वाहनांच्‍या विशेष पडताळणी मोहिमेत २६ वाहनांविरुद्ध कारवाई !

समृद्धी महामार्गासह अन्‍य ३ मार्गांवर राबवली मोहीम !

प्रतिकात्मक चित्र

बुलढाणा – समृद्धी महामार्गावर २५ प्रवाशांचे बळी घेणार्‍या ट्रॅव्‍हल्‍सच्‍या अपघातानंतर ९ जुलैच्‍या रात्री त्‍या महामार्गासह अन्‍य ३ मार्गांवर वाहनांची विशेष पडताळणी मोहीम राबवण्‍यात आली. या संयुक्‍त कारवाईत २६ वाहनांविरुद्ध कारवाई करण्‍यात आली असून एक ट्रॅव्‍हल्‍स स्‍थानबद्ध (डिटेन) करण्‍यात आली.

समृद्धी महामार्गाच्‍या मेहकर इंटरचेंज, राज्‍यमार्गावरील मेहकर फाटा (चिखली) आणि मलकापूर जवळच्‍या राष्‍ट्रीय महामार्ग क्रमांक ६ वर पोलीस अधीक्षक सुनील कडासने यांच्‍या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्‍यात आली. यामध्‍ये प्रादेशिक परिवहन विभाग, जिल्‍हा वाहतूक शाखेचे आनंद महाजन, पोलीस निरीक्षक जितेंद्र आडोळे, संबंधित पोलीस ठाणे, राज्‍य उत्‍पादन शुल्‍क विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी सहभागी झाले होते.

मध्‍यरात्रीपर्यंत चाललेल्‍या मोहिमेत ट्रॅव्‍हल्‍स आणि अन्‍य मिळून ८५ वाहनांची पडताळणी करण्‍यात आली. ३७ पैकी ४ ट्रॅव्‍हल्‍स आणि अन्‍य ६ वाहनांविरुद्ध मोटार वाहन कायद्यानुसार कारवाई करण्‍यात आली. मेहकर फाटा येथे ३७ पैकी ६ ट्रॅव्‍हल्‍स आणि ४ इतर वाहनांवर कारवाई करण्‍यात आली. राष्‍ट्रीय महामार्ग ६ वर २१ वाहनांची पडताळणी करण्‍यात आली. त्‍यामध्‍ये ५ ट्रॅव्‍हल्‍सवर मोटार वाहन कायद्यानुसार कारवाई करण्‍यात आली.

संपादकीय भूमिका :

प्रशासनाला उशिरा सुचलेले शहाणपण !