युरोपीय संसदेचा मणीपूर दंगलींच्या संदर्भातील ठराव त्याच्या ‘वसाहतवादी मानसिकते’चे दर्शन ! – भारत

मणीपूरमध्ये उसळलेल्या दंगलीचे प्रकरण

नवी देहली – मणीपूर येथे चालू असलेल्या कुकी आणि मैतेयी समुदायांमधील संघर्षावर युरोपीय संसदेने भारताच्या विरोधात ठराव संमत केला आहे. भारताने यावर तीव्र आक्षेप घेत युरोपीय संसदेच्या या प्रतिक्रियेला ‘वसाहतवादी मानसिकतेचे दर्शन’, असे  म्हटले आहे. भारताच्या अंतर्गत सूत्रांमध्ये नाक खुपसणे हे पूर्णत: अस्वीकारार्ह असल्याचे स्पष्ट मत परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी व्यक्त केले.

१. बागची पुढे म्हणाले की, भारताच्या न्यायव्यवस्थेसह सर्व स्तरांवरील सरकारी यंत्रणा मणीपूरमधील घडामोडींकडे लक्ष ठेवून आहे. आम्ही सर्वप्रकारे कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी कटीबद्ध आहोत. त्यामुळे युरोपीय संसदेने त्याचा वेळ हा त्यांच्या समस्यांवर लक्ष देण्यासाठी परिणामकारकरित्या वापरावा.

२. युरोपीय संसदेने १३ जुलै या दिवशी मणीपूरमधील घडामोडींवर चर्चा ठेवून यासंदर्भात आपत्कालीन ठराव संमत केला. फ्रान्सच्या स्ट्रॅसबर्ग येथे आयोजित संसदेच्या अधिवेशनामध्ये भारतातील कथित मानवाधिकारांच्या हननावर चर्चा आयोजित करण्यात आली होती.

३. गेल्या काही मासांपासून मणीपूरमध्ये हिंसाचार उसळला असून ख्रिस्ती असलेल्या कुकी समुदायाचे लोक मैतेयी या हिंदु समुदायाच्या लोकांवर आक्रमण करत आहेत. दोन्ही गटांमध्ये संघर्ष चालू असून आतापर्यंत १५० हून अधिक लोक ठार झाले असून सहस्रावधी लोक घायाळ झाले आहेत.

संपादकीय भूमिका

भारताच्या अंतर्गत सूत्रांमध्ये नाक खुपसणार्‍या युरोपीय युनियनला केवळ खडसावणे पुरेसे नसून त्याला अद्दल घडवणे आवश्यक !