(म्हणे) ‘महानगरपालिकेची अनुमती घेतली आहे का ?’ – बेंगळुरू पोलीस

बेंगळुरू येथील पुरातन नागकट्ट्याजवळील नागदेवतेची पूजा करण्यास पोलिसांकडून आडकाठी !

पुरातन नागकट्ट्याजवळील नागदेवतेची स्थापना करतांना कार्यकर्ते

बेंगळुरू (कर्नाटक) – बेंगळुरू महानगरपालिकेच्या मैदानाजवळील पुरातन नागकट्ट्याच्या शेजारी असलेल्या नागदेवतेची पूजा ९ जुलै २०२३ पासून प्रत्येक रविवारी सकाळी ११ ते १ या कालावधीत करण्यात येणार होती. ‘संकल्प हिंदु राष्ट्र’च्या अंतर्गत राष्ट्र रक्षण दलाचे संस्थापक श्री. पुनीत केरेहळ्ळी यांच्या नेतृत्वाखाली याचा शुभारंभ होणार होता; मात्र ‘या पूजेसाठी पालिकेच्या अधिकार्‍यांकडून अनुमती घेतली आहे का ? घेतली असेल, तर त्याचे पत्र दाखवा ?’ असा प्रश्‍न पोलिसांनी उपस्थित केला. तरीही हिंदूंनी येथे घोषित केल्यानुसार पूजा केली. गेल्या वर्षभरापासून येथे पूजा करण्यात येतच होती; मात्र या वेळी श्री. केरेहळ्ळी यांनी या संदर्भात सामाजिक माध्यमांतून ‘संकल्प हिंदु राष्ट्र’ या अंतर्गत या पूजेसाठी लोकांना सहभागी होण्याचे आवाहन केल्यामुळे पोलिसांनी त्याला आडकाठी आणण्याचा प्रयत्न केला. (हिंदु राष्ट्राची अ‍ॅलर्जी झालेले कर्नाटक पोलीस ! – संपादक)

राष्ट्र रक्षण दलाचे पुनित केरेहळ्ळी

अनेक वर्षांपासून उद्ध्वस्त झालेले पुरातन नागकट्टा स्थान राष्ट्र रक्षण दल आणि युवा ब्रिगेड यांच्या कार्यकर्त्यांनी स्वच्छ करून पुरातन नागकट्याची मूर्ती स्थापित केली आहे.

पालिकेने नोटीस देण्याऐवजी पोलीस नोटीस का देत आहेत ? – भाजपचे आमदार बसनगौडा पाटील यांचा प्रश्‍न

भाजपचे आमदार बसनगौडा पाटील

या घटनेविषयी भाजपचे आमदार बसनगौडा आर्. पाटील (यत्नाळ) यांनी ट्वीट करून म्हणाले, ‘‘नागदेवता कट्ट्याची पूजा करणार्‍या हिंदूंना नोटीस देणारे पोलीस कुणाच्या हातातील बाहुले बनून कार्य करत आहेत ? पालिकेची अनुमती हवी असल्यास पालिकेने नोटीस द्यायला हवी होती;  परंतु ती पोलिसांनी दिली. ते त्यांचे आप्तस्वकीय आहेत का ?, असा संशय निर्माण होतो. हिंदूंना या राज्यात पूजा करण्यासाठी पालिका आणि पोलीस यांची अनुमती हवी का ? अशी नोटीस इतर कोणत्याही धार्मिक स्थळांना देण्यात आली आहे का ?’’

संपादकीय भूमिका

कर्नाटकात काँग्रेसच्या राज्यात हिंदूंच्या धार्मिक अधिकारांवर दडपशाही ! काँग्रेसला निवडून देणार्‍या हिंदूंना हे मान्य आहे का ?