नागपूर – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेच वर्ष २०२४ पर्यंत मुख्यमंत्री रहाणार आहेत, असे स्पष्ट प्रतिपादन भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी येथे ६ जुलै या दिवशी पत्रकारांशी बोलतांना केले. ‘उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलेल्या विधानावर विश्वास ठेवला पाहिजे. अजित पवार यांनी महाराष्ट्राच्या जनतेला सत्य परिस्थिती सांगितली आहे’, असे मतही त्यांनी व्यक्त केले.
शिंदे गटाचे आमदार बच्चू कडू यांच्याविषयी बोलतांना बावनकुळे म्हणाले की, महायुतीमध्ये त्यांचे स्थान महत्त्वाचे अन् मोठे आहे. राज्य सरकारने त्यांच्या म्हणण्यावरून अनेक निर्णय घेतले. विकलांग मंत्रालय त्यांच्याच मागणीवरून करण्यात आले आहे. पूर्वी त्यांना जो मान नव्हता, तो या सरकारमध्ये मिळाला. भविष्यात कोणते ना कोणते मोठे दायित्व मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री त्यांना देतील.
पुढे ते म्हणाले की, अजित पवार यांनी घेतलेली भूमिका महाराष्ट्र आणि देश यांच्या हिताची आहे. छगन भुजबळ, धनंजय मुंडे, सुनील तटकरे या सर्वांनी त्यांना बाहेर का यावे लागले ? वेगळे व्हावे लागले हे मांडले आहे. त्यामुळे हे कशामुळे झाले आहे, हे पाहिले पाहिजे.
मी त्यागपत्र देणार या अफवा ! – मुख्यमंत्री
मुंबई – मी त्यागपत्र देणार या अफवा आहेत. विरोधकांकडून त्या पसरवल्या जात आहेत. सर्वसामान्य घरातील माणूस मुख्यमंत्री झाला, ही पोटदुखी आहे. सरकारच्या शपथविधीपासून ते सरकार पडेल म्हणत आहेत. अफवांच्या मर्यादा तोडल्या आहेत. विरोधकांनी प्रथम त्यांची घरे सांभाळावीत, असे वक्तव्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एका वाहिनीशी बोलतांना केले.
ते पुढे म्हणाले की, शिवसेनेत कुणीही अप्रसन्न नाही. आम्ही विकासासमवेत आहोत. सर्वांगीण विकासाला अडचण येत नाही. अजितदादांनीही विकास पाहिला. त्याला साथ दिली. त्यांना विकासाची भूमिका पटली. अजितदादांनी उघडपणे सांगितले की, मोदींचे नेतृत्व सक्षम नेतृत्व आहे. ते विकासाला साथ देत आहोत. त्यामुळे सरकार मजबूत झाले आहे. पुढे आणखीन मजबुतीने काम होईल. आज २०० हून अधिक विधेयके आहेत. दोन इंजिनचे मजबूत सरकार आहे. मागच्या सरकारने बंद पाडलेले सर्व प्रकल्प आम्ही चालू केले. आमचे ध्येय सर्व सामान्य माणसाला पुढे नेणे आहे.