रत्नागिरी – अद्यापपर्यंत जिल्ह्यात समाधानकारक पाऊस पडलेला नाही. तथापि तो पडणार नाही, असे नाही. संभाव्य पावसाचे प्रमाण लक्षात घेता जिल्ह्यातील सर्व यंत्रणांनी आपत्कालामध्ये सजग आणि सतर्क रहावे, असे निर्देश पालकमंत्री उदय सामंत यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात जिल्हा विकास विषयक कामांचा विभागनिहाय आढावा घेतांना ते बोलत होते. या वेळी जिल्हाधिकारी एम्. देवेंदर सिंह, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्तीकिरण पुजार, जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी आणि अन्य अधिकारी उपस्थित होते.
ते पुढे म्हणाले, ‘‘रत्नागिरी जिल्ह्याचा पर्यटनाच्या बाबतीत ‘क’ वर्गामध्ये समावेश करण्यात आला आहे. या ठिकाणी पर्यटकांच्या दृष्टीने धर्मशाळा आणि सभागृहाचे उभारणी करण्यात यावी, तसेच सध्या नगर परिषदेची जी कामे चालू आहेत, ती संबंधितांनी पूर्णत्वास न्यावीत. संबंधित यंत्रणांवर टाकण्यात आलेले दायित्व त्यांनी पूर्णतः पार पाडावे.’’
जिल्हाधिकारी एम्. देवेंदर सिंह म्हणाले की, जिल्हा नियोजनामधून जिल्ह्याच्या विकासकामांकरता ३०० कोटी रुपयांची मान्यता मिळाली असून त्यापैकी ६० कोटी रुपये प्राप्त झाले आहेत. त्यातील सुमारे १० कोटी रुपये विविध विकासकामांसाठी वितरित करण्यात आले असून या ३०० कोटी रुपयांपैकी जिल्हा परिषदेकडे सुमारे ११७ कोटी रुपये वर्ग करण्यात आले आहेत. आतापर्यंत सरासरीच्या २४ टक्के इतका पाऊस जिल्ह्यात झाला आहे.