सातारा, १४ जुलै (वार्ता.) – या वर्षी १९ सप्टेंबर या दिवशीपासून गणेशोत्सव चालू होत आहे. मूर्तीकारांची मूर्ती बनवण्याची लगबग चालू झाली आहे. गणेशोत्सवासाठी केंद्र सरकारने वर्ष २०२० मध्ये काही सूचना दिल्या आहेत. त्यामध्ये प्लास्टर ऑफ पॅरिसऐवजी मातीची मूर्ती बनवली पाहिजे, अशी सूचना आहे. त्यामुळे समस्त मूर्तीकारांनी केंद्र सरकारच्या सूचनांचे पालन करत ‘पीओपी’ऐवजी मातीच्या मूर्ती निर्मितीस प्राधान्य दिले पाहिजे, असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी केले.
जिल्हाधिकारी डुडी पुढे म्हणाले की, केंद्र सरकारने दिलेल्या सूचनांच्या पार्श्वभूमीवर पर्यावरण मंत्रालयाने १३ जून या दिवशी आदेश काढले आहेत. त्यानुसार सर्व जिल्हाधिकार्यांनी केंद्र सरकारच्या सूचनेवर कार्यवाही करायची आहे. त्याप्रमाणे आम्ही पत्र काढून संबंधित गटविकास अधिकारी आणि मुख्याधिकारी यांना कार्यवाहीचे आदेश दिले आहेत. त्यामुळे मूर्तीकारांनी मूर्ती बनवतांना त्या ‘पीओपी’ऐवजी मातीच्या बनवा; कारण पीओपीच्या मूर्ती पाण्यात विरघळत नाहीत. त्यामुळे पुढील अडचणी निर्माण होतात.