हिंदूंना अंधारात ठेवून प्रशासनाने कराची (पाकिस्तान) येथील १५० वर्षे जुने मंदिर पाडले !

(वरील चित्र प्रसिद्ध करण्यामागे कुणाच्याही धार्मिक भावना दुखावण्याचा हेतू नाही. माहितीसाठी हे चित्र प्रसिद्ध केले आहे. – संपादक)

कराची (पाकिस्तान) – येथील स्थानिक प्रशासनाने वास्तू जुनी आणि धोकादायक असल्याचे कारण देत १५० वर्षे जुने मरीमाता मंदिर पाडले. (पाकिस्तानातील हिंदूंची असुरक्षित मंदिरे ! हिंदुद्वेष्ट्या पाकिस्तानी सरकारला आता भारताचे परराष्ट्रमंत्री डॉ. एस्. जयशंकर यांनी जाब विचारायला हवा, असेच हिंदूंना वाटते ! – संपादक)

१५ जुलै या दिवशी मंदिर पाडले जात असतांना पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता. यासंदर्भात स्थानिक हिंदूंना कोणतीही पूर्वकल्पना न देता भल्या पहाटे हे मंदिर पाडण्यात आले, अशी माहिती स्थानिक मंदिरांची देखभाल करणार्‍या रामनाथ मिश्रा महाराज यांनी दिली. अन्य एक स्थानिक असणारे रमेश यांनी सांगितले की, या मंदिराच्या व्यवस्थापनावर पुष्कळ दबाव टाकण्यात आला होता. या मंदिराची भूमी एका व्यावसायिकाला अनधिकृतरित्या विकण्यात आली होती.

तेथे तो एक व्यावसायिक इमारत उभारणार आहे. कराचीतील हिंदु समुदायाने ‘पाकिस्तान हिंदु परिषद’, तसेच सिंधचे मुख्यमंत्री सय्यद मुराद अली शाह आणि पोलीस महानिरीक्षक यांना या घटनेची तातडीने नोंद घेण्याची मागणी केली आहे.