ?’, याची चौकशी अन्‍वेषण यंत्रणांना करावी लागेल. दुसर्‍याचे ‘हॉटस्‍पॉट’ घेऊन इंटरनेट वापरल्‍याने तो कॉल ‘ट्रॅक’ (संभाषणाचे ध्‍वनीमुद्रण) होणार नाही, हे सीमाला ठाऊक आहे. यावरून ती पूर्णपणे संशयित आहे, असे म्‍हणता येऊ शकते.

सीमाला आय.एस्.आय.ने मार्गदर्शन केले आहे. ‘मी जीव देईन; पण पाकिस्‍तानात जाणार नाही’, तसेच ‘मला पंतप्रधान मोदी आणि उत्तरप्रदेशचे मुख्‍यमंत्री योगी यांनी वाचवावे’, हे सर्व भावनिक विचार ती मांडत आहे. हे सर्व पूर्वनियोजित आहे. माझ्‍या पोलीस खात्‍यातील इतक्‍या वर्षांच्‍या सेवेतील अनुभवावरून मला सीमाच्‍या सर्वच गोष्‍टी कोणत्‍याच दृष्‍टीकोनातून मान्‍य होत नाहीत. प्रेमसंबंधातून आकर्षण निर्माण झाले आहे, असे मला दिसत नाही. या प्रकरणात अन्‍य काही असल्‍यास ते कालौघात समोर येईलच. या प्रकरणाचे सखोल अन्‍वेषण होणे आवश्‍यक आहे.

६. नेपाळ सीमेवरून ओळखपत्राविना भारतात प्रवेश देणे अयोग्‍य ! 

अशा प्रकारे अनेक पाक एजंट नेपाळमार्गे भारतात येतात, हे खरे आहे. भारत-नेपाळ सीमेवर अधिक पडताळणी होत नाही. आता वेळ आली आहे की, ओळखपत्राविना नेपाळ सीमेवरून कुणालाही भारतात प्रवेश दिला जाऊ नये. जी व्‍यवस्‍था विमानतळावर असते, तीच व्‍यवस्‍था भारत-नेपाळ सीमेवरही असावी. सीमा हैदर हिने जो मार्ग निवडला, त्‍यातून हे स्‍पष्‍ट दिसते की, तिचे मन पूर्णपणे स्‍वच्‍छ नाही. नेपाळमध्‍ये आय.एस्.आय.चे मोठ्या प्रमाणात अस्‍तित्‍व आहे. तेथूनच भारतात बनावट नोटांची तस्‍करी होते. पाकिस्‍तानची ‘हबीब बँक’ आणि ‘राष्‍ट्रीय बँक ऑफ नेपाळ’ यांनी मिळून ‘हिमालया बँक’ स्‍थापन केली आहे. तिच्‍या भारत-नेपाळ सीमेवर २४ शाखा आहेत. वादग्रस्‍त लोकांना भारतात प्रवेश देणे, सीमा भागात मदरसे उभारणे, बनावट नोटांची भारतात तस्‍करी करणे, हेच काम ते करतात.

(साभार : ‘अंजू पंकज शो’ यू ट्यूब वाहिनी, १३.७.२०२३)