१४ जुलै १९०९ या दिवशी स्वातंत्र्यवीर सावरकर यांना ‘बॅरिस्टर’ पदवी देण्याचे नाकारण्यात आले. त्या निमित्ताने…
१४ जुलै १९०९ या दिवशी स्वातंत्र्यवीर सावरकर यांना ‘बॅरिस्टर’ पदवी देण्याचे नाकारण्यात आले. त्याचे औचित्य साधून त्याविषयीच्या उपलब्ध असलेल्या माहितीला अनुसरून सावरकरांच्या जीवनातील अत्यंत महत्त्वाच्या घटनांची माहिती ‘भारतमातेचा बॅरिस्टर’ या लेखस्वरूपात येथे मांडत आहे. १४ जुलै या दिवशी प्रसिद्ध झालेल्या लेखात ‘भारतीय विद्यार्थ्यांना ब्रिटीश सरकारशी राजनिष्ठ बनवण्याचा प्रयत्न करणारे कर्झन वायली आणि सावरकर यांना होणारा विरोध’, यांविषयीची माहिती वाचली. आज या लेखाचा पुढचा भाग येथे देत आहे.
(भाग ३)
याआधीचा भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा. https://sanatanprabhat.org/marathi/701263.html |
११. एफ्.ई. स्मिथ आणि सर जॉन मोर्ले यांच्या प्रश्नांना स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी दिलेली सडेतोड उत्तरे !
नाव घेताच सावरकर उठले आणि त्यांच्यासाठी निश्चित केलेल्या खुर्चीवर जाऊन बसले. त्यांच्यासमोर असलेल्या पटलाच्या पलीकडे दोन आसंद्या ठेवण्यात आल्या होत्या. त्या दोन आसंद्यांवर दोन व्यक्ती स्थानापन्न झाल्या होत्या. एक एफ्.ई. स्मिथ आणि दुसरे सर जॉन मोर्ले. दोघांनी त्यांच्या समोर बसलेल्या सावरकरांवरून आपादमस्तक (पायापासून डोक्यापर्यंत) दृष्टी फिरवली आणि कारवाई चालू करण्याचा आदेश दिला. ‘‘विनायक दामोदर सावरकर, तुम्ही बंड करणे, भारताच्या संपूर्ण स्वातंत्र्याची मागणी करणे, रक्तपात, शस्त्राचाराला उत्तेजन देणे, अशा अनेक गोष्टींमध्ये अडकलेले आहात. त्यामुळे ब्रिटीश साम्राज्याचे पाईक असलेल्या ‘ग्रेजइन’ संस्थेने तुम्हाला ‘बॅरिस्टर’ ही पदवी का द्यावी ?’’, असा प्रश्न स्मिथने सावरकरांना विचारला. यावर सावरकर शांतपणे म्हणाले, ‘‘मी माझे शिक्षण उत्तम गुण मिळवून पूर्ण केले आहे.’’ स्मिथ म्हणाले, ‘‘तुमच्यावर गंभीर स्वरूपाचे आरोप आहेत.’’ सावरकरांनी तात्काळ उत्तर दिले, ‘‘पण त्यातील एकही आरोप सिद्ध झालेला नाही.’’ यानंतर सर जॉन मोर्ले यांनी सावरकरांसमोर काही कागद ठेवले आणि म्हणाले, ‘‘या कागदपत्रांमध्ये नाशिक, पुणे, लंडन येथील विविध गुप्तचरांनी ज्या तारा केल्या, त्या सांगतात, ‘तुम्ही अनेक वर्षे ब्रिटीश साम्राज्याविरुद्ध कारवाया करत आहात. तुमचे थोरले बंधू गणेश दामोदर सावरकर यांच्या खटल्याची ही कागदपत्रे पहा.’’ त्यांनी तो गठ्ठा सावरकरांपुढे केला आणि म्हणाले, ‘‘यात तुमचेही नाव आहे.’’ सावरकरांनी मोर्लेंना विचारले, ‘‘गुप्तचरांनी दिलेला अहवाल म्हणजे पुरावा’ असे कधीपासून ग्राह्य धरले जाऊ लागले ?’’ मग स्मिथ यांनी प्रश्न केला, ‘‘ठीक आहे; पण तुमच्या भावावरच्या खटल्याचे काय ?’’ स्मिथच्या प्रश्नाला उत्तर देतांना सावरकर मंद स्मित करत म्हणाले, ‘‘माझ्या भावाला तर ब्रिटीश सरकारने शिक्षा ठोठावली आहे. त्या खटल्यात तुम्ही म्हणता, त्याप्रमाणे माझे नाव असेलसुद्धा; पण मला त्यासाठी न बोलावता भावाला शिक्षा देण्यात आली आहे. मग तो पुरावा कसा काय असू शकतो ?’’ सावरकरांच्या या प्रश्नावरून मोर्ले यांना कळून चुकले की, आपल्यासमोर कोण बसले आहे ! त्यांनी स्वतःला सावरत सावरकरांना म्हटले, ‘‘हे पहा सावरकर, तुम्हाला पदवी हवी असेल, तर आमची एक लहानशी अट आहे, ती मान्य करा. तुम्ही ब्रिटीश सरकारशी राजनिष्ठ आहात आणि भविष्यातसुद्धा राजनिष्ठ रहाणार आहात, अशी शपथ घ्या.’’
१२. ब्रिटीश सरकारशी राजनिष्ठ रहाण्याच्या शपथेचे लाभ अधिकार्यांनी सांगणे
सावरकरांनी शांतपणे विचारले, ‘‘समजा मी तशी शपथ घेतली नाही तर…?’’ सावरकरांना समजावण्याच्या सुरात सर जॉन मोर्ले म्हणाले, ‘‘सावरकर, हा तुमच्या आयुष्याचा प्रश्न आहे. ही शपथ घ्या, नाहीतर पदवी नाही, केवळ एक साधी शपथ ! या शपथेमुळे तुम्हाला सामाजिक प्रतिष्ठा मिळेल. तुम्ही श्रीमंतीत लोळाल. ‘बॅरिस्टर’ शब्दातील शक्ती तुमचे संपूर्ण आयुष्य पालटेल आणि तशी शपथ घेतली नाही, तर तुम्ही भिकारी व्हाल.’’
१३. ‘बॅरिस्टर’ पदवी संपादन करणे दुय्यम गोष्ट असल्याचे सावरकरांनी सांगणे
सावरकर हसून मोर्ले यांना म्हणाले, ‘‘८ वर्षांपूर्वी, म्हणजे २२ जानेवारी १९०१ या दिवशी तुमच्या देशाची राणी वारली. सर्वत्र दुःखाची छाया पसरली. आमच्या नाशिकमध्येसुद्धा दु:खाचे सावट पसरले. काही शहाण्यांनी राणीसाठी एक सभा घेण्यासाठी मान्यता दिली. तेवढ्यात मी तिथे पोचलो. ते वातावरण पाहून माझ्या तळपायाची आग मस्तकात गेली. मी त्यांना म्हणालो, ‘‘तुमचे डोके ठिकाणावर आहे का ? तुम्हाला वेड लागले आहे का ? अरे, इंग्लंडची राणी वारली. आपण त्यांचे गुलाम आहोत. तिच्यासाठी अश्रू ढाळण्याची आणि शोकसभा घेण्याची आवश्यकताच नाही. तशी शोकसभा आपण घेतली पाहिजे, असा निर्बंधही नाही. आपल्यावर तसा दबावही टाकण्यात आला नाही. तेव्हा दुखवटे पाळण्याची आवश्यकता नाही. मोर्ले, आता तुम्हीच सांगा, तरीही मी राजनिष्ठेची शपथ घ्यावी का ?’’ तरीही मोर्ले सावरकर यांना समजवण्याचा प्रयत्न करत म्हणाले, ‘‘तुमच्या आयुष्याचा प्रश्न आहे. अंतिम निर्णय घेण्याआधी पुन्हा एकदा विचार करा.’’ सावरकर यांनी सर जॉन मोर्ले आणि स्मिथ यांना गांभीर्याने अन् ठामपणे सांगितले, ‘‘मी पदवी संपादनासाठी येथे आलेलो नाही. तुमच्या साम्राज्याचा गाडा कसा चालतो ? तुमची बलस्थाने काय आहेत ? तुमची मर्मस्थाने काय आहेत ? ते मला जवळून पहायचे होते. या गोष्टींनाच माझ्या दृष्टीने अधिक महत्त्व होते. ‘बॅरिस्टर’ ही पदवी संपादन करणे, ही माझ्यासाठी दुय्यम गोष्ट आहे.’’
१४. राजनिष्ठेची शपथ घेणार नसल्याचे ठामपणे सांगणारे सावरकर !
मोर्ले म्हणाले, ‘‘सावरकर, राजनिष्ठेची शपथ घेणे प्रत्येक पदवी घेणार्याला बंधनकारक असते. मोहनदास करमचंद गांधी तुमच्या एका कार्यक्रमाला उपस्थित होते. त्यांना विचारा, त्यांनीसुद्धा ‘बॅरिस्टर’ होतांना अशी शपथ घेतली होती. तुम्हालासुद्धा ती घ्यावी लागेल.’’ सावरकर बाणेदारपणे म्हणाले, ‘‘कुणी काय करावे ?, हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. माझे वर्तन कसे असावे ?, ते ठरवण्याचा अधिकार माझा आहे, तो माझा प्रश्न आहे. मी तुम्हाला पुनश्च ठामपणे सांगतो की, काहीही झाले, तरी मी तुम्ही सांगता म्हणून राजनिष्ठेची शपथ घेणार नाही.’’
१५. संतप्त अधिकार्यांसमोर संयमी भाषेत उत्तर देऊन ‘खरे बॅरिस्टर कोण ?’, हे सांगणारे सावरकर !
सावरकरांचे हे वक्तव्य ऐकून सर जॉन मोर्ले यांनी संतापून पटलावर दोन्ही हात आपटले आणि उठून उभे रहात तारस्वरात म्हणाले, ‘‘सावरकर, तू कधीच ‘बॅरिस्टर’ होणार नाहीस.’’
सर जॉन मोर्ले यांचे मानसिक संतुलन बिघडले होते. ते पाहून सावरकरांनी स्वतःचा मानसिक तोल जाऊ दिला नाही. त्यांनी अत्यंत संयम राखून उत्तर दिले, ‘‘तुमची काहीतरी गल्लत होत आहे. ‘मला ‘बॅरिस्टर’ ही पदवी आज तुम्ही दिल्यावर मिळणार’, असे तुम्हाला वाटत असेल; पण मीच तुम्हाला सांगतो की, बॅरिस्टर ही पदवी मला यापूर्वीच प्राप्त झाली आहे. क्रांतीच्या न्यायालयात माझ्या मातृभूमीची बाजू मी ज्या क्षणी घेतली, त्याच क्षणी मी ‘बॅरिस्टर’ झालो. माझा देश, माझी मातृभूमी, माझी भारतमाता यांचा बॅरिस्टर ! तीच माझी सर्वोच्च पदवी ! तुमच्या कागदांचे भेंडोळे मिळाले किंवा मिळाले नाही, तरी मला काहीही फरक पडत नाही. कृपया ही गोष्ट लक्षात घ्या ! पुन्हा एकदा ठामपणे सांगतो, ते कागदाचे भेंडोळे तुम्हीच जपून ठेवा. मला त्याची आवश्यकता नाही. आता मी निघतो.’’
एवढे बोलून सावरकर शांतपणाने तिथून बाहेर पडले. क्लार्क, स्मिथ आणि मोर्ले तिघेही सावरकरांच्या पाठमोर्या आकृतीकडे पहात बसले. या तिघांच्या डोक्यात एकच प्रश्न थैमान घालत होता, ‘आजचा खटला जिंकणारा कोण ?’
(समाप्त)
– श्री. दुर्गेश जयवंत परुळकर, हिंदुत्वनिष्ठ व्याख्याते आणि लेखक, डोंबिवली. (२५.२.२०२३)