|
(अनुज्ञप्ती म्हणजे परवाना (लायसन्स))
पणजी, ७ जुलै (वार्ता.) – कर्नाटकमधील काँग्रेस सरकारचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी ७ जुलै या दिवशी राज्याचा अर्थसंकल्प कर्नाटक विधानसभेत मांडला. या वेळी अर्थसंकल्पात म्हादईचे पाणी वळवणार्या कळसा-भंडुरा प्रकल्पासाठी १ सहस्र कोटी रुपयांची तरतूद, तसेच पर्यावरण मंत्रालयाची आवश्यक अनुज्ञप्ती मिळाल्यानंतर प्रकल्पाचे काम चालू करणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी केली.
मुख्यमंत्री सिद्धरामय्या पुढे म्हणाले, ‘‘म्हादई पाणी तंटा लवादाने कळसा आणि भंडुरा नाला पेयजल प्रकल्पासाठी ३.९ टी.एम्.सी. पाणी वापरण्यास यापूर्वीच अनुमती दिलेली आहे. पर्यावरण मंत्रालयाची आवश्यक अनुज्ञप्ती मिळाल्यानंतर कळसा-भंडुरा प्रकल्पाचे काम चालू करण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत.’’ म्हादई ही गोव्याची जीवनदायिनी असल्याने म्हादईचे पाणी वळवण्यास गोवा सरकारने तीव्र आक्षेप नोंदवला आहे.