(म्हणे) ‘भारतातील ख्रिस्ती धर्माला संपवता येईल, असा कुणी विचार करू नये !’ – आर्चबिशप क्लेमिस, केरळ

मणीपूर येथील हिंसेवरून केरळचे आर्चबिशप क्लेमिस यांचे फुकाचे विधान !

(आर्चबिशप म्हणजे वरिष्ठ पाद्री)

थिरूवनंतपूरम् (केरळ) – भारतात ख्रिस्ती धर्म संपवता येईल, असा कुणी विचार करू नये, असे फुकाचे विधान केरळमधील केरळ कॅथॉलिक बिशप कौन्सिलचे अध्यक्ष आणि सायरो-मलंकारा कॅथॉलिक चर्चचे आर्चबिशप बेसिलियोस क्लेमिस यांनी मणीपूर येथील हिंसाचारावरून केले. येथे काँग्रेसच्या आमदाराच्या नेतृत्वाखाली या हिंसाचाराच्या विरोधात आंदोलन करण्यात आले. त्या वेळी आर्चबिशप क्लेमिस बोलत होते.

आर्चबिशप क्लेमिस पुढे म्हणाले की, या हिंसाचाराच्या प्रकरणी पंतप्रधान मोदी यांनी मौन सोडले पाहिजे. असे करून ‘भारतात लोकशाही कायम आहे’, असा जगाला संदेश देण्याची त्यांच्याकडे चांगली संधी आहे. केंद्र सरकारने हस्तक्षेप करून मणीपूरमध्ये शांतता स्थापन करण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. गेल्या ६५ दिवसांपासून येथे हिंसाचार होत आहे. ज्या सरकारला ‘सर्जिकल स्ट्राईक’ करणे ठाऊक आहे, ते सरकार हा हिंसाचार थांबवण्यास सक्षम का नाही ?, असा प्रश्‍न त्यांनी विचारला.

संपादकीय भूमिका 

भारतातील ख्रिस्ती धर्माला संपवण्याविषयी कुणी काही बोलत नसतांना आणि काही करत नसतांना अशा प्रकारचे विधान करून हिंदूंना ‘तालिबानी’ ठरवण्याचाच पाद्रयांचा हा प्रयत्न आहे, हे लक्षात घ्या ! उलट मणीपूरमध्ये ख्रिस्ती असणारे कुकी समाजाचे लोक तेथील हिंदू असणार्‍या मैतेई समाजातील लोकांना संपवण्याचा प्रयत्न करत आहेत, हीच वस्तूस्थिती आहे !