महाविद्यालयांमध्‍ये देशभक्‍त निर्माण करण्‍यासाठी कार्यरत असलेली अखिल भारतीय विद्यार्थी परिषद !

‘अखिल भारतीय विद्यार्थी परिषदे’ने ९ जुलै या दिवशी ७५ व्‍या वर्षात पदार्पण केले आहे. त्‍या निमित्ताने…

अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेची (‘अभाविप’ची) स्‍थापना ९ जुलै १९४९ या दिवशी झाली. राष्‍ट्रवादी आणि हिंदुत्‍वनिष्‍ठ विचारसरणी असलेली ही संघटना गेल्‍या अनेक दशकांपासून शैक्षणिक अन् सामाजिक क्षेत्रांत विद्यार्थ्‍यांच्‍या हितासाठी कार्यरत आहे. अशा या संघटनेने यंदाच्‍या वर्षी ७५ व्‍या वर्षात पदार्पण केले आहे. त्‍या निमित्ताने अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे राष्‍ट्रीय सरचिटणीस डॉ. याज्ञवल्‍क्‍य शुक्‍ला यांच्‍याशी आमच्‍या प्रतिनिधीने संवाद साधला. त्‍याचा वृत्तांत येथे देत आहोत.


१. महाविद्यालयांमध्‍ये देशभक्‍त निर्माण करण्‍याचे ‘अभाविप’चे कार्य !

भारतीय विश्‍वविद्यालयांत देशविरोधाला जराही स्‍थान नाही. मुळात आपल्‍या देशातील कुठलेही विश्‍वविद्यालय भारतविरोधी नाही. काही विश्‍वविद्यालयांमध्‍ये जे लोक भारतविरोधी विधाने करतात, ते प्रसारमाध्‍यमांमध्‍ये अधिक लोकप्रिय बनतात. अशांची संख्‍या मूठभरच असून लोकांनी त्‍यांना कधीच नाकारले आहे. त्‍यांना कुणीही थारा देत नाही. त्‍यांची दुकानदारी बंद होत चालली आहे. देहलीतील जवाहरलाल नेहरू विश्‍वविद्यालयात (जे.एन्.यू.) आजही मोठ्या प्रमाणात देशभक्‍त विद्यार्थी शिक्षण घेत आहेत, हे मी सांगू शकतो. ‘साम्‍यवादी संघटनांचे धोरणच भारताच्‍या सरकारी संस्‍था नाकारणे, भारतीय सैन्‍याला नाकारणे, भारताची प्रजासत्ताक व्‍यवस्‍था नाकारणे’, हे आहे. त्‍यांचे आदर्श मार्क्‍स आणि लेनिन हे आहेत. त्‍यामुळे साम्‍यवादी भरकटलेले आहेत. अशात ‘अभाविप’ महाविद्यालयांमध्‍ये देशभक्‍त निर्माण करण्‍याचे काम करते.

डॉ. याज्ञवल्‍क्‍य शुक्‍ला

२. युवा पिढीला व्‍यसनाधीन बनवण्‍याचे आंतरराष्‍ट्रीय षड्‍यंत्र !

आज अनेक प्रगत देश भारतीय युवा पिढीच्‍या प्रतिभेला घाबरतांना दिसतात. ‘जगातील अनेक क्षेत्रे ही भारतीय युवा पिढीच्‍या अधिपत्‍याखाली जातील’, अशी त्‍यांना भीती वाटते. त्‍यामुळेच त्‍यांच्‍याकडून भारताच्‍या युवा पिढीच्‍या विरोधात मोठे षड्‍यंत्र रचले जात आहे. आज भारतीय युवा पिढी भ्रमणभाषच्‍या आहारी गेली आहे, ही वस्‍तूस्‍थिती आहे; परंतु त्‍यांच्‍यासमोर सर्वांत मोठे आव्‍हान आहे ते व्‍यसनाधीनतेचे. युवा पिढीला व्‍यसनाधीन बनवण्‍याचे आंतरराष्‍ट्रीय षड्‍यंत्र आहे. आपल्‍या शेजारील देशांकडून त्‍यासाठी सातत्‍याने प्रयत्न होत असतात. पंजाब, त्रिपुरा यांसारख्‍या राज्‍यांच्‍या सीमेवर अमली पदार्थांची मोठ्या प्रमाणात तस्‍करी होतांना दिसते. नेपाळमार्गे भारतात अमली पदार्थांची तस्‍करी होते. आज अमली पदार्थांचे सेवन ही ‘फॅशन’ बनली आहे. त्‍याद्वारे युवा पिढीला उद़्‍ध्‍वस्‍त करण्‍याचे प्रयत्न केले जात आहेत आणि हेच आपल्‍यासमोरील सर्वांत मोठे आव्‍हान आहे, असे मला वाटते.

३. लव्‍ह जिहाद हा आतंकवादच !

लव्‍ह जिहाद हे षड्‍यंत्र आहे. आमीष, खोटारडेपणा, छळ-कपट आणि धोका यांद्वारे लव्‍ह जिहाद केला जातो. ‘द केरल स्‍टोरी’ चित्रपटामुळे हे सत्‍य लोकांसमोर खर्‍या अर्थाने आले. हे संकट सामान्‍य नाही. त्‍याद्वारे मातृशक्‍तीवर आक्रमण केले जात आहे. मुसलमान युवकांना जर खरोखरच प्रेम करायचे असेल, तर त्‍यांनी त्‍यांचे मूळ मुसलमान नाव सांगून करावे. खोटे बोलून स्‍वतःचे सोनू, टिनू अशी हिंदु टोपण नावे धारण करून प्रेम करू नये. असे खोटे बोलून आणि धोका देऊन ते प्रेम का करतात ? हे प्रेम नाही, तर भारतातील कुटुंबव्‍यवस्‍था नष्‍ट करण्‍याचे सुनियोजित षड्‍यंत्र आहे. हे रोखण्‍यासाठी विद्यार्थ्‍यांमध्‍ये सजगता आणि जागरूकता निर्माण करणे आवश्‍यक आहे. पालकांनी स्‍वतःच्‍या मुलींवर लक्ष ठेवले पाहिजे. आता इस्‍लामी धर्मगुरूंनी समाजासमोर येऊन इस्‍लामच्‍या नावाखाली चाललेला हा प्रकार बंद करण्‍याचे आवाहन केले पाहिजे. लव्‍ह जिहाद नव्‍या प्रकारचा आतंकवाद आहे. असे कृत्‍य करणार्‍यांवर सरकारने राष्‍ट्रीय सुरक्षा कायद्यांतर्गत गुन्‍हा नोंदवला पाहिजे आणि त्‍यांच्‍यावर कठोरात कठोर कारवाई झाली पाहिजे. हे सामाजिक संकट असल्‍याने ‘अभाविप’सह संपूर्ण समाजालाच जागरूक रहाण्‍याची आवश्‍यकता आहे.

४. एक आंदोलन देशासाठी !

‘राष्‍ट्राचे पुनर्निर्माण’ हे आमचे उद्दिष्‍ट आहे. सर्वांचा विकास झाला पाहिजे. देशात गरिबी आणि भेदभाव असता कामा नये. देशातील सर्व घटकांचा विकास हाच भारताचा विकास आहे. युवक शिक्षित झाले पाहिजेत आणि त्‍यांना रोजगारही मिळाला पाहिजे. आत्‍मगौरव असलेल्‍या युवा पिढीची निर्मिती झाली पाहिजे. ‘अभाविप’ची ७५ वर्षे ही भारताचा विकास आणि भारतीय नागरिक यांना समर्पित आहेत. त्‍यासाठी ‘एक आंदोलन देशासाठी’ ही आमची भूमिका आहे.

युवा पिढीच्‍या भरवशावरच भारत विश्‍वगुरु बनेल !

भारताच्‍या जडघडणीत युवकांचे योगदान मोठे आहे. सामाजिक, विज्ञान-तंत्रज्ञान आदी सर्वच क्षेत्रांत प्रतिभावान युवा पिढी कार्यरत आहे. तरुणांमध्‍ये काम करण्‍याची गती आणि उत्‍साह अफाट असतो. आजची तरुण पिढी केवळ समस्‍यांवर चर्चा करत बसत नाही, तर ती त्‍यावर उपाय शोधते. तथापि त्‍यांना भरकटू न देण्‍यासाठी त्‍यांच्‍यासमोर योग्‍य आदर्श ठेवायला हवेत, तसेच त्‍यांना वेळोवेळी दिशा द्यायला हवी; कारण युवा पिढीच्‍या भरवशावरच भारत विश्‍वगुरु बनेल !