अधिकोषात खाते उघडतांना आणि त्‍याचा वापर करतांना पुढील सूचनांचे कटाक्षाने पालन करून स्‍वतःच्‍या अमूल्‍य वेळेचा अपव्‍यय, तसेच मनस्‍ताप टाळा !

साधकांसाठी सूचना आणि वाचक, हितचिंतक अन् धर्मप्रेमी यांना नम्र विनंती !

अधिकोषातील बचत (सेव्‍हिंग) खाते (अकाउंट) व्‍यवहारांच्‍या संदर्भातील मार्गदर्शक सूत्रे पुढे दिली आहेत.

१. एकापेक्षा अधिक व्‍यक्‍तींचे संयुक्‍त (जॉईन्‍ट) खाते उघडून ‘आयदर ऑर सर्व्‍हायव्‍हर’ हा पर्याय निवडल्‍यास खातेधारकांपैकी एखादा धारक उपलब्‍ध नसेल, तर दुसर्‍याच्‍या स्‍वाक्षरीमुळे व्‍यवहार पूर्ण होऊ शकतो.

२. खाते उघडतांना वारस नोंदीचा पर्याय निवडावा !

बहुतांश जण अधिकोषात नवीन बचत खाते उघडतांना अर्जातील वारस नोंदीचा (नॉमिनीचा) पर्याय निवडत नाहीत. त्‍यामुळे त्‍या खात्‍याशी संबंधित व्‍यक्‍तीचा अकस्‍मात् मृत्‍यू झाल्‍यास खात्‍यातून पैसे काढूून घेण्‍यासाठी मृत व्‍यक्‍तीनंतरच्‍या अधिकारी व्‍यक्‍तीला कायद्यानुसार मोठी प्रक्रिया करावी लागते. त्‍यामध्‍ये बरेच पैसे आणि वेळ फुकट जातो, तसेच प्रशासनाच्‍या कूर्मगतीच्‍या कारभारामुळे मनस्‍तापही होतोे.

ज्‍यांनी खात्‍याशी संबंधित अर्जात नॉमिनीचा पर्याय निवडला नसेल, त्‍यांनी अधिकोषात संपर्क करून त्‍याची प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करावी. ‘वारस’ म्‍हणून जवळचे कुटुंबीय, परिचित अथवा स्नेही यांची निवड करू शकतो.

३. कार्यरत नसलेले बचत खाते, तसेच चालू खाते यापुढे चालू ठेवण्‍याविषयी किंवा बंद करण्‍याविषयी लवकरात लवकर निर्णय घ्‍यावा !

काही जण अधिकोषातील बचत, तसेच चालू खाते यांचा बर्‍याच कालावधीपर्यंत वापर करत नाहीत. त्‍यामुळे ते खाते आपोआपच निष्‍क्रीय (इनअ‍ॅक्‍टिव्‍ह) होते आणि त्‍या खात्‍याशी संबंधित कोणताही व्‍यवहार करायचा असल्‍यास अधिकोषाला अर्ज देऊन ते पुन्‍हा कार्यरत करून घेण्‍यासाठी वेळ आणि शक्‍ती यांचा अपव्‍यय होतो. यापुढे खातेधारकांनी प्रत्‍येक २ – ३ मासांनी आपल्‍या खात्‍यामध्‍ये रक्‍कम भरावी अथवा काढावी; जेणेकरून आपले खाते निष्‍क्रीय होणार नाही. व्‍यवहार झाल्‍यावर आपल्‍या बचत किंवा चालू खात्‍याचे पासबुक भरून घेऊन त्‍यातील नोंदी योग्‍य असल्‍याची पडताळणी करावी.

ही सूत्रे लक्षात घेऊन अधिक कालावधीपासून कार्यरत नसलेली (ऑपरेट न केलेली) खाती कार्यरत (ऑपरेटिव्‍ह) ठेवण्‍याविषयी किंवा बंद करण्‍याविषयी लवकरात लवकर निर्णय घेऊन संबंधितांनी त्‍याची प्रक्रिया पूर्ण करावी. प्रत्‍येकाने आपापल्‍या आर्थिक व्‍यवहारांच्‍या कागदपत्रांची सूची बनवून ती सुरक्षित ठिकाणी ठेवावी. (४.७.२०२३)