१. ‘बृहन्नारदीय पुराणांतर्गत हे माहात्म्य ३१ अध्यायात्मक असून बद्रिकाश्रमात नारायणऋषींनी नारदाला अधिकमासाचे सविस्तर माहात्म्य सांगितले आहे.
२. नैमिषारण्यात सूतांनी शौनकादिक ऋषींना प्रश्नोत्तर रूपाने सांगितले.
३. महाभारत काळातील उल्लेख
३ अ. पांडवांचा वनवास आणि द्रौपदीचा पूर्वजन्म यापूर्वीही अधिकमास असणे : वनवासात असलेल्या द्रौपदीला भगवान श्रीकृष्णांनी तिचा पूर्वजन्मवृत्तांत सांगून त्यात दूर्वास महर्षींनी दुःख निवृत्तीकरता पुरुषोत्तमाची सेवा सांगितली आहे. त्याचा तिरस्कार केल्यामुळेच अनेक दुःखे त्या जन्मात झाली आणि त्याचाच परिणाम या जन्मातही भरसभेत वस्त्रहरणादि अनेक प्रकारचा अपमान, वनवास आणि अज्ञातवास यांमध्ये असह्य कष्टप्राप्तीच्या रूपाने भोगावा लागत आहे. वनवासातील विविध कष्टांमुळे २ वेळा आलेल्या अधिकमासाचा नियम धर्म घडला नाही. पुरुषोत्तम मासात स्नान-दानादि नियम व्रते करा, म्हणजे दुःखे दूर होतील. त्याप्रमाणे वागल्याने तिची दुःखापासून मुक्तता होऊन शत्रूंचा नाश आणि राज्यप्राप्ती झाली इत्यादी वर्णन आहे. यावरून ‘पांडवांच्या वनवासाच्या काळात आणि द्रौपदीच्या पूर्वजन्मातही अधिकमास अन् त्यांची स्नान-दानादि व्रते करण्याची पद्धत असावी’, असे अनुमान निघते.
३ आ. ‘अज्ञातवासात १३व्या वर्षी विराटाच्या येथे पांडव प्रकट झाल्यावर पांडवांची १३ वर्षे पूर्ण झाली नाहीत, तेव्हा पुनः वनवास भोगावा’, असा दुर्याेधनाचा आग्रह होता. त्या वेळी हे निर्णय देण्याचे काम पितामह भीष्म यांच्याकडे आले. त्यांनी
पञ्चमे पञ्चमे वर्षे द्वौ मासावधिमासकौ ॥
एषामभ्यधिका मासाः पञ्च च द्वादश क्षपाः ।
त्रयोदशानां वर्षाणामिति मे वर्तते मतिः ॥
– महाभारत, पर्व ४, अध्याय ५२, श्लोक ३ आणि ४
अर्थ : प्रति पाच वर्षांत दोन अधिक मास येतात. त्यामुळे पांडवांनी वनवास पत्करून १३ वर्षे पूर्ण होऊन वर पाच मास १२ रात्री अधिक झाल्या आहेत असे मी मानतो.
४. वेदांग ज्योतिषांत लगधाचार्यांनी ५ वर्षांच्या युगात अंती माघापूर्वी, म्हणजे श्रावण आणि माघ हे दोनच मास अधिक येत असत.
(साभार : ‘सदाचार आणि संस्कृति’, मे २०१८)