पुजारी मंडळाच्या विरोधानंतर मंदिर संस्थानने घेतला निर्णय
तुळजापूर (जिल्हा धाराशिव) – पुजारी मंडळाच्या विरोधानंतर श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानने अभिषेक पूजेच्या शुल्कामध्ये केलेल्या दहा पटींच्या दरवाढीला, तसेच विश्वस्त कोट्यातील व्ही.आय.पी. दर्शनासाठी प्रतिव्यक्ती २०० रुपये शुल्क आकारण्याच्या निर्णयाला स्थगिती दिली आहे. श्री तुळजाभवानी मातेच्या अभिषेक पूजेचे शुल्क ५० रुपयांवरून ५०० रुपये करण्याचा निर्णय मंदिर संस्थानने घेतला होता.
७ जुलै या दिवशी पुजारी मंडळाच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी आणि मंदिर संस्थानचे अध्यक्ष डॉ. सचिन आेंबासे यांची भेट घेऊन निवेदनाद्वारे दरवाढ मागे घेण्याची मागणी केली होती. त्याची नोंद घेत अंतत: मंदिर संस्थानने अभिषेक पूजेची शुल्क वाढ, तसेच विश्वस्त कोट्यातील व्ही.आय.पी. दर्शन पाससाठी शुल्क आकारण्याच्या निर्णयाला स्थगिती दिली आहे, अशी माहिती लेखाधिकारी सिद्धेश्वर शिंदे यांनी दिली.
संपादकीय भूमिकामंदिरामध्ये कोणत्याही प्रकारची दरवाढ करतांना पुजारी मंडळींना विश्वासात का घेतले जात नाही ? कि मंदिर सरकारीकरणामुळे मंदिर प्रशासन केवळ निधी वाढवण्याच्या मागे लागले आहे ? |