सिंधुदुर्ग जिल्ह्यात नदीकाठच्या गावांना सतर्कतेची चेतावणी

पावसामुळे अनेक ठिकाणी घरांची पडझड

सिंधुदुर्ग – गेले २ दिवस कोसळणार्‍या पावसामुळे जिल्ह्यातील नदी आणि नाले यांच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली असून गडनदी, तेरेखोल, अरुणा, कर्ली या नद्यांच्या काठावरील गावांना सतर्कतेची चेतावणी देण्यात आली आहे. या पावसामुळे वीजवितरण यंत्रणा काही ठिकाणी कोलमडली आहे, तसेच झाडांच्या पडझडीमुळे वाहतुकीवरही परिणाम झाला आहे. काही ठिकाणी घरे, गोठे यांसह वित्तहानीच्या घटना घडल्या आहेत.

मालवण तालुक्यात मुसळधार पावसामुळे शहरातील अनेक रस्ते पाण्याखाली गेले आहेत. सोसाट्याच्या वार्‍यामुळे दांडी किनारपट्टी येथे मोरेश्वरवाडी येथील स्मशानभूमीच्या शेडचे पत्रे उडून गेले, तर बांधकामाची हानी झाली. असगणी ग्रामपंचायतीची सार्वजनिक विहीर कोसळून ४ लाख रुपयांची हानी झाली आहे.

जिल्ह्यात अनेक ठिकाणी नदी, नाले, ओढे यांत फेकलेला कचरा, मद्याच्या बाटल्या पावसाच्या पाण्यासह वाहून येत असल्याने कचरा साचत आहे. त्यामुळे नवीन समस्या निर्माण होत आहे.

पाण्यात वाहून गेल्याने महिलेचा मृत्यू

कणकवली तालुक्यातील शिरवल येथील श्रीमती प्रचीती कुडतरकर (वय ३६ वर्षे) या ६ जुलै या दिवशी येथील ओहोळावर कपडे धुण्यासाठी गेल्या होत्या. त्या वेळी पाण्यात पडल्याने त्या वाहून गेल्या होत्या. बराच वेळ त्या घरी न आल्याने नातेवाइकांनी ओहोळाच्या परिसरात शोध घेतला असता त्यांचा मृतदेह सापडला.

झाड पडल्याने देवगड-निपाणी मार्गावरील वाहतूक ठप्प

देवगड-निपाणी राज्य मार्गावर बोभाटेवाडी, तोंडवली येथे ७ जुलैला सकाळी ११ वाजता वटवृक्ष उन्मळून पडल्याने या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. सायंकाळी वृक्ष बाजूला करून मार्ग वाहतुकीसाठी खुला करण्यात आला.

नदीकाठच्या गावांना सूचना

मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील नदीकाठच्या गावांना सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या आहेत. या अंतर्गत नद्यांच्या पूरप्रवण क्षेत्रातील ग्रामस्थांनी आवश्यकता भासल्यास स्थलांतर करावे, सद्य:स्थिती लक्षात घेता नदीच्या पात्रातून ये-जा करू नये, नदीच्या पात्रात कपडे धुवू नयेत, पाण्यासाठी गुरांना पात्रात सोडू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.

घरांची हानी

कणकवली तालुक्यात बौद्धवाडी, साकेडी येथे विजीन जाधव यांच्या जुन्या घरावर झाड कोसळून हानी झाली. देवगड तालुक्यात तांबळडेग, विजयदुर्ग येथे शुभांगी पवार, विलासिनी आडकर यांच्या घरांची पडझड होऊन वित्त हानी झाली. ओवळीये येथील अंकुश गुळेकर यांच्या घरावर झाड पडून भिंत कोसळल्याने सुमारे ३३ सहस्र रुपयांची हानी झाली आहे.

आंबेरी पूल वाहतुकीस खुला करण्याची मागणी

कुडाळ तालुक्यातील आंबेरी येथे असलेला पूल कमी उंचीचा असल्याने प्रतिवर्षी पावसात या पुलावरून पाणी जाते. परिणामी या मार्गावरील वाहतूक बंद होऊन अनेक गावांचा संपर्क सुटतो. या समस्येवर उपाय म्हणून या नदीवर पूल बांधण्यात आला; मात्र या पुलावरील मुख्य रस्त्याला जोडणार्‍या दोन्ही बाजूंच्या जोडरस्त्याचे काम ठेकेदाराकडून पूर्ण करण्यात आले नाही. त्यामुळे मुसळधार पावसामुळे जुना पूल पाण्याखाली गेल्यास वाहतूक बंद पडून गावांचा संपर्क तुटू शकतो.

त्यामुळे नवीन पुलाच्या भरावाचे काम लवकर पूर्ण करून हा पूल वाहतुकीसाठी खुला करावा, अशी सूचना शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे आमदार वैभव नाईक यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या उपअभियंता सीमा गोवेकर यांना केली. ७ जुलै या दिवशी आमदार नाईक यांनी संबंधित अधिकार्‍यांसह या पुलाची पहाणी केली.