‘एक दिवस महाराजांसाठी प्रतिष्ठान’ आणि हिंदु जनजागृती समिती यांचा पुढाकार !
जळगाव – जिल्ह्यातील यावल येथील प्रसिद्ध असलेल्या यावलच्या निंबाळकर यांच्या गडाची पडझड झाली असून त्याची दुरुस्ती आणि संवर्धन करण्याविषयीच्या सूत्राची जळगावचे जिल्हाधिकारी अमन मित्तल यांनी नोंद घेतली आहे. याविषयी त्यांनी ४ जुलैला बैठक आयोजित केली होती. यात या गडांच्या देखभाल अन् दुरुस्तीसाठी अधिकारी स्तरावर चर्चा करण्यात आली. या वेळी यावल येथील ‘एक दिवस महाराजांसाठी प्रतिष्ठान’चे डॉ. अभय रावते, हिंदु जनजागृती समितीचे जळगाव जिल्हा समन्वयक श्री. प्रशांत जुवेकर, फैजपूर विभागाचे प्रांत अधिकारी कैलास कडलक, यावल तहसीलदार मोहनमाला नाझिरकर, भूमी अभिलेख कार्यालयाचे अधिकारी, यावल नगर परिषदेचे प्रभारी मुख्याधिकारी कदम हे उपस्थित होते.
या वेळी गडाची दुरुस्ती आणि संवर्धन यांसाठी पुरातत्व विभागाकडून १५ दिवसांत अहवाल सादर करून त्यासाठी नेमका किती खर्च येऊ शकतो ? हे कळवण्याचा आदेश जिल्हाधिकार्यांनी दिला. पुढच्या आठवड्यात जिल्हाधिकारी स्वतः या गडाची पहाणी करण्यासाठी जाणार आहेत.
हा गड ३५० वर्षांपूर्वीचा आहे. त्याची मोठ्या प्रमाणात पडझड झाली आहे. या गडाच्या भिंतींना तडे गेलेले असून काही ठिकाणी झाडे उगवलेली आहेत, तर गडावर सुद्धा अशीच झाडे आहेत. नागरिक या गडावर प्रातर्विधीसाठी जातात. त्यामुळे गडाची अवहेलनाच होते. यासाठी यावल येथील काही तरुणांनी एकत्रित येऊन पूर्वी या गडाची स्वच्छता केली होती. त्यातच गेल्या ४ वर्षांपासून ‘एक दिवस महाराजांसाठी प्रतिष्ठान’चे अध्यक्ष डॉ. अभय रावते यांनी पुढाकार घेऊन या ठिकाणी बरेच काम केले आहे. श्री. प्रशांत जुवेकर यांनी यासंदर्भात पुरातत्व विभागाकडे पाठपुरावा केल्याने जिल्हाधिकार्यांनी ही बैठक बोलावली.
यावल (जिल्हा जळगाव) येथील ऐतिहासिक वारसा लाभलेला राजे निंबाळकर गड (भुईकोट गड) !